सारंगी हे तंतुवाद्य, खरेतर साथीचे. एवढेच नाही, तर कोठीवर, दिवाणखान्यात तवायफ सादर करत असलेल्या ठुमरी-कजरी-चैतीसारख्या उपशास्त्रीय गाण्याला साथ करणारे वाद्य म्हणून सारंगी तशी ‘बदनाम’ होती. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२७ रोजी झाला. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या सारंगीला स्वतंत्र वाद्य म्हणून स्थान मिळवून देण्याचे काम सारंगिये पंडित रामनारायण यांनी केले. वाजवण्यास अतिशय अवघड परंतु तरीही कानाला अतिशय गोड असणाऱ्या या वाद्यावर रामनारायण यांनी लहान वयातच प्रभुत्व मिळवले. पं. रामनारायण यांचे घराणे राजस्थानातील उदयपूरचे. संगीतसेवा त्यांच्या घराण्यातच. आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा सारेच गायन-वादनात रमलेले. वडील नाथुजीदेखील दिलरुबावादक.
सारंगी मात्र कुणीच वाजवली नव्हती. मात्र, त्यांच्या घराण्याचे गुरू असलेले गंगागुरू यांनी त्यांच्या घरी ठेवलेली सारंगी पाचव्या वर्षीच रामनारायण यांच्या हाती लागली. मग सारंगी त्यांचा ध्यास आणि श्वास बनली. साहजिकच पहिले धडे त्यांच्याकडून मिळणे स्वाभाविकच होते. परंतु नंतर त्यांना गायक म्हणून घडवले ते उदयलाल, माधव प्रसाद यांनी. या दोहोंच्या पश्चात १९४३ साली रामानारायण गुरुच्या इच्छेनुसार पुढचे शिक्षण घेण्यासाठी लाहोरला अब्दुल वाहीद खान यांच्याकडे गेले. तिथे लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून अर्ज केला. परंतु तिथे संगीत विभागात अधिकारी असलेल्या जीवनलाल मट्टू यांचे रामनाराण यांच्या हाताकडे लक्ष गेले आणि त्यांच्या लक्षात आले की हा तर सारंगीवादकही आहे. मग मट्टूंनी त्यांना सारंगीवादक म्हणूनच घेतलं व अब्दुसल वाहदी हुसेन यांच्याकडून संगीताचे धडेही देवविले. मग रामनारायण यांचे आयुष्यच पालटले.
आत दडलेला सारंगिया उफाळून आला व बोटांची जादू पाझरत राहिली ती आजवर. फाळणीनंतर ते दिल्ली आकाशवाणीत आले. परंतु त्यांच्यातला सर्जनशील वादक अस्वस्थ होता. म्हणून शेवटी ते मुंबईत आले. मुंबईने त्यांना साथ दिली. सिनेमात उमेदवारी केली. ओ. पी. नय्यर यांचा लाडका वादक अशी त्यांची ख्याती झाली आणि त्यांच्या अनेक गीतांना या सारंगीने चार चाँद लावले. तिथे नौशादपासून ओपी नय्यर यांच्यापर्यंत सर्वांनी सारंगीचा योग्य वापर करून घेतला. ओ. पी. नय्यर यांच्या संगीतातील सारंगी हा या वाद्याचा एक बेमिसाल रंग होता. सारंगी दु:खी पार्श्वभूमीप्रमाणेच आनंदी आणि रोमँटिक गाण्यांतही त्यांनी अनोख्या पद्धतीने खुलवली. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, मैं प्यार का राही हू, आज कोयी प्यार से दिल की बाते कह गया, रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना या सारख्या गाण्यांना ओ. पी. नय्यर यानी पं. रामनाराण यांचा सुरेख वापर करून घेतला.
बॉलीवूड मध्ये काम कून ही स्वतंत्र कलाकार म्हणून प्रतिष्ठा त्यांना मिळाली नव्हती. मग त्यांनी मुंबईत सारंगीवादनाचे स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले. रसिकांनी सुरुवातीला त्यांच्या सारंगीला नाके मुरडली. पंडितजींनी जिद्द सोडली नाही. काही काळ ते कुणा ना कुणाच्या साथीने कार्यक्रम करत राहिले. लवकरच एकल कार्यक्रम सुरू केले आणि मग भारतासहित जगभर तुफान लोकप्रियता मिळाली. त्या वेळच्या एचएमव्ही कंपनीसाठी त्यांनी सारंगीच्या तीन रेकॉर्डस् दिल्या आणि त्यांची नवी ओळख पटू लागली.
पं. रविशंकर यांच्यानंतर परदेशात भारतीय संगीत पं. रामनाराण यांनीच पोहोचविले. अमेरिका आणि युरोपचा दौरा करून या भारतीय वाद्याला जागतिक संगीतात स्थानापन्न करण्यासाठी रामनारायण यांनी सत्तरच्या दशकात खूप दौरे केले. त्यांना आजवर ‘संगीत नाटक अकादमी’पासून ‘पद्मविभूषण’पर्यंत अनेक मानाचे किताब देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या पं. भीमसेन जोशी पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. वाद्यावरील प्रभुत्व आणि त्याला सर्जनशीलतेची जोड मिळाल्यामुळे त्यांचे वादन अभिजाततेच्या दर्जाचे होते. पंडित रामनारायण सारंगी बद्दल म्हणतात.
‘सारंगी हे सांगीतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध भारतीय वाद्य आहे. ते केवळ आर्त वा करुण वाद्य नाही. उलट सारंगी म्हणजे ‘सौ रंगी’ असा अर्थ आहे. विविध सांगीतिक शक्यता, नव्या वाटांचे रंग खुलवणारी ती सारंगी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply