आपापल्या महालात
तुम्ही सर्वेसर्वा असता,
मग तुम्ही पेशवे असा किंवा हुजरे
सरदार असा किंवा शिलेदार.
बाहेर पडल्यावर मात्र
तुम्ही बनता
जगातील कुणीतरी,
लहानमोठे.
कुणापुढे तरी
तुम्हाला
झुकावं लागतं .
पण ,
आणखी कुणाला तरी
तुम्ही
स्वत:पुढे वाकायला लावता .
आणि त्यामुळे ,
फक्त त्यामुळेच ,
तुम्ही
मोठे मोठे
बनत जाता –
डोंगराएवढे
पर्वताएवढे .
पण ,
तें मोठेपण
केवळ दरबारातच असतं
केवळ देवडीवरच रहातं .
रणशिंग फुंकलं जातं
आणि
तलवारी भाले उंचावून
सारेजण
स्वत:ला
लढाईच्या धुमश्चक्रीत
झोकून देतात
तेव्हां ,
शिलेदार काय
अन् पेशवा काय
सारे सारखेच असतात .
पानपतावर
एखादा बारगीर पडतो
तसाच
एखादा विश्वासरावही पडतो,
कुणाची तरी
निनावी गोळी लागून .
एखादा भाऊ सापडतो
दुश्मनांच्या भाऊगर्दीत,
आणि धराशायी होतो
कुणा अनामिकाच्या
तलवारीच्या फटकाऱ्यानं .
रणधुमाळीत
नसतात शिलेदार , नसतात पेशवे,
नसतात हुद्दे , नसतात नावें ;
असतात फक्त –
पेशवे आणि हुजरे यांना
एकाच पातळीवर आणून सोडणारी
अस्ताव्यस्त पडलेली शवें .
बस्स .
हेंच एक चिरंतन सत्य आहे ,
आणि हेंच आपण
ध्यानीं ठेवायला हवें,
यशाची उत्तुंग शिखरें चढतांना ,
जीवनाच्या पानपतावर
प्राणपणानें लढतांना ,
आणि ,
हिरवा चुडा फोडून टाकून
धाय मोकलून रडतांना देखील .
— सुभाष स. नाईक, सांताक्रुझ, मुंबई .
Leave a Reply