पाण्यात वेगवेगळे पदार्थ मिसळून मऊसर, ओलसर तयार केलेला पदार्थ म्हणजे ‘लगदा’ होय. कागद तयार करण्याच्या पद्धतीत लगदा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लगदा हा मुख्यतः तीन प्रकारचा असतो.
लगद्याच्या पहिल्या प्रकारात लाकडाच्या भुश्यामधे फक्त पाणी घालून तो तयार करतात. लाकडातील लिग्निन, हेमीसेल्यूलोजसारखे नैसर्गिक पदार्थ आणि अनावश्यक पदार्थ लगद्यातून काढून टाकले जात नाहीत तसेच कोणतेही रासायनिक पदार्थ घातले जात नाहीत. या प्रकारचा लगदा ‘यांत्रिक हा लगदा’ होय. लगद्यावर यांत्रिक प्रक्रिया करून कागद तयार केला जातो. हा फागद, वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरतात.
दुसऱ्या प्रकारचा लगदा तयार करण्यासाठी, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे पदार्थ वापरले जातात. सुरुवातीला कापडाच्या चिंध्या रंगीत असतील तर क्लोरिन वायूने त्या चिंध्या धुतात. लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये सेल्यूलोजचे तंतू असतात. शिवाय लिग्निन, रेझीन, मेण, असे इतर पदार्थसुद्धा असतात. यातील लिग्निन, रेझीन, मेण हे पदार्थ लगद्यामधून बाहेर काढावी लागतात. त्यासाठी सर्व लगदा पापडखाराच्या पाण्यात टाकून शिजवितात. पापडखारात शिजवल्यामुळे लगद्यातील मळ निघून जातो. हा ‘अर्ध रासायनिक लगदा’ होय. या लगद्यापासून मिळणारा कागद मध्यम प्रतीचा असतो. या कागदाचा कारखान्यातील काही वस्तूंची बांधाबांध करण्यासाठी होतो.
तिसऱ्या प्रकारच्या लगद्याला ‘रासायनिक लगदा’ म्हणतात. रासायनिक लगद्यामधील रसायनांमुळे लिग्निन हा पदार्थ विरघळतो. या प्रक्रियेला पाचन क्रिया म्हणतात. या प्रक्रियेत कपड्याचे तुकडे, गवत, झाडाच्या साली सर्व एकत्र करून कॉस्टिक सोडा आणि सोडियम सल्फाइड यांच्या द्रावणांमध्ये पाचक यंत्रात तीन तास शिजवितात. पाचक यंत्रामध्ये शिजवलेला लगदा काळा असतो. हा लगदा पहिल्यांदा पाण्याने आणि नंतर क्लोरिन या विरंजकांनी स्वच्छ धुतात. या क्रियेनंतर स्वच्छ पांढरा लगदा मिळतो. रसायनांचे प्रमाण जास्त झाले तर सेल्यूलोजचे तंतू तुटतात. त्याचा परिणाम कागदाच्या गुणवत्तेवर होऊन तो ठिसूळ होतो. रासायनिक लगद्यापासून तयार झालेला कागद लिहिण्यासाठी वापरतात.
कागद कारखान्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या लगद्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रतीचे कागद मिळतात.
सुचेता भिडे, (कर्जत)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply