स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते.
पंडित जसराज यांचा यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. मा.पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. येथील गौलीगुडा चमन आणि नामपल्ली असे मोहल्ले आहेत ज्यात त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. त्यांना शाळेच्या रस्त्यावरच्या त्या हॉटेलची आठवण आहे जेथे थांबून ते बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
पंडित जसराज म्हणतात की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. पंडित जसराज मानतात की, संघर्षांतून यश मिळते, मात्र त्याच बरोबर ते मानतात की, त्याकडे ‘मी’ च्या नजरेतून पहाता कामा नये. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात. पंडीतजी मानतात की या दीर्घ जीवनात जर काही प्रेरणा घेतली जाऊ शकते तर ती हीच की सातत्याने काम करत राहिले पाहिजे. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा.
पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडतं ते, जय हो. मा.पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील आहेत. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल कि मा.जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या.
भारतीय सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.जसराज यांना गौरवले आहे. पं. संजीव अभ्यंकर हे पं. जसराज यांचे शिष्य.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply