परळला वाडिया हॉस्पिटलच्या समोर एका चाळीत आम्ही राहात असू. वाडिया हॉस्पिटलहून थोडं पुढे गेलं की के.इ.एम. हॉस्पिटल येतं. सुप्रसिद्ध हाफकिन इन्स्टिटयूट के.इ.एम.च्या शेजारीच आहे. याशिवाय टाटा कॅन्सर आणि बच्चूभाई डोळ्यांचे हॉस्पिटल ही देखील जवळपासच आहेत. यात भर म्हणजे जनावरांचं बैलघोडा हॉस्पिटलही परळचंच. सर्व हॉस्पिटल जवळजवळ एकाच परिसरात येत असल्याने आमच्या घरासमोरचा रस्ता नेहमी गजबजलेला असे. पेशंटस, त्यांचे नातेवाईक, मेडिकलचे विद्यार्थी, नर्सेस या सर्वांचीच रस्त्यावर लगबग असे. धन्यासोबत बैलघोडा हॉस्पिटलकडे जाणारी जनावरेही अधूनमधून दिसत. सकाळी अगदी सातपासून चाळीपुढच्या फूटपाथवर रहदारी सुरु होई.
समोरच्या वाडिया हॉस्पिटलचे मॅटरनिटी हॉस्पिटल आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असे दोन विभाग होते. या हॉस्पिटलचे घुमट दूरवरुन नजरेत येत. हॉस्पिटलच्या मागल्या बाजूस नर्सेस क्वार्टर्स आणि नर्सेसच्या जेवणाखाण्यासाठी एक मेस होती. संपूर्ण परळमध्ये हा परिसर मात्र अगदी शांत भासे. शाळेत असताना आम्ही अनेकदा अभ्यासासाठी या मेसच्या आवारात जात असू. गंमत म्हणजे तिथे जाण्यास आम्हाला कधीच कोणी अटकाव केला नाही. उलट तिथल्या सिनिअर सिस्टर्स आम्हाला प्रेमाने चहापाणीही देत असत. शाळेचे दिवस आठवले की तो मेसचा परिसर आणि त्या प्रेमळ सिस्टर्स लगेचच आठवतात. परळच्या या हॉस्पिटल्समध्ये सुखसुविधांची वानवा असतानाही गोरगरीब रोग्यांना उत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असे. साहजिकच या हॉस्पिटल्समध्ये केवळ मुंबईतीलच नव्हे तर बाहेरगावातील पेशंटसचीही रीघ लागलेली असे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर वामनराव महाडिक, विजय पर्वतकर असे अनेक कार्यकर्ते रोग्यांची देखभाल करण्यासाठी या हॉस्पिटल्समध्ये आवर्जून फेरी मारत आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी परळ लालबागमधील जनतेच्या मनात आपुलकीचं नातं जोडलं गेलं. शिवसेनाला परळ लालबागमध्ये जम बसविण्यात हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरला हे इथे आवर्जून नमूद कारवंसं वाटतं.
हॉस्पिटलप्रमाणे परळमध्ये देवळेही बरीच होती. आमच्या घराच्या थोडं पुढे दत्ताचं देऊळ होतं. याच देवळात मारुतीचंही छोटं देवस्थान होतं. शाळेत परीक्षांच्या दिवसात आमची या देवळातली फेरी ठरलेली. दत्ताच्या देवळाच्या थोडं पुढे जयकरांचं विठ्ठल मंदिर होतं. संपूर्ण परळभर हे मंदिर जयकरांचं देऊळ म्हणूनच ओळखलं जाई. मनवमीच्या दिवशी या देवळात मोठा उत्सव भरत असे. या उत्सवात रामासाठी पाळणाही सजवीत असत. सोहळा संपल्यानंतर सुंठवडयाचा प्रसाद हातावर पडे. त्या सुंठवडयाची चव अजूनही जीभेवर रेंगाळतेच आहे.
परळमधील कामगार मैदान व नरे पार्क या दोन मैदानंचीही आपल्याला नोंद घ्यावीच लागेल. आर.एम. भट हायस्कूलसमोरील कामगार मैदान आणि शिरोडकर हायस्कूलच्या मागील बाजूस असलेलं नरे पार्क या मैदानांनी अनेक राजकीय उपथापालथी अनुभवल्या. परळ लालबागसारख्या कामगार वस्तीत कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक महत्त्वपूर्ण सभा या मैदानांवरच गाजल्या. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड देसाई अशा अनेक समाजवादी नेत्यांच्या घणाघाती भाषणांनी या मैदानांचं नाव सर्वतोमुखी झालं. मात्र पुढे याच मैदानात सभा घेऊन शिवसेनेने आपलं बस्तान बसविण्यास सुरुवात केली व प्रचलित सामाजिक परिस्थितीमुळे त्यात त्यांना यशही लाभलं. अर्थात या सभा संध्याकाळनंतर होत. दिवसभर मात्र या मैदानांवर मुलांचा धुडगूस चाले. कामगार मैदानात संध्याकाळी चार नंतर लाऊडस्पिकरवरुन गाणीही वाजविली जात. येऊ कशी कशी मी नांदायला, गेला हरी कुणा गावा, चल ग हरिणी तुरु तुरु अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली ती या कामगार मैदानावरील जाहीर प्रसरणांमुळेच.
परळच्या आठवणी सांगताना तिथल्या काही लोकप्रिय उपहारगृहांविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाही. दूध आणि मिठाईचे पदार्थ यांसाठी परळच्या नाक्यावरील सांडू आणि धूपकरांची दुकानं सर्वमान्य ठरली होती. या दुकानांतील दुधी हलवा- आणि गुरुवारी घरच्या देवांसमोर दाखविण्यासाठी -पेढे- यांना मोठी मागणी लाभत असे. तेच भाग्य अर्थातच पियुषलाही लाभलं होतं. मुंबईत उडप्यांनी संसार उघडला तेव्हा वाडिया हॉस्पिटलसमोरील मिनाक्षी भुवन दाक्षिणात्य पदार्थांची फौज सर्वप्रथम परळमध्ये उतरवली. उपमा, इडली, मसाला डोसा या पदार्थांची ओळख मिनाक्षी भुवननेच प्रथम परळच्या मराठमोळ्या कामगारांना घडविली. परळच्या नाक्यावरलं फिरदोसी हे इराणी रेस्टॉरंट मुंबईच्या तमाम इराणी हॉटेल्सचं प्रतिनिधित्व परळमध्ये करी. ब्रून मस्का, बन मस्का, प्लमकेक, पुडिंग, ऑम्लेट या पदार्थांची रेलचेल असलेलं हे हॉटेल निरुद्योगींच्या गप्पटप्पांचं माहेरघर मानलं जाई. याशिवाय के.इ.एम. हॉस्पिटलच्या रस्त्यावर मेडिको डायनिंग या नावाची एक गुजराथी खानावळ होती. या खानावळीत गुजराथी थाळी अगदी माफक दरात मिळे. या थाळीतील गरमागरम पुलके आणि अप्रतिम चवीची डाळ यांनी अख्ख्या परळला वेड लावलं होतं. याशिवाय काही मोजक्या हॉटेल्समध्ये मालवणी मांसाहारी पदार्थांनी संबंधीतांशी जिव्हाळ्याचं नात जोडलं होतं. एकदोन मुलतानी हॉटेल्समधील खिमा, चिकन आणि नान परळच्या घराघरात पोहोचले. गौरीशंकर छितरमल मिठाई वाल्याकडील बंगाली मिठाई आणि काही दूधवाल्यांकडची जिलेबी यांनीही परळच्या रहिवाशांच्या घरात मानाचं पान पटकावलं होतं.
परळचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व धर्माचे आणि प्रांतांचे लोक गुण्यागोविंदाने राहात. चित्रा सिनेमाच्या जवळ मुसलमानांची वस्ती होती, हिंदमाता सिनेमाजवळ ख्रिश्चन धर्मियांचं प्रशस्त चर्च होतं आणि त्यांची सोसायटीही होती. बच्चूभाई हॉस्पिटलजवळ अनेक चाळींमध्ये ज्यू बांधव राहात. गुजराथी मंडळी तर जवळजवळ प्रत्येक चाळीत स्थिरावली होती व त्यांची मुलं अस्खलीत मराठी बोलत. जवळजवळ प्रत्येक चाळीखाली एका मारवाडयाचं दुकान असे व दुकानातच आतल्या बाजूस संसारही थाटून राहात असे. शिरोडकर हायस्कूल शेजारीच ख्रिश्चन समाजातील एका विशिष्ट गटाचं प्रार्थना मंदिर होतं. या हॉलवरील ‘ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला’ ही पाटी परळमधील सर्व रहिवाश्यांना परिचित होती.
सुमारे तीसएक वर्षांपूर्वी आम्ही परळ सोडलं आणि उपनगरात आलो. आता कधीतरी काही निमित्ताने परळला फेरी होते. या फेरीत परळचा चेहरामोहरा बदलत असल्याचं जाणवतं. सांडूंच्या उपहारगृहाजागी आता कपडयाचं दुकान आलं आहे. नाक्यवरला इराणी आता ग्रिटिंग कार्डस विकतो तर के.इ.एम. समोरच्या इराण्याने औषधांचं दुकान थाटलं आहे! सूर्या सिनेमाच्या जागी आता भव्य इमारत उभी राहिली आहे तर हिंदमाता सिनेमा शॉपिंग मॉल बनला आहे. परळच्या बाह्य रुपात अनेक बदल घडत आहेत. लालबागला आता चाळींच्या जागी गगनचुंबी इमारती येत आहेत. काही वर्षांत तोच प्रकार परळमध्ये सुरु होईल. आमचेही परळशी असलेले ऋणानुबंध आता तुटले आहेत. शिवसेनेच्या भाषेत सागायचं तर आम्ही परळमध्ये आता उपरे झालो आहोत. परंतु परळच्या रस्त्यांवरुन पुढे जाताना जुनं परळ डोळ्यांसमोर येतं. या आमच्या परळचा चेहरामोहरा तोच असतो. ओळखीचा. त्या परळच्या अंतरंगात कुठेतरी आमचाही चेहरा लपलेला असतो. आम्ही सर्वार्थाने परळमय होऊन गेलेलो असतो…
कायमचेच!
-सुनील रेगे
Leave a Reply