पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती..!
रत्नकिळ फांकती प्रभा…!
ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे …
‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’
विजयनगरच्या सम्राटाला या सावळ्या ,साजिऱ्या विठ्ठलाची मोहीनी पडली त्याने हरण करुन विठ्ठलास कर्नाटकात नेले म्हणून तो कानडा का…?कि इथे या कानडा या शब्दाचा अर्थ न कळणारा ,अबोध ,दुर्बोध असा असावा ..? कर्नाटक, कर-नाटक ..म्हणजे भक्तांसाठी नाना प्रकारची नाटकं करणारा संभ्रम निर्माण करणारा तो , हे सगळं करुन शांतपणे विटेवर उभा राहीलेला आहे… आणि हा देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी ,असा निर्गुण ,निराकार,निर्र्मोही आहे साध्या भाजी -भाकरीवर राजी असणारा,साधी धोटी,चिंधोटी लपेटणाऱ्या भक्तांचा आहे.. अर्थ वेग- वेगळे पण तो विठुराया रत्नकिळकांच्या प्रभेनं झळाळतोय हे सत्यच अगणित तेज पुंजाळले त्याच्या सौंदर्याची प्रभा ,मनाच्या गाभाऱ्यात हीरा झळाळावा तशी झळाळती आहे … आणि भक्ती रुपातल्या प्रभेनं डोळे अक्षरशः दिपताहेत… एकनाथांंच्या आजोबांनी भानुदासांनी अथक प्रयत्नाने ,तपश्चर्येने विठुरायाला पुन्हा पंढरपुरात आणून स्थापन केलंय… म्हणून त्याचं वर्णन कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु केल्याची दाट शक्यता …
याची भक्ती करणं सोपं आहे का ..?तो आहे कसा ,दिसतो कसा ,उमजण्या पलीकडचा ..असावा का…? भक्ती रुपी मार्गावर या सावळ्या हरीला प्राप्त करण्या साठी काय करावं ,कशी त्याची आराधना करावी ,ते अव्दैताशी एकरुप होणं खरंच जमावं का हा प्रश्न मग… एखाद्या विरहीणी चा जन्म होणं स्वाभाविकच ..
तुझ्या भक्तींत आकंठ बुडालेली मी माझी अवस्था अशी करुन टाकली आहेस,या सावळ्या ,सुंदर रुपाची मोहीनी अशी पडलीय कि ‘दर्पणी पहाता रुप न दिसे वो आपुले ,बाप देवी रखुमा वरे मज ऐसे केले … दर्पणात पहायला गेले तर मला माझं रुपच दिसत नाहीये मला तुझं आणि तुझंच रुप फक्त दिसतंय ..इतकं वेड लावलं आहेस तू विठ्ठला .. ही माझ्या भक्तीची पराकोटी असावी का …?आणि मग तुझ्या भेटीसाठी आतुरलेलं मन इतकं केविलवाणं झालंय, इतकी विद्धता आलीय. इतकी दारुण अवस्था आहे माझी.. तुझ्याशी संवाद साधायचाय परमेश्वरा ,माझ्या व्यथा माझी दुःख सांगायची तरी आहेत पण हे ही असं घडतंय कि,’शब्देवीण संवादु, दुजेवीण अनुवादु ,हे तव तैसे निगमे..!’
संवाद हा दोघां मधला असावा लागतो किंबहुना गृहीत धरलं जातं तसं पण तुझ्यासमोर उभं राहीलं कि शब्दांची गरजच उरत नाही ..तो संवाद हा आत्मिक पातळीवर सुरू होतो आपला .. कुणी कुणाशी काय बोलायचं?कुणी कुणाला काय समजवायचं. . शब्द ही निःशब्द होतात तीथे प्रसंगी अनाहुत वाटतात…
म्हणजे वाणीच्या ज्या चार अवस्था सांगितल्या आहेत परा,वैखरी,मध्यमा,पश्चती.. यांतून जाण्याची गरजच भासत नाही ..न उच्चारताही शब्द, माझं मन तू जाणतोस तेवढी एकरुपता खरंच असावी .. हे अद्वैत फक्त तू आणि माझ्यातलं असतं.. अर्भकाला समजावून घेणं त्याच्या गरजा जाणून घेणं एखादी आई करते तद्वतच तू माझं केविलवाणं आर्जव ऐकतोस .. निःशब्दपणे.. डोळ्यांतून झरणारे अश्रू याची साक्ष देतील कदाचित….
तुला भेटण्याची ,तुला डोळ्यांत साठवून ठेवण्याची ती अनावर ओढ स्वस्थ बसु देत नाहीये … तुला पहाण्याची , आलिंगन देण्याची ईच्छा तीव्र होतीय पण हाय रे दैवा तुझं असणं हे संभ्रमित करतंय मला …
‘पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभाची स्वयंभू असे ..!
‘ क्षेमालागी उतावीळ मन माझे
म्हणुनी स्फुरताती बाहु …!’
तुला क्षेम (आलिंगन)देण्याची प्रबळ इच्छा , जेंव्हा उतावीळ होतो जीव तु कुठेच दिसत नाहीस पण प्रत्यक्ष स्वयंभू उभा रहातोस समोर .. तू कुठे नाही आहेस ..?आजूला ,बाजूला,आकाशी,पाताळी चहुबाजूला तर आहेस तुझं हे निराकार असणं मला सोसवत नाहीये … तुझ्या त्या सुंदर,सावळ्या साजिऱ्या रुपाचं वेड लागलंय मला ,गारुड घातलंयस मला .. फक्त एकच कृपा कर निदान तुझ्या चरणाशी लीन होण्याची सिद्धता तरी कर.. तुझ्याशी एकरुप होणं, अद्वैताचं हे असणं तरी मला उद्धरुन नेईल… एवढंच मागणं राहील माझं…
पहावा विठ्ठल..
पुजावा विठ्ठल…
स्मरावा विठ्ठल..
जगावा विठ्ठल…
अवघाची विठ्ठल..
देह व्हावा …
— © लीना राजीव.
फोटो सौजन्य – Internet
आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपवरील #महाचर्चा_आषाढी_पंढरी या महाचर्चेचा भाग असलेला लेख .
Leave a Reply