पं. गिंडे यांचा जन्म कर्नाटक राज्यात बेळगाव जवळ बैलहोंगल येथे झाला. त्यांनी लहान वयातच संगीतात रूची दाखविण्यास सुरुवात केली व पुढे आपले सारे आयुष्य संगीताला वाहून घेतले. ते श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडे वयाच्या अकराव्या वर्षी गाणे शिकू लागले. त्यासाठी त्यांनी लखनौ येथे प्रयाण केले व रातंजनकरांच्या घरातील एक सदस्य बनले. तिथे ते मॉरिस कॉलेजातील व्ही. जी. जोग, एस. सी. आर. भट, चिन्मय लाहिरी अशा संगीताभ्यासात बरेच पुढे असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संगीत अध्ययनात प्रगती करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत गिंडे यांनी संगीताच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केली होती व माध्यमिक शाळेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. हळूहळू पं. गिंडे रातंजनकरांच्या मदतनीसाची भूमिका निभावू लागले. त्याच जोडीला त्यांचे संगीत क्षेत्रातील ज्ञान व उमजही वाढत होती. त्यांनीआकाशवाणीवर व वेगवेगळ्या संगीत महोत्सवांत आपल्या गायनाचे कार्यक्रम करण्यास सुरूवात केली. तसेच आपले सहाध्यायी व शिक्षक एस. सी. आर. भट यांच्या जोडीने ते ध्रुपद शैलीत जुगलबंदीही करू लागले. १९५१ मध्ये त्यांनी मुंबई येथील भारतीय विद्या भवन येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १९६२ मध्ये ते वल्लभ संगीत विद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्त झाले. एक उत्तम शिक्षक, विद्वान, गायक व संगीत रचनाकार अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. त्यांनी कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीतही ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांची भारतीय शास्त्रीय संगीताविषयीची सप्रात्यक्षिक व्याख्याने प्रचंड लोकप्रिय होती. पं. गिंडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले.त्यांच्या साठाव्या वाढदिवसा निमित्त आयोजित समारंभास पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व व पु. ल. देशपांडे अशा संगीत साहित्य क्षेत्रातील प्रभृतींनी आपली उपस्थिती लावली होती. के. जी. गिंडे १३ जुलै १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply