पं. फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला. पं. फिरोज दस्तूर हे पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू होते.
पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते.एका अतिशय प्रतिभावान, प्रेमळ कलाकाराची ओळख पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. पारशी समाजात ‘आंग्ल’ प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे वळले, उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा)घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन आहे. सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता.
‘गोपाला मेरी करूना’ ही अब्दुल करिमखा साहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता ‘गोपाला…’ गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतिम गायचे! साक्षात अब्दुल करीमखा साहेबच डोळ्यासमोर उभे करायचे! पं. भीमसेन जोशी आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, “फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!” मा.पं. भीमसेन जोशी नेहमी प्रेमाने दस्तुरांना ‘फ्रेडी’ या नावाने हाक मारायचे!
पं. फिरोज दस्तूर यांचे ९ मे २००८ रोजी निधन झाले. पं.फिरोज दस्तूर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- तात्या अभ्यंकर
पं फिरोज दस्तूर -। राग मल्हार और ठुमरी
‘गोपाला मेरी करूना’
https://www.youtube.com/watch?v=ZZmyWYqA2wo
Leave a Reply