पर्जन्ये पातळी ओलांडे रती
बुडूनी जाती कित्येक महारथी
परंतु टिकून राहती जातीपाती
कालचक्र ते फिरती स्वतःसाठी!!
अर्थ–
“माझं आयुष्यात काहीच चांगलं होणार नाहीये. माझं आयुष्य नेहमी असंच सुईच्या टोकावर असणार आहे. केवळ दुःख दुःख आणि दुःख एवढचं माझ्या आयुष्यात लिहिलंय बास दुसरं काही नाही.” हे असे विचार माणसाच्या मनात नेहमी येत असतात. नेहमी म्हटलं कारण माणूस सुखाचे क्षण फार आत दडवून ठेवतो आणि दुःखाचे क्षण हे सागरात उसळणाऱ्या लाटांसारखे मनात उफाळून येत असतात. त्याकारणाने हे असे दुःखी आणि निराशाजनक विचार हे माणसाच्या मनात येतच असतात. अशावेळी बातम्यांचा मार्फत दाखवल्या जाणाऱ्या एखाद्या जिल्ह्यात आलेल्या अकाली पावसाच्या पुरात घर वाहून गेलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे सुरेख आणि आणीबाणी च्या स्थितीतही सहज टिपलेल्या हावभावांच्या फुटेजचा विचार करावा. जिथे घर होते, आजूबाजूला वस्ती होती, जगायचे साधन देणारी गोष्ट होती तिथे पसरलेल्या पाण्याच्या साम्राज्याला शांत नजरेने पहात असलेल्या त्या डोळ्यांना निरखून पाहिले की परत नव्याने, ताकदीने, जोमाने जगण्याची ईर्षा मनात पेटली नाही तरच नवल. या जगात सत्य एकच आहे ते म्हणजे मृत्यू येणे, बाकी त्या पर्यंतचा प्रवास कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असते. आयुष्याच्या विशाल सागरात येणाऱ्या महाकाय लाटांच्या पोटात गटांगळ्या खायच्या की त्याच लाटांवर धीराने स्वार होऊन आपली बोट किनाऱ्याला लावायची हे सर्वस्वी आपल्या हातात असते. महत्वाचा असतो तो दृष्टिकोन.
तेव्हा दोन पावलं मागे जावं पण चार पावलं पुढे टाकण्यासाठी. सुख दुःख ही निमिषमात्र असतात. परिस्थिती कधीच टिकून रहात नाही. सकाळचा सूर्य आणि अस्ताला जाणारा सूर्य यातही फरक असतोच. महत्वाचं काय तर ते निश्चयाने उगवणं.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply