ज्याला मी “निळ्या डोळ्यांचा जादूगार ” म्हणतो त्या राज कपूरला सतत भव्यतेचे उत्कट वेड होते. त्याअर्थाने त्याने ७० एम एम पेक्षाही भव्य दिव्य स्वप्नप्रसंग चित्रित केले. केव्हढा आवाका असलेला हा कलावंत – निर्मितीत कोठेही तडजोड न करणारा.
” आवारा ” – त्याच्या स्वप्नदृष्याला आजही कोणी पछाडू शकलेले नाही. त्याची एक भ्रष्ट आवृत्ती त्याने “सत्यम शिवम ” मध्ये जरूर सादर केली. ( मुकेश चे ” चंचल शीतल निर्मल कोमल ” – आठवतंय कां ?)
” जिस देशमे ” च्या “आ अब लौट चले ” मध्ये या भव्यतेला मोहक परिमाण दिलंय.
हे गीत जितके श्रवणीय तितकेच प्रेक्षणीय आहे. श्वेत धवल च्या जमान्यातील हा आर के चा वेगळा आणि शेवटचा चित्रपट !
बावळा -भाबडा दाखविण्याच्या नादात तो कुठेकुठे थोडासा विदुषकी दिसतो. पण त्याच्या पोतडीत असे वेगळे प्रयोग असायचे. डाकूंना जगण्याकडे वळविण्यासाठी तो मानसोपचाराच्या मार्गाचा खुबीने वापर करतो. गिरोहाच्या सरदाराचे आणि नायिकेचे मन जिंकतो आणि बलाढ्य प्राणला नामोहरम करतो. प्रेम आणि मृत्यू यांमध्ये लोंबकळणाऱ्या जीवांना तो प्रेमाच्या आणि जगण्याच्या मार्गावर आणतो.
भलं मोठं माळरान ! एका बाजूने राज आश्वस्थ,विजयाचे किंचित स्मितहास्य घेऊन आणि प्रयत्नांच्या सार्थकतेबद्दल काहीसा निश्चिन्त निघालाय – पाठीमागे जत्था ! तो जत्था अद्यापही साशंक असावा, भवितव्य प्रश्नांच्या उदरात असावे, कदाचित अपरिहार्यतेने राजच्या मागे निघालेले. राजच्या शब्दाशब्दांमध्ये मोटिव्हेशन – नव्या पूर्वदिशेची स्वप्ने आणि मुकेशचा कन्विन्सिंग आवाज. सर्वात शेवटी फरफटत निघालेला प्राण- पर्याय संपल्याने !
दुसऱ्या बाजूने पद्मिनी पोलिसांसह. तीही साशंक आणि बावचळलेली. पण त्याच्या आवाजात आवाज मिसळणारी.
खूप ट्रक, माणसंच माणसं (पोलीस,डाकू ) आणि पार्श्वभूमीला अथांगता – या साऱ्या प्रयोगाला आशीर्वाद देणारी ! समूहस्वरांनी (कोरस ) आवश्यक खोली प्रदान केलीय. शंकर -जयकिशनने साजेसा ऑर्केस्ट्रा बहाल केला, कोठेही लाऊड न होता.
गाण्यात सगळ्यावर मात करते ती लताची तान. लता लता कां आहे, हे आजवर ज्यांनी ज्यांनी ऑर्केस्ट्रामध्ये हे गाणं गाण्याचा प्रयत्न केला आहे किंवा यू -ट्यूब वर अपलोड करण्याचे धारिष्ट्य केलंय त्यांना कळलंय. त्या स्वरांना फक्त आणि फक्त आकाशीच्या विजेची उपमा देता येईल. फक्त ही वीज कमालीची सुश्राव्य आहे, कोठेही कानाला त्रासदायक ठरत नाही. उलट हे आळवणं, अख्ख गाणं निश्चिन्तपणे पदराआड घेतं- जसं गंगेने या भारतवर्षाला कवेत घेतलंय तसं !
सकारात्मकता आणण्यासाठी शैलेंद्रने केलेली शब्दरचना अभ्यासनीय आहे. सगळे चांगले घटक एकत्र येऊन या उजेडाकडे निघालेल्या जत्थ्याला “शुभास्ते पंथानः सन्तू ” असा आशावाद प्रदान करतात आणि गाण्याचं काम संपतं.
चाळीस वर्षे फक्त ते आपल्या यादीत अग्रक्रमावर राहातं. आणि अजून किती वर्षे असेल हे माहित नाही.
राज कपूरच्या गाण्यांचं वय ठरविता येत नाही.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply