या दोन शब्दांचं अवघ्या महाराष्ट्रावर जी जादू आहे त्याला जगात कुठेच तोड नाही..रावा पासून रंका पर्यंत आणि मुख्यमंत्र्यापासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत या दोन शब्दांचं आणि त्यावरच्या भक्तीचं गारुड आहे..
शेक्सपिअरने नांवात काय असतं असं म्हटलं होतं. त्यानं असं का म्हटलं, ते मला सांगता येणार नाही पण नांवात बरंच काही असतं हा माझा अनुभव आहे. अन्यथा ‘विठ्ठल’ किंवा ‘पांडुरंग’ म्हटलं की जे रोमांचं मराठी माणसाच्या अंगामनात उमटतात, हात आपोआप जोडले जातात आणि मनातल्या मनात दंडवत घातलं जातं, ते का..?
कुणाला काय नांव कसं मिळालं याचा अंदाज बांधणं हा माझा छंद व या माझ्या सवयीस अनुसरून मी विठ्ठल, पांडुरंग या दोन शब्द-नामाचा मागोवा घेताना जे गवसलं, ते आज ‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने आपल्यासोबत शेअर करतोय.
‘पांडुरंग’ हा शब्द मूळ कन्नड ’पंडरगे’ या शब्दापासून तयार झाला आहे आणि हा शब्द ‘पांढरा’ म्हणजे सफेद या अर्थाचा आहे असं शब्दकोश सांगतो. Anemia या आजाराल माणूस, पांढऱ्या पेशींची संख्या वाढल्यामुळे, पांढरा पडत जातो व त्यासाठीच अॅनेमिया या व्याधील् मराठीत
’पांडुरोग’ म्हणतात. मग काळ्या विठ्ठललाला नेमक्या विरुद्ध अर्थाचं पांडुरंग असं नांव का बरं मिळालं असेल? तर, याचं उत्तर शब्दकोश आणि थोड्या तर्काने शोधता येतं.
हा ‘पांडुरंग’ शब्द जमीन या अर्थाचा आहे, असंही शब्दकोश सांगतो. जमीन मुख्यात: दोन प्रकारची असते, काळी आणि पंढरी. कोकण किनारपट्टीवर तांबडी जमिनही सापडते पण हा अपवाद. तर, काळी जमीन कसदार असून शेतीसाठी उत्तम समजली जाते, तर पांढरी जमीन मानवी वस्तीसाठी. आजवर जी मानवी वस्ती झाली, नदीच्या किमाऱ्याने आणि नदीची वाळु ही समुद्रासारखीच काळसर पांढरी किंवा पांढरी असते. आपली बहुतांश तिर्थक्षेत्र नदीच्या कुशीत जन्मलेली आहेत. चंद्रभागेच्या पांढऱ्या वाळुच्या आधाराने, काळ्या विठ्ठलाच्या ओढीने झालेली वसती, ती ‘पंढरी’ असं म्हणता येईल. ‘पांढर’पेशा ह्या शब्दाचा जन्मही या नदीकिनारच्या पांढऱ्या वाळूतून झाला आहे, असं शब्दकोश सांगतो.
आणि ‘विठ्ठल’नाम? विठ्ठलनामाचा उगम शोधताना मती गुंगं होते व शेवटी तुकोबारायांच्या’ “तुका म्हणे जे जे बोला,
ते ते साजे या विठ्ठला” या वचनापुढे नतमस्तक व्हावं लागतं. तुम्ही काय
म्हणाल ते विठ्ठलाला लागू होतं. ‘विठ्ठल’ हा शब्द ‘अट्टल’ या शब्दाचं स्वरूप आहे, असं शब्दकोश सांगतो. अट्टल म्हणजे मोठा, थोर. हे पूर्णपणे पटत नसलं तरी विठ्ठलाबद्दल जो भाव आपल्या मनात असतो, त्याच्या जवळपास जाणारा आहे.
कोणी त्याला विष्णुरूप मानलंय तर कोणी शिवरूप..विठ्ठलाच वैशिष्ट्य म्हणजे ज्याला जे जे रूप प्रिय त्या त्या रुपात हा विठ्ठल त्याला दिसतो..‘विठ्ठल’ हा शब्द नेमका कसा तयार झाला याचा शोध अनेकजण अजूनही घेत आहेत.. विठ्ठलाच मुळरूप अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
तो कोण याचा उहापोह न करता फक्त त्याच्या भक्तीरसात न्हऊन घेऊ आणि ज्ञानोबांच्या शब्दात म्हणू,
‘रूप पाहतां तरी डोळसु,
सुंदर पाहतां गोपवेषु ।
महिमा पाहतां महेशु,
जेणें मस्तकी वंदिला ।।’
विठ्ठल एक गूढ आहे आणि मला वाटत ते तसच राहू द्याव. गूढ गोष्टींचच आकर्षण माणसाला जास्त असते. एकदा का त्या गुढाचा उलगडा झाला, की त्याचं आकर्षण संपलंच समजा. तो कोणीही असला तरी आपला ‘मायबाप’ आहे हे जास्त खरं..आणि आईबापाचं कुळ ऋषीच्या कुळाप्रमाणे शोधायचं नसतं..!!
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply