श्री आदिशंकराचार्यांनी रचलेल्या या स्तोत्रात केवळ तीनच श्लोक आहेत. पाठकाचे कायावाचामने अत्युच्च तत्त्वाचे चरणी समर्पण करण्याचा त्याचा उद्देश आहे.
दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या मनात येणा-या विचारांचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत असतो. जर आपण ते विचार पवित्र व स्वर्गीय करू शकलो तर आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने आपली नक्कीच वाटचाल होईल. या दृष्टीने ही पहाटेस करावयाची प्रार्थना निश्चितच महत्त्वाची आहे.
या श्लोकांमध्ये अद्वैत वेदांताचे सार (सत्- चित् आनंद) मांडले आहे. जीवात्म्याच्या निरनिराळ्या अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ति अशा आहेत. पहिली विष्णूची व सत्व गुणाची, दुसरी ब्रह्मदेवाची व रजोगुणाची, तिसरी शिवाची व तमो गुणी. यांखेरीज तुरिया व उन्मनी अशाही दोन अवस्था आहेत. त्यामुळे श्रेष्ठ योगीजनां (परमहंस) साठी चौथा पल्ला ‘तुरीय’ अवस्था ठरतो. तथापि या अवस्था जीवात्म्याच्या असल्याने ब्रह्माला लागू नाहीत व त्याकारणे त्याचे वर्णन ‘नेति- न इति – हा तो नव्हे’ असे केले जाते. आत्मा शरीरापासून भिन्न आहे. हे जग ज्या पाच मूलतत्त्वांपासून बनले आहे त्यापासूनही तो वेगळा आहे. जमिनीवर पडलेल्या दोरीला पाहून जसा सर्पाचा भास होऊ शकतो, तसेच हे विश्वही आभासी आहे. परंतु ज्ञानरूपी सूर्याचा उदय होताच त्याचा निरास होतो व आयुष्य सफल होते.
हे तीनही श्लोक वसंततिलका वृत्तात रचले असून चौथा अनुष्टुभ छंदात आहे.
जुन्या काळी आकाशवाणीवर ‘गांधी प्रार्थना’ कार्यक्रम प्रसारित केला जाई. त्याच्या सुरुवातीला हे तीन श्लोक म्हटले जात. हे त्या जमान्यातील श्रोत्यांना नक्कीच आठवेल.
प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं
सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् ।
यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं
तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्घः ॥१॥
मराठी- मी पहाटेस चित्तामध्ये फुलणा-या आत्मतत्त्वाचे, जे आस्तित्वस्वरूप, प्रज्ञास्वरूप व आनंदस्वरूप असून सर्वश्रेष्ठ योगीजनांचे चतुर्थ पातळीचे प्राप्य स्थान आहे, जे जागृति, स्वप्न आणि गाढ झोप या अवस्थांना नेहेमीच जाणते, त्या अक्षुण्ण परब्रह्माचे स्मरण करतो, या पंचभूतात्मक समूहा (शरीरा) चे नव्हे.
होता सकाळ स्मरतो, उमले मनी त्या
सच्चितसुखास, स्थितिला मुनिच्याहि चौथ्या ।
ज्या स्वप्न जाग निजणे कळते सदाचे
ते ब्रह्म पूर्ण, न च गाठण हे भुतांचे ॥ १
टीप- सर्व विश्वव्यापी पुरुष, ब्रह्माच्या स्वरूपाचे वर्णन सच्चिदानंद (सत् चित् आनंद – सत्य किंवा आस्तित्त्व, प्रज्ञा किंवा मती व आनंद) असे केले जाते.
प्रातर्भजामि मनसो वचसामगम्यं
वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण ।
यन्नेतिनेतिवचनैर्निगमा अवोचु-
स्तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यम् ॥ २॥
मराठी- मी पहाटेस मन आणि वाणी यांच्या आवाक्याबाहेर असणार्याे, ज्याच्या कृपेने संपूर्ण वाणी झळाळून उठते, शास्त्रे ज्याचे वर्णन ‘हा तो नव्हे हा तो नव्हे’ असे करतात त्या अजन्मा देवांच्या देवाला अग्रणी अच्युताला भजतो.
भानूदयी भजत मी मन आणि वाचा
यांच्या पल्याड, झळके कृपया जयाच्या ।
वाणी समस्त, ‘नच हा’ म्हणती श्रुती त्या
देवाग्रणी प्रमुख, जन्म न केशवा ज्या ॥ ०२
टीप- येथे ‘मनसो वचसामगम्यं’ ऐवजी ‘ मनसा वचसामगम्यं असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास ‘मी मनापासून, वाणीच्या अवाक्याबाहेर असणा-या’ असा अर्थ होईल.
प्रातर्नमामि तमसः परमर्कवर्णं
पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम् ।
यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ
रज्ज्वां भुजङ्गम इव प्रतिभासितं वै ॥३॥
मराठी- ज्याला पुरुषोत्तम असे संबोधतात, त्या अंधारापलिकडील, सूर्याप्रमाणे तेजस्वी, चिरस्थायी, ज्या संकल्पनेमध्ये हे संपूर्ण विश्व एखाद्या दोरीमध्ये साप दिसावा तसे व्यक्त होते, त्या सर्वोच्च (अशेषमूर्ती – आत्मा नामक) संकल्पनेला मी सकाळी नमस्कार करतो.
त्यागी तमास तपनासम तेज त्याचे (तपन – सूर्य)
संपूर्ण, स्थान नित ज्या पुरुषोत्तमाचे |
दोरीत विश्व जणू पन्नग व्यक्त जेथे
सूर्योदयी जुळतसे करयुग्म तेथे ॥ ३
टीप- चौथ्या चरणातील दोरी आणि साप हे रूपक अशेषमूर्ती आत्मा व विश्व यांच्याशी संबंधित आहे. अंधकारमय प्रदेशात प्रकाशाच्या अभावामुळे दोरीच्या ठिकाणी सर्पच आहे अशी फसगत होते, त्याचप्रमाणे अज्ञानाच्या अंधकारात आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान न झाल्याने आत्म्याच्याच ठिकाणी हे सर्व विश्व आहे अशी भावना होते असा याचा भावार्थ.
श्लोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रयविभूषणम् ।
प्रातःकाले पठेद्यस्तु स गच्छेत्परमं पदम् ॥४॥
मराठी- तिहीं लोकांना भूषणास्पद आणि पुण्यप्रद असलेले हे तीन श्लोक जो पहाटे पठण करतो तो सर्वोच्च पदाप्रत जातो.
पुण्यदायी तीन लोकी भूषणास्पद गातसे
तीन श्लोकां जो पहाटे पदा अत्युच्च जातसे ॥ ४
॥ श्रीमद शंकराचार्य विरचित परब्रह्माचे प्रातःस्मरण स्तोत्र समाप्त ॥
******************************
धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
फारच सुरेख भाषांतर आणि मराठी काव्र रूपांतर