भारताची भूमी आध्यात्मप्रवण आहे. भारतीय लोक स्वभावतःच धर्मनिष्ठ आणि पापभीरू आहेत. देवावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. इथे अनेक देवदेवता आणि त्यांची देवळे आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश-श्रीकृष्णा… प्रमाणेच इथे ‘श्रीगणपती’ या देवालाही लोकमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. गणांचा अधिपती म्हणून याला गणपती म्हणतात. कुणी सुखकर्ता तर आणखी कुणी विघ्नहर्ता असेही म्हणतात. गणपतीला बुद्धीची देवता म्हणूनही गौरविले जाते. ‘गणेश पुराणा’त वर्णिलेली गणपतीची जन्मकथा सर्वश्रुतच आहे. घराघरातल्या प्रत्येक शुभकार्याची सुरुवात अधी गणेशाची पूजा करून मगच करावी असा प्रघात आहे. लोक तो अपार भक्तीभावाने मनापासून पाळतात.
अशा या गणपती देवतेची आठ प्रमुख तीर्थस्थळे महाराष्ट्रात विशेष ख्याती पावलेली आहेत. आठही देवस्थानांचा गेल्या काही दशकात खूपच प्रचार-प्रसार होत आला आहे. अष्टविनायक यात्रा’ अशा नावाने ही आठ ठिकाणे वर्षभर अखंड गजबजलेली पहायला मिळतात. देहू-आळंदी-पंढरपूर-शिर्डी इतकेच अष्टविनायकांना सुद्धा पवित्र तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्राप्त झाले आहे.
प्रत्येक गणेशस्थळाशी पौराणिक आणि ऐतिहासिक कथा-दंतकथा वा आख्यायिका निगडीत आहे. त्या त्या गणेशस्थळाचे स्थानमहात्म्य सांगणाऱ्या लहान पुस्तिकाही त्याच जागेवर उपलब्ध आहेत. त्यात पूजाविधी, पुजारी, पूजासाहित्य, प्रवासमार्ग व साधने आणि अन्य सोयी-सुविधा इत्यादी सर्व गोष्टींचा तपशील दिलेला आढळतो. प्रत्येक गणेश देवस्थान परिसरात नाना दुकाने गरजेच्या वस्तूंनी आणि पूजासाहित्याने नटलेली असतात. भाविकांसाठी भोजनालये आणि खाद्यपदार्थांची लहान-मोठी हॉटेल्स देखील सर्वच ठिकाणी भरभराटलेली पहायला मिळतात.
अष्टविनायक देवस्थानांची वर उल्लेखिलेल्या उपलब्ध माहिती पुस्तिकांच्या आधारे येथे थोडक्यात जरूर ती नोंद घेणे विषयोचित ठरेल असे वाटते. अष्टविनायक दर्शनार्थ प्रस्थान ठेवताना त्या प्राचीन श्लोकाचे स्मरण होते. तो श्लोक असा:
“स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः ।
बल्लाळस्तु विनायकस्तथ मढे चिंतामणे स्थेवरे ।।
लेण्याद्री गिरिजात्मकः सुवरदो विघ्नेश्वर श्रोझरे ।
ग्रामे रांजणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम् ।।
” वरील श्लोकात उल्लेखिलेल्या आठ गणपतींची नावे अशी आहेत.
१. मोरेश्वर, २. सिद्धीविनायक, ३. बल्लाळेश्वर, ४. विनायक, ५. चिंतामणी, ६. गिरिजात्मक, ७. विघ्नेश्वर, ८. महागणपती.
महाराष्ट्रातल्या आठ प्रमुख गणपती देवस्थानांपैकी एकूण पाच गणेश मंदिरे पुणे जिल्ह्यात असून, रायगड जिल्ह्यात दोन आणि अहमदनगरमध्ये एक मंदिर आहे. केवळ महाराष्ट्रातले मराठी भाषिकच नव्हे तर देशातल्या अन्य राज्यातले असंख्य गणेशभक्त इथल्या अष्टविनायकांच्या दर्शनासाठी ये-जा करीत असतात. प्रत्येक देवस्थानची सर्वांगीण माहिती ज्यात आहे अशा अनेक लहानमोठ्या पुस्तिका त्या त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या आढळतात. पुण्याच्या मे. आदर्श प्रकाशनातर्फे सर्वश्री देवळे व टोळ नामक संपादकांची माहितीपर पुस्तिका विशेष उल्लेखनीय आहे.
महाराष्ट्रातल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्राचे स्थानमहात्म्य गणेशभक्तांना रोचक वाटेल असा विश्वास वाटतो.
पुणे जिल्ह्यातल्या पाच गणपती देवस्थानांची माहिती प्रथम लक्षात घेऊया:
१. तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील ‘मोरगाव’चा मयुरेश्वर नामक गणेश आठातला सर्वाधिक प्रमुख मानला जातो. हे एक छोटेसे खेडंच आहे म्हणाना. या गावात पुरातन काळात मोरांचे विपुल कळप विहार करीत असत. गावाचा आकारही मोरासारखाच म्हणून मयुरेश्वर नाव पडले असावे असे सांगतात. मयुरेश्वर हे मंदीर कहा नदीकाठी असून बिदरच्या बादशाही काळातले बांधकाम मुस्लीम स्थापत्त्यशैलीत झाले आहे. बहामनी राजवटीत आढळणाऱ्या दर्ग्याप्रमाणे या देवस्थानची रचना आहे. मयुरेश्वराची बैठी मूर्ती डाव्या सोंडेची असून गाभाऱ्यापुढचा सभामंडप ऐसपैस आहे. चहूबाजूंनी गजाननाच्या लहान लहान आठ मूर्ती कोनाड्यात विराजमान आहेत.
समर्थ रामदासस्वामी मोरगावी आले असताना त्यांना ‘सुखकर्ता दुखहर्ता ही आरती स्फुरली असे सांगतात. कोण्या एकेकाळी झालेल्या दैत्यांच्या लढाईत, मोरावर बसून गणेशाने दैत्याचे पारिपत्य केले म्हणून इथल्या गणपती देवस्थानाला मोरगावचा मयुरेश्वर असे नाव पडले.
२. पुणे शहरापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरचे थेऊर नामक गाव पेशवेकाळापासून विशेष ख्यातकिर्त झाले. मुळा-मुठा नदीच्या काठावरचे गणपती मंदीर ‘थेऊरचा चिंतामणी’ नावाने ओळखले जाते. या देवाच्या नावाने औरंगजेब बादशहाने थेऊर हे गाव इनाम म्हणून बहाल केला असे इतिहास सांगतो. चिंचवडचे थोर सत्पुरुष श्रीमोरया गोसावी यांनी थेऊरला येऊन गणेशाची प्रदीर्घ उपासना केली, तपश्चर्या केली. थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा हे दोघेही कट्टर गणेशभक्त होते. वसईच्या लढाईत मिळविलेली प्रचंड घंटा चिमाजींनी मोरगावी आणि थेऊर येथेही मंदिरात बसविली. थोरले माधवराव पेशवे सुद्धा थेऊरच्या चिंतामणीचे निस्सीम भक्त होते. रोज गणेश दर्शन घडावे या हेतूने त्यांनी इथल्या देवळाजवळ स्वतःसाठी जो वाडा बांधून घेतला तो आजही पहायला मिळतो. मरणासन्न स्थितीतल्या माधवरावांनी शनिवारवाड्याला मुक्काम हलवून थेऊरच्या देवळातच आश्रय घेतला. इथल्या ज्या खोलीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला ती खोली सुद्धा मुद्दाम दाखविली जाते. माधवरावांची पत्नी रमाबाई सती गेल्या. मुळा-मुठेच्या काठावरील घाटावरचे रमाबाईंचे ‘सतीचे वृंदावन’ ही इथले एक प्रेक्षणीय स्थळ ठरले आहे.
३. लेण्याद्री नावाने ओळखला जाणारा एक डोंगर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात आहे. उत्तर दिशेने पुष्पावती नदी वाहते. जुन्नरपासून हा डोंगर पाच किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे दीडशे मैल दूर अंतरावरचे हे स्थळ असून या डोंगरातल्या एका खोदाईत गणपतीची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. ‘श्रीगिरिजात्मक’ नावाने परिचित असलेल्या या गणरायाचे दर्शन अंमळ कष्टदायकच म्हणायला हवे. कारण लेण्याद्री डोंगराच्या दोनशे पायऱ्या चढण्याचे कष्ट घेतल्याखेरीज कुणालाही देवाजवळ जाता येत नाही.
डोंगरकपारीतल्या एका सपाट निसर्गनिर्मित भूपृष्ठावरील कोपऱ्यात गणपती मूर्ती विराजित आहे. देवापुढील सभामंडप खूपच प्रशस्त लांबरूंद आहे. एका प्रचंड पाषाणातून तो कोरलेला असून त्याला एकही खांब नाही हे एक निसर्गदत्त नवलच होय. या गणेश प्रतिमेचे मुख समोरून दिसत नाही. डोंगरातला हा गिरिजात्मक पाठमोरा आहे. तशा स्थितीतल्या मूर्तीची पूजा केली जाते. देवी पार्वतीला गिरिजा म्हणतात. गिरिजेचा आत्मज-म्हणजे पुत्र म्हणून या गणेशाला गिरिजात्मक असे नाव पडले. पुराणात तशी कथाच आहे.
लेण्याद्री डोंगर परिसर सृष्टीसौंदर्याने नटलेला आहे. डोंगरावर जाण्यासाठी डोलीची सोय आहे.
४. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे इथले गणपतीचे आणखी एक जे देवस्थान ते ओझर गावातले श्रीविघ्नेश्वर मंदीर होय. लेण्याद्रीपासून १४ कि.मीटर अंतरावर ओझर गाव आहे. अष्टविनायक दर्शनार्थ निघालेले यात्रस्थ जुन्नर तालुक्यातली ही दोन्ही गणेशस्थळे एकाचवेळी एकापाठोपाठ करतात. ते सोयीचे ठरते. एसटीने पुणे-नारायणगाव-ओझर हा प्रवास सुमारे ९० कि.मी.चा आहे.
ओझरच्या गणरायाला विघ्नेश्वर नावाने ओळखले जाते. हे मंदीर कुकडी नदीवर आहे. ते पूर्व दिशेकडे तोंड करून उभे आहे. बांधकाम जुने पण भक्कम व बंदिस्त आहे. दगडात कोरलेले द्वारपाल देवळाच्या प्रवेशद्वारी दोन्ही बाजूने उभे आहेत. विघ्नेश्वराची पूर्णाकृती बैठी मूर्ती भाविकांना मोहित करते. उंदराची दगडी मूर्तीही मनोवेधक आहे. विघ्नेश्वराची मूर्ती डाव्या सोंडेची असून दोन्ही डोळ्यात माणके बसविलेली आहेत. मूर्तीच्या कपाळावरील हिरा दुरूनही अतिशय तेजस्वी दिसतो. दोन्ही बाजूच्या उभ्या मूर्ती म्हणजे ऋद्धी व सिद्धी आहेत. विघ्नेश्वर मंदिराच्या पूर्वेला धर्मशाळा आहे. जवळच पिंपळ वृक्ष असून मुंजोबाचा पार आहे. देवळापुढले मोकळे प्रांगण फुलझाडांनी बहरलेले आहे. थोरल्या बाजीराव पेशव्याने देवळासाठी मुबलक जमीन आणि परिसरातली गावे इनाम म्हणून दिल्याचा इतिहास आहे. चिमाजी आप्पाने या देवळावर सोन्याचा का कळत चढविला असेही जुन्या कागदपत्रांवरून दिसते.
नाशिक मार्गे निघणाऱ्या यात्रेकरूंना आळे फाट्यावरून आणि माळशेज घाटाच्या दिशेने ओतुर गावापुढे ओझर लागते. तिथे या विघ्नेश्वराचे दर्शन घडते.
५. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात रांजणगाव नावाचे बागायती गाव आहे. पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावरचे हे छोटेसे गाव इथल्या ‘श्रीमहागणपती’मुळे तीर्थक्षेत्र बनले आहे. पुणे-नगर रस्त्यानेही इथे येता येते. रस्त्यानजिकच हे स्थान वसलेले आहे. माधवराव पेशव्यांनी श्रीमहागणपती मंदीराचा गाभारा बांधला आणि इंदूर संस्थानचे तत्कालीन प्रसिद्ध सरदार किबे यांनी इथल्या सभामंडपाचा जीर्णोद्धार केला अशी ऐतिहासिक सनदेत नमूद केलेली माहिती उपलब्ध आहे. संत शिरोमणी तुकारामांचे समकालीन संत लिंबराज महाराज यांची समाधी इथून १६ कि.मी. दूर आहे.
श्रीमहागणपती मंदीराचे बांधकाम करीत असताना दिशांचे अचूक ज्ञान व भान बाळगले गेले होते असे दिसते. उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यंतरात सूर्याचे किरण गाभाऱ्यातल्या गणेशमूर्तीवर अचूक पडतात असा अनुभव इथे आजही येतो हे विशेषच! श्रीमहागणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. तिने आसनमांडी घातलेली आहे. मूर्तीचा भालप्रदेश विशाल असून दोन्ही बाजूंनी ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला एक तळघर आहे. तिथे महागणपतीची जी आणखी एक लहान मूर्ती आहे तीच गणपतीची मूळ मूर्ती आहे असे सांगतात. मंदिराजवळची विहीर गोड्या पाण्याची असून आजही ती सुस्थितीत आहे. विहीरीतले गोडे पाणी दुष्काळातही कधी आटत नाही असे ग्रामस्थ मोठ्या अभिमानाने सांगतात.
पुणे जिल्ह्यातल्या पाचही गणपती देवस्थानांची माहिती उपरोक्त पुस्तिकेच्या आधारे थोडक्यात जाणून घेतली. आता रायगड जिल्ह्यातल्या दोन गणपतींचे दर्शन घेऊया.
६. रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यात पाली नावाचे गाव आहे. तेथील गणपतीला ‘बल्लाळेश्वर’ नावाने संबोधले जाते. ठाणे, खोपोली, पनवेल, कर्जत अशी गावे मागे टाकत पाली गावाकडे जाता येते. पुण्याहून सुमारे १००कि.मी. दूर असून मुंबई-ठाणे मार्गे फार लांब नाही.
पालीचा बल्लाळेश्वर गावाच्या दुसऱ्या दूर टोकाला आहे. बांधकाम दगडांचे व चिरेबंदी आहे. जुन्या काळातल्या दगडी बांधकामात भिंतीच्या चिऱ्यांमधे उकळते शिसे ओतण्याची पद्धत सर्रास होती. इथल्या मंदिराच्या बांधकामात तिचा वापर झाल्यामुळे या भिंती आजही अतिशय मजबूत आहेत. मंदिरासमोर दोन तलाव असून त्यांना घाट बांधलेले आहेत. तळ्यात भरपूर पाणी असले तरी कालप्रवाहात पाण्याची स्वच्छता नष्ट होत आहे. गाभाऱ्यातली गणपती मूर्ती तीन फूट उंच आहे. ती डाव्या सोंडेची आहे. डोळ्यात हिरे बसविलेले आहेत. दगडी सिंहासनावरील प्रभावळ शुद्ध चांदीची आहे. देवळापुढचा सभामंडप लांबरू, ऐसपैस आहे. मंदिरातली पंचधातूची प्रचंड घंटा इथेही चिमाजी अप्पानेच आणली आहे. (वसई-साष्टीच्या लढाईत फिरंग्याचा पाडाव करून विजयी मुद्रेने परतणाऱ्या चिमाजी अप्पाने अनेक प्रचंड घंटा बरोबर आणल्या होत्या आणि नंतर त्या अनेक देवतांना दिल्या.)
पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराचे आणि धर्मशाळा-मठादी इतर वास्तूंचे बांधकाम मोरोबादादा फडणीस यांनी केले असे जाणकार सांगतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळात येथे कथा-कीर्तने-लळिते इत्यादी उत्सवांची धामधूम असते. देवाचा जन्मोत्सव माघ शुद्ध चतुर्थीला मोठ्या उत्साहात साजरा होतो.
७. रायगड जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात महड (मढ) नावाचे छोटे गाव आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या या गणपतीला ‘वरदविनायक’ संबोधण्यात येते. कर्जत-खोपोली रस्त्यावर हे देवस्थान आहे. फार वर्षांपूर्वी महड परिसर घनदाट अरण्याने वेढलेला होता. तो प्रदेश पुष्पकवन म्हणूनच प्रसिद्ध होता. गुत्समद नामक कुणा प्राचीन ऋषीने घोर तप केले आणि गणेशाला प्रसन्न करून वर मिळविला. गणेशाने ऋषीला ‘मी इथेच राहीन’ असा वर दिला म्हणून हा गणपती वरदविनायक नावाने ओळखतात. महडचा वरदविनायक गाभाऱ्यातल्या एका दगडी सिंहासनावर बैठ्या स्थितीत स्थानापन्न आहे. मूर्ती डाव्या सोंडेची संगमरवरी असून पूर्वाभिमुखी आहे. प्रवेशद्वारी ऋद्धी-सिद्धीच्या कोरीव दगडी मूर्ती आहेत. मंदिराच्या मागील बाजूला देवाचे तळे नामक जलाशय आहे. याच तलावात गणरायाची मूळ मूर्ती सापडली आणि पेशव्यांचे कल्याणचे सरसुभे रामाजी महादेव बिवलकर यांच्या पुढाकाराने १७३०च्या सुमारास मंदीर उभे राहिले असे ऐतिहासिक नोंदीवरून समजते. माघ चतुर्थीला वरदविनायकाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा होतो. हा सगळा परिसर आजही निसर्गरम्य, शांत, निवांत भासतो.
८. सिद्धीविनायक नावाने सर्वश्रुत असलेले सिद्धटेकचे गणेशमंदीर अहमदनगर जिल्ह्यात भीमा नदीकाठी वसलेले आहे. पुणे-सिद्धटेक अंतर शंभर मैलांचे आहे. दौंडपासून सोलापूरकरडे जाताना बोरीबेल नावाचे रेल्वे स्टेशन लागते. तेथून फक्त अठरा किलोमीटर अंतरावर सिद्धटेक हे स्थळ आहे. पुणे-दौंड-करमाळा एसटी मार्गावर सिद्धटेक फाटा लागतो. हे गणेश मंदीरही पेशवेकालीन आहे. उत्तर दिशेकडे तोंड असलेले हे मंदीर चिंचवडच्या मोरया गोसावींच्या कठोर तपश्चर्येमुळे अधिक नावारुपाला आले. पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांच्या निस्सीम भक्तीमुळेही सिद्धटेकचे स्थानमहात्म्य वाढले. त्यांनीच इथल्या भीमा नदीवर सुरेख घाट बांधला असा इतिहास आहे. महाराष्ट्रातले अलिकडील काळातले प्रसिद्ध काँग्रेस नेते कै. न.वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांनी आईच्या स्मरणार्थ यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधली आहे. अहिल्याबाई होळकरांचेही मोठे योगदान आहे. सर्व पारंपारिक गणेश उत्सव येथे उत्साहाने साजरे केले जातात.
महाराष्ट्रातल्या ‘अष्टविनायकां’ची प्रस्तुत धावती परिक्रमा सर्व थरातल्या गणेशभक्तांना सुखदायक आणि भाग्यवर्धक ठरो हीच गणराया चरणी विनम्र प्रार्थना!
-श्रीराम कृ. बोरकर, ठाणे
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply