जीवन हर घडिला अवलंबूनी, आहे दूजावरी
व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी
नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या
शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या
माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता
तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता
घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी
समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी
वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा
हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा
मृतदेह जर तसाच पडला, किडे मुंग्या खाती
त्याही क्षणी मदत लाभूनी, चिता-अग्नी देती
जन्मापासूनी मृत्युपर्यंत, परावलंबी जीवन
कुणी तरी दिले तुजसाठीं, हे घे जाणून
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply