पं शरद जांभेकर यांचे शिक्षण रूईया महाविद्यालयात झाले व शास्त्रीय संगीतात त्यांनी सुरुवातीला नारायणराव व्यास यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले. तसेच त्या वेळेस थोडा तबला देखील शिकत होते. शरद जांभेकर यांना लयीचा ओढा असल्याने आग्रा गायकी शिकण्याची फार आस होती. त्या काळी गुरु संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा हे मुंबईत तेव्हा एक प्रतिष्ठित नाव होते. पं.नरेंद्र कणेकर, एस. जी. टिकेकर असा त्यांचा शिष्य वर्ग मोठा होता. संध्याकाळी पं. नरेंद्र कणेकर यांच्या घरी शिकवण्या सुरु असायच्या. त्यांनी काणे बुवांकडे शिक्षण घेतले. काणेबुवा मुंबईहून इचलकरंजीला जाईपर्यंत अडीच- तीन वर्षे पं शरद जांभेकर त्यांच्याकडे गाणे शिकले. त्याच वेळी पं शरद जांभेकर यांना मुंबई आकाशवाणीत नोकरी लागली. त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे शिक्षणात खंड पडला. पुढे बदलीच्या निमित्ताने सांगलीला जाण्याचा योग आला. अनेक वर्षांच्या खंडानंतर पं शरद जांभेकर यांचे शिक्षण काणेबुवांकडे परत सुरु झालं.
आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती. पं शरद जांभेकर तेथे शिकत असताना तिथे मंजू कुलकर्णी (पाटील) देखील शिकत होत्या. शरद जांभेकर यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये कामे केली होती. त्यांचे संगीत सौभद्र नाटकातील राधाधर मधु मिलिंद हे नाट्यगीत विशेष गाजले. शास्त्रीय, सुगम, नाट्य या प्रकारांमध्ये त्यांची विशेष पकड होती. शरद जांभेकरांनी लता मंगेशकरांसोबत अनेक गाण्यांमध्ये कोरस म्हणून साथही दिली होती. खडा आवाजाची देणगी असल्याने हिंदी व मराठी संगीतकारांबरोबर काम केले होते. पं. शरद जांभेकर यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका गाजल्या आहेत. ‘नाट्य धनराशी’ नावाच्या प्रसिद्ध अल्बम मध्येही पं. शरद जांभेकर यांनी आठ नाट्यगीते गायली होती. शास्त्रीय संगीतामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
शरद जांभेकर यांचे २५ जून २०२० रोजी निधन झाले.
पं. शरद जांभेकर यांची गाजलेली गाणी:
आली रे अंगणी, अजिंक्य भारत अजिंक्य जनता, अशि नटे ही चारुता,अष्टविनायका तुझा महिमा, कर हा करीं धरिला, गंगा आली रे अंगणी, घुमत ध्वनि कां हा, चंदनाचे परिमळ अम्हां काय, जय जन्मभू जय पुण्यभू, जागृत ठेवा लग्नाची, तारिल तुज अंबिका, तुझ्याविना भाव ना, दे हाता या शरणागता, धन्य आनंददिन, पूर्ण मम पशुमात्र खचित गणला, बिंबाधरा मधुरा, माझी मातुलकन्या, रवि मी हा चंद्र कसा, राधाधर मधु मिलिंद जयजय, साध्य नसे मुनिकन्या, सांभाळ दौलत सांभाळ, हो तो द्वारका भुवनी, हृदयी धरा हा बोध.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply