एक मानसोपचार तज्ञ तणावमुक्ती या विषयावर आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असते. त्या टेबलावर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवतात. मुलांना वाटते की आता त्या हा ग्लास अर्धा भरला आहे की अर्धा मोकळा असे विचारणार.
मानसोपचार तज्ञ मुलांकडे पाहून हसतात. त्या म्हणतात “तुमच्या मनात काय गोंधळ चालला आहे मला कळतो आहे. परंतु मी तुम्हाला हा ग्लास भरला आहे की मोकळा हे विचारणार नाही. मी तुम्हाला असे विचारणार आहे की या ग्लासचे पाण्यासकट वजन किती असेल? ”
सगळी मुले आपापले तर्क लढवू लागतात. तीस मिलीग्राम पासुन सुरुवात होऊन ती शंभर मिलीग्रामपर्यंत अंदाज बांधले जातात. ज्याला त्याला उत्सुकता असते की कोणाचे उत्तर बरोबर आहे.
मानसोपचार तज्ञ मुलांना सांगते की मी तुम्हाला हा प्रश्न उगाच विचारला. वास्तविक मला तुम्हाला हे सांगायचे आहे की हा ग्लास, त्याचे जे काय वजन असेल त्यासकट मी हातात धरला तर काय होईल? मी जर काही क्षण हा ग्लास धरला तर काहीच होणार नाही. मला त्याचे वजन जाणवणार नाही. मी पाच मिनिटे हा ग्लास धरुन ठेवला तर माझा हात अवघडेल. एक तास धरला तर मी अस्वस्थ होईन. एक दिवस धरला तर माझा हात सुन्न होईल. याचाच अर्थ त्या ग्लासच्या वजनाला फारसे महत्व नाही. महत्व याचे आहे की तो ग्लास आपण किती वेळ हातात धरतो.
आपल्या तणावाचेही तसेच असते. आपण थोडावेळ आपल्या अडचणींचा किंवा तणावांचा विचार केला आणि सोडून दिला तर काहीच होत नाही. आपण खूप वेळ विचार केला तर आपल्याला डोकेदुखी सुरु होते. काही दिवस तो ताण मनात ठेवला तर निद्रानाश होतो. आणखीन काही दिवस गेले की आपल्याला तऱ्हेतऱ्हेचे मानसिक विकार व्हायला लागतात.
आपली वजन घेण्याची क्षमता मग ती मानसिक वजन घेण्याची किंवा ताण घेण्याची असो, मर्यादित असते. त्यापलिकडे गेली की आपले मानसिक संतुलन बिघडायला लागते. प्रत्येकाने माझ्या या वक्तव्याचा खोलवर विचार करा. तुम्हाला लक्षात येईल की मी काय म्हणते आहे.
मानसोपचार तज्ञ बाईने एक चांगला धडा खूप सोप्या शब्दांत आणि सहजपणे आपल्यालाही शिकविला. आपण आपल्या समस्यांचा जेवढा विचार करत राहू तेवढा आपल्याला त्याचा त्रास होत रहातो. त्यापेक्षा ज्यांच्यामुळे आपल्या मनावर ताण येत आहे त्या समस्या कशा सोडवायच्या याचा विचार करणे अधिक योग्य आहे. त्यामुळे आपला ताण आपोआप कमी होऊ लागतो. आपल्याला त्या ताणावर मार्ग शोधण्याचा अधिक चांगल्या पध्दतीने विचार करता येतो. पाण्याच्या ग्लासचे उदाहरणही अगदी योग्य होते. खरोखरच आपण छोटी समस्या बराच वेळ धरुन बसलो तर आपलाही हात किंवा पर्यायाने डोके सुन्न होऊन जाते.
या गोष्टीवरुन आपण नेमके किती ताण कितीवेळ सांभाळतो आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply