स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी किंवा रसिकांच्या रंजनासाठी सादर होणारी कला जेंव्हा भक्तिभावाने परमेश्वरासाठी सादर होते तेंव्हा त्या कलेच्या साधनेतून पुण्याचीच साठवण होते. शाहीर अनंत फंदी यांची अत्यंत प्रज्ञावंत, हजरजबाबी लोककलाकार म्हणून कीर्ती पसरली होती. या लावणीसम्राटाच्या अंगी जन्मजात कवित्व होते. गावोगाव ते आपली कला सादर करीत. असेच एकदा माळव्यात ते आपला फड घेऊन गेले होते तेंव्हा त्यांच्या अलौकिक कवित्वाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सुद्धा प्रभावित झाल्या. त्यांनी प्रसन्न होऊन अनंत फंदींच्या सन्मानार्थ अलंकार आणि भरजरी पोशाखाची भेट दिली. आणि त्यावेळेस अहिल्याबाई त्यांना म्हणाल्या, “फंदी बुवा ! आपण असामान्य प्रतिभावंत आहात. साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर विलसत आहे. कोणीही प्रभावित होईल असेच आपले कवित्व आहे. परंतु आपली ही काव्यशक्ती तमाशाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनासाठी वापरण्यापेक्षा हरिकीर्तनासाठी उपयोगात आणलीत तर मोठा लौकिक होईल.” अहिल्याबाईंचे हे उद्गार शाहिर अनंत फंदी यांच्या हृदयाला जाऊन भिडले. “यापुढे गाईन ते फक्त हरिकीर्तनासाठीच” अशी भरदरबारात प्रतिज्ञा करून शाहिर अनंत फंदी निघाले. ही प्रतिज्ञा त्यांनी अखेरपर्यंत पाळली. आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग त्यांनी लोकशिक्षणासाठीच केला. त्यामुळे लोकांना फंदी आठवतात ते त्यांच्या कीर्तनामुळे ! आणि त्यांच्या उपेदशपर फटक्यांमुळे.
तात्पर्य: कोणत्याही कलावंताला जर श्रेष्ठ व्यक्तीच्या विचारांचा परीसस्पर्श झाला तर त्याच्या कलेचे आयाम बदलतात.
Leave a Reply