नवीन लेखन...

जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर

बोरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३४ रोजी गोव्यातील बोरी येथे झाला. पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते. प्रतिकूल परिस्थितीतून काम करत गुरुजींनी स्वताला घडवलं होते. त्यामागे त्यांचा रियाज तर होताच पण संवादिनी प्रतीचं प्रेम अधिक होते. पं.तुळशीदास बोरकर यांच्या घरापासून जवळच नवदुर्गेचं देऊळ होतं. त्या वेळी ते बरेचदा त्या देवळांमध्ये जाऊन बसत असत. भजन, कीर्तनावर तिथले हार्मोनियमवादक सुंदर साथ करत असत. पण त्या सुरांनी त्यांना आकर्षून घेतलं होतं. काही काळानंतर त्यांचे वडील अचानक वारल्याने गोव्याहून पुण्याला यावे लागले.

पं.तुळशीदास बोरकर यांची मोठी बहीण, उत्तम कलागुण असलेली अभिनेत्री होती. त्यांना छोटा गंधर्वानी ‘कलाविकास’ मध्ये बोलावून घेतलं. ते त्यांच्या बरोबर तालमींना जात असत. कंपनीचे ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट यांनी विचारलं, ‘‘काय रे तुला हार्मोनियम शिकायची आहे का?’’ आणि त्यांनीच हार्मोनियम शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढच्याच आठवडय़ात त्यांचा नागपूरला दौरा होता. तिथे जबरदस्त थंडी होती. एक दिवस वष्ट गुरुजींनी पहाटे चार वाजता त्यांना उठवलं आणि म्हणाले, ‘‘चल शिकायला बस.’’ त्यांचीच लहानशी पेटी होती. त्यावर सात शुद्ध स्वर कसे वाजवायचे ते शिकवलं. तेव्हा सलग चार तास त्यांनी रियाज केला. मग नऊ वाजता म्हणाले, ‘‘ऊठ. चहा वगैरे घेऊन दहा वाजता परत ये.’’ त्यानंतर पुन्हा चार-पाच तास शिकायला बसले. म्हणजे त्या पहिल्याच दिवशी त्यांनी १२ ते १४ तास रियाज करून घेतला.

काही वर्षानी ‘कलाविकास’ बंद पडली. या कंपनीचे पाच-सहा मालक होते. छोटा गंधर्व, केशवराव कुंटे, शंकर आपटे, हंसराज कोरडे, नागेश जोशी, दिगंबर भुमकर. त्यापैकी दोन-तीन जणांनी मिळून १९४९-५० दरम्यान ‘श्री.कलाविकास’ ही नवीन संस्था सुरू केली. त्यात छोटा गंधर्व आणि नागेश जोशी नव्हते. ‘देवमाणूस’ हे संगीत नाटक करायचं होतं. कुंटे यांनी या कंपनीसाठी गानू मास्तरांना ऑर्गनवादक म्हणून घेतलं.

पंधरा दिवस झाले तरी त्यांच्या हातात ती गाणी बसेनात. मग कुंटे म्हणाले, ‘‘तुळशीदास तू ही गाणी ऐकलीयेस. बघ जरा, बस साथीला.’’ पं.तुळशीदास बोरकर म्हणाले ‘‘मला दोन्ही हातांनी वाजवता येत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘चालेल, एका हाताने वाजव.’’ ते एका हाताने ती गाणी वाजवली. त्याबरोबर त्यांनी ओळखलं की हा मुलगा हे काम निभावू शकेल. मग त्यांनी ऑर्गनची बाजू पं.तुळशीदास बोरकर यांच्या वर ढकलली. या नाटकाच्या साथीसाठी २५ रुपये महिना पगार मिळाला होता. तेव्हापासून ते जो ऑर्गन वाजवू लागले तो कायमचा. त्यानंतर साधारण १९५२ साली छोटा गंधर्वानी पं.तुळशीदास बोरकर gov ‘यांच्या कडून ‘संगीत सौभद्र’ची १२-१३ गाणी बसवून घेतली. गोपीनाथ सावकारांची संस्था होती. मग दर आठवडय़ाला ते पुण्याहून मुंबईला यायचे.

पुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा. छोटा गंधर्वानी त्यांना रागदारी संगीत शिकवले. पण छोटा गंधर्व नाटकात गायलेले असल्यामुळे शास्त्रीय संगीत जगतात त्यांचं फारसं नाव नव्हतं. वास्तविक पाहता छोटा गंधर्व हा अतिशय हुशार माणूस. ते शास्त्रीय संगीत शिकले होते. पण शास्त्रीय संगीत गाणारी मंडळी संगीत नाटकातल्या गायक-नटांना दुय्यम मानत असत. त्यामुळे छोटा गंधर्वाचं शास्त्रीय संगीत गायक म्हणून फारसं नाव झालं नाही. त्या दरम्यानच त्यांना ‘मंदारमाला’ नाटकात ऑर्गन वाजवायची संधी मिळाली. चाळीस रुपये बिदागी मिळत होती. तिथे पं. राम मराठेंचा त्यांना सहवास लाभला. शास्त्रीय संगीत आणि नाटय़संगीत या दोन्हींवर त्यांची हुकूमत होती. लोक त्यांना मानत होते. ते त्यांच्या गायकीचा अभ्यास करत होते आणि त्यांना गुरू मानू लागले.

पुढे पं.तुळशीदास बोरकर यांनी पी. मधुकर (मधुकर पेडणेकर) यांच्या कडे शिक्षण घेतले. तसेच पं. एस. सी. आर भट, पं. के. जी. गिंडे यासारख्या अनेक मातब्बरांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं.

पं.तुळशीदास बोरकर मल्लिकार्जुनजी यांची आठवण सांगताना म्हणतात, १९७८-८०च्या दरम्यान मल्लिकार्जुन मन्सुरांचा सत्तरावा वाढदिवस पु. ल. देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली पाल्र्याच्या टिळक मंदिरात साजरा केला जाणार होता. त्या वेळी मल्लिकार्जुन मन्सुरांची हार्मोनियम मी टय़ून करून दिली होती. पु.ल. आणि मल्लिकार्जुनजी बेंगेरी आडनावाच्या गृहस्थांकडे गप्पा मारत बसले होते. तेवढय़ात मी आणि पन्नालाल घोष यांचे शिष्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर तिथे गेलो. पुलंनी मल्लिकार्जुनजींना माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘‘अण्णा, मुंबईचे जे दोन-चार ऑर्गनवादक आहेत, त्यांच्यात या पोराचा हात मला आवडतो.’’ त्याबरोबर मल्लिकार्जुन लगेच म्हणाले, ‘‘अरे, मग आज याला साथीला बसू दे.’’ पण त्या कार्यक्रमासाठी बबनराव मांजरेकरांना आधीच बुक केलं होतं. त्यामुळे मी साथ करण्याचा प्रश्नच नव्हता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या रांगेत सगळे मातब्बर कलाकार बसले होते. प्रेक्षकांची तुफान गर्दी होती.

पुलंच्या प्रास्ताविकाने छान माहोल तयार झाला आणि त्यानंतर मल्लिकार्जुनांचं गाणं होतं. मध्यांतरापर्यंत कार्यक्रम उत्तम झाला. पण बबनराव मांजरेकर डोंबिवलीला राहत असल्याने त्यांना दुस-या दिवशीच्या आकाशवाणी डय़ुटीसाठी लवकर निघावं लागणार होतं. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते थांबू शकत नव्हते. त्याबरोबर मल्लिकार्जुन मन्सुरांनी मला त्यांच्या साथीला बसायला सांगितलं. मला दरदरून घाम फुटला. लोकांकडेही बघायची माझी हिंमत नव्हती. पण मन्सुरांची आज्ञा होती. त्यामुळे मी साथीला बसलो आणि कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला. तो संपल्यावर मन्सुरांना तबला साथ करणारे निझामुद्दिन खान मला म्हणाले, ‘वाह बोरकर!’ मला आनंद झाला. बेंगेरीसाहेबांनी मला बिदागी दिली. घरी येऊन देवासमोर ठेवल्यानंतर बघतो तर त्या लिफाफ्यात ५०० रुपये होते. त्या काळात ५०० रुपये बिदागी म्हणजे खूपच मोठी किंमत होती. तसंच एकदा किंग जॉर्ज शाळेत ‘मानापमान’चा प्रयोग होता. त्या प्रयोगाच्या आधी ‘दे हाता या शरणागता’ या गाण्यातल्या अंत-याच्या ‘संपदा चपलचरणा’ या ओळीवर मी टाळी घेऊन दाखवेन, असं त्यांनी प्रयोगाच्या आधी सांगितलेलं. त्याप्रमाणे त्यांनी एक भलीमोठी हरकत घेतली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर तीच हरकत मी हार्मोनियम वर जशीच्या तशी वाजवली आणि त्यालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नाटकातल्या संगतकाराला अशी टाळी मिळणं फार दुर्मीळ. असाच आणखी एक अविस्मरणीय प्रसंग आहे. एकदा शोभा गुर्टूबरोबर मी लंडनला गेलो होतो.

पाच-दहा प्रोग्रॅम्सचा दौरा होता. शेवटच्या कार्यक्रमाच्या वेळी पं. रविशंकर प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी पं. रविशंकर यांना कार्यक्रमातल्या कलाकारांचा सन्मान करण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांनी कौतुकाने माझी पाठ थोपटली आणि म्हणाले, ‘‘बेटे, अच्छी संगत करते हो, बहुत अच्छे!’’ ज्या रविशंकरांना कार्यक्रमां मध्ये खूप ठिकाणी ऐकलं. पण त्यांना जवळून बघता येईल का, असा मी विचार करत असे, त्या रविशंकरांनी मला आशीर्वाद दिल्यानंतर मी धन्य झालो. पं. तुळशीदास बोरकर यांनी पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राम मराठे, पंडिता गंगुबाई हनगल, डॉ. प्रभा अत्रे यासारख्या दिग्गज कलाकारांना साथ केली आहे. पं.तुळसीदास बोरकर यांनी प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शन केले होते.

पं. तुळशीदास बोरकर यांना साहित्य कला अकादमीचा पुरस्कार दोन वेळा, ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’, ‘गोविंदराव टेंबे संगीतकार पुरस्कार’, ‘मा. दिनानाथ मंगेशकर स्मृती गुणगौरव पुरस्कार’, गोवा सरकारच्या सांस्कृतिक कलासंचनालयाचा राज्य पुरस्कार, भारत गायन समाजातर्फे देण्यात येणारा ‘पं. रामभाऊ मराठे पुरस्कार’, ‘चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केल आहे. संवादिनी वादनाकरिता सन्मानित केले जाणारे ते पहिले आणि मराठी मातीतले म्हणूनही ते एकमेव वादक होते. पं.तुळशीदास बोरकर यांचे निधन २९ सप्टेंबर २०१८ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..