वनराईच्या बोलण्याने आनंदलेल्या आभाळाने एक सुंदर इंद्रधनू जमिनीवर खोवलं. त्यामुळे अवघी कोकणभूमी दृष्ट लागण्याइतकी लोभस दिसू लागली! त्यावेळी समुद्राच्या लाटांची गाज कोकणभूमीला सांगू लागली. ‘हे अपरान्त कोकणभूमे, भारताची पश्चिम भूमी तुझ्यापाशी परिपूर्ण होते, म्हणून तू अपरान्ता. तुझी निर्मिती या आकाशाइतक्याच विशाल मनाच्या दैवी पुरुषामुळे झाली. त्यांचे नाव परशुराम.
आपले निळेशार प्रतिबिंब ज्यात पूर्णतः उतरलेय त्या भरतभूमीतील पश्चिमेकडील कोकणकिनाऱ्याच्या समुद्राकडे आकाश लोभावून पाहात होते. गर्द वनराईचा हिरवागार काठ त्या समुद्राला किती शोभत होता. समुद्रही आपल्या लाटांनी त्या तजेलदार भूमीवर पुन्हापुन्हा झेपावत होता. जैववैविध्याने नटलेल्या त्या वनराईचे आकाशालापण मोठे कौतुक वाटले. तेव्हा वनराई आकाशाला म्हणाली, ‘तूच तर आम्हाला केवढे भरभरून वर्षाजलाचे दान देतोस, हे उंच उंच डोंगरमाथे तुझे जलदान ओंजळीत घेऊन खळाळून वाहणाऱ्या नद्यांच्या रूपाने मला अखंड सुजलाम्-सुफलाम् करतात. त्यामुळेच तर आमच्या नारळीपोफळी, काजू, फणस, आम्रवृक्ष सजतात आणि या नानाविध वनस्पती बहरतात. आमची भातशेती तर केवळ तुझ्या जलवर्षावानेच रसरशीत होते ’
वनराईच्या बोलण्याने आनंदलेल्या आभाळाने एक सुंदर इंद्रधनू जमिनीवर खोवलं. त्यामुळे अवघी कोकणभूमी दृष्ट लागण्याइतकी लोभस दिसू लागली! त्यावेळी समुद्राच्या लाटांची गाज कोकणभूमीला सांगू लागली. ‘हे अपरान्त कोकणभूमे, भारताची पश्चिम भूमी तुझ्यापाशी परिपूर्ण होते, म्हणून तू अपरान्ता. तुझी निर्मिती या आकाशाइतक्याच विशाल मनाच्या दैवी पुरुषामुळे झाली. सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश करणाऱ्या श्रीविष्णूचा तो सहावा अवतार होता. त्यांचे नाव परशुराम. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र महर्षी भृगू यांच्या वंशात महर्षी जमदग्नी व साध्वी रेणुका यांच्या पोटी परशुरामांचा जन्म झाला, भृगुवंशातील म्हणून परशुराम, जमदग्नी, ऋचिक यांना भार्गव असेही म्हणतात. भार्गव परशुराम अतिशय तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी कश्यप ऋषीकडे सर्व विद्यांचे अध्ययन केले. नंतर गंधमादन पर्वतावर तप करून शिवाला प्रसन्न करून घेतले. भगवान शिवाने त्यांना अनेक अस्त्रे दिलीत. त्यातच त्यांचा प्रसिद्ध परशुही दिला. परशुरामांचे मूळ नाव राम होते पण शिवाकडून त्यांना परशू मिळाला आणि तो परशू त्यांच्या सतत जवळ असे म्हणून त्यांचे परशुराम नाव पडले. ऋषिश्रेष्ठ परशुरामांना खरी अंतरिक ओढ निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे अध्यात्मचिंतन करण्याची होती, पण जनताजनार्दनावर झालेल्या अत्याचाराची वार्ता कानी आल्यावर ते शांतही बसू शकत नव्हते. अन्यायाचा प्रतिकार करून ते पुनश्च योगसाधनेसाठी आपल्या आवडत्या महेंद्रगिरीवर येत. म्हणजेच परशुराम ज्ञानयोगी जसे होते तसेच ते कर्मयोगीही होते. त्याचप्रमाणे अतिशय पितृभक्त होते.
एकदा परशुराम महेंद्रगिरीवर तप करण्यास गेले असता त्यांचे पिता महर्षी जगदग्नी यांची निर्घृण हत्या झाली. दुःखसंतप्त झालेल्या परशुरामांनी जमदग्नींची हत्या करणाऱ्या हैहय वंशियांच्या महिष्मती राज्यावर जोरदार हल्ला केला. त्यांना प्रतिकार करण्यासाठी आलेल्या सहस्रार्जुनराजाचे बंधू, पुत्र, सामंत, मांडलिक या सर्वांचा त्यांनी संहार केला, आणि नंतर परत ते तपश्चर्येसाठी महेंद्रगिरीवर गेले. पण त्यांची पाठ फिरताच परत काही उन्मत्त क्षत्रियांचा सामान्य जनांवर अत्याचार सुरू झाला. परशुराम महेंद्रगिरीवरून परत आले, त्यांनी त्या क्षत्रियांचा निःपात केला आणि पुनश्च तपासाठी महेंद्र पर्वत गाठला. पुन्हा दुष्ट क्षत्रिय माजले की पर्वतावरून खाली उतरून त्यांचा समाचार घ्यावा, अशा परशुरामांच्या एकवीस मोहिमा झाल्या.
या मोहिमांमुळे समुद्रवलयांकित पृथ्वी परशुरामांच्या ताब्यात आली होती. तेव्हा त्यांनी अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञाचे अध्वर्यु त्यांचे गुरू महर्षी कश्यप होते. यज्ञाच्या अखेरीस यज्ञाची दक्षिणा म्हणून परशुरामांनी आपण जिंकलेली संपूर्ण भूमी महर्षी कश्यप यांना दिली आणि पुढच्या क्षणाला स्वतः परशुराम अकिंचन झाले, निःसंग झाले. पण महर्षी कश्यपांनाही हे पृथ्वीचे दान घेऊन राज्य करायचे नव्हते. तर त्यांना उत्तम राज्यकारभार करू शकणाऱ्या क्षत्रियांची पुनर्स्थापना करायची होती. बरेच क्षत्रिय परशुरामांच्या भयाने अज्ञातवासात गेले होते. त्यामुळे कश्यपांनी परशुरामांना सांगितले की, ‘आता तू मला दान केलेल्या भूमीवर यायचे नाही.’
गुरुवर्य कश्यपांची आज्ञा मानून परशुराम तेथून निघून गेले. जेथे भारतभूमीची पश्चिमभूमी संपते आणि माझे म्हणजे समुद्राचे साम्राज्य सुरु होते, त्या माझ्या काठावर ऋषिश्रेष्ठ परशुराम उभे होते. त्यांच्या मागची सगळी भूमी आता त्यांची राहिली नव्हती. त्यांच्या विलक्षण तेजस्वी व्यक्तिमत्वाने मी भारावून गेलो होतो. अन्यायी जुलमी राजसत्तांचा बिमोड करून साध्याभोळ्या पापभिरू जनतेचे संरक्षण करण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या त्या महात्म्याला चरणस्पर्श करून मी बराच मागे हटलो… आणि त्यामुळे हे कल्याणी, भारतमातेच्या पश्चिम किनारी तुझा जन्म झाला. सह्याद्रीचे कडे आणि पश्चिम सागर यांच्यामध्ये परशुराम भार्गवांच्या पुण्याईने तू जलप्रपातांनी, नदी-ओढ्यांनी दाट वृक्षांनी आणि फळाफुलांनी बहरून गेलीस.
ततः शूर्पारकं देशं सागरस्तस्य निर्ममे ।
सहसा जामदग्न्यस्य सोऽपरान्तमहीतलम् ॥66॥
महाभारत, शांतिपर्व, अ. 49
जमदग्निकुमार परशुरामांसाठी समुद्र मागे हटला. त्यामुळे शूर्पारक देश निर्माण झाला. त्याला अपरान्तभूमी असेही म्हणतात किंवा परशुरामक्षेत्र असेही म्हणतात. वैतरणेपासून कन्याकुमारीपर्यंतचे हे परशुरामक्षेत्र होय. हे निसर्गरम्य कोकणभूमे, तुझ्या कुशीत जन्मलेल्या गोऱ्या घाऱ्या चित्पावनांनाही ऋषिश्रेष्ठ परशुरामांचे वरदान आहे. ज्यावेळी माणसातल्या कार्यशीलतेचा रजोगुण मंदावून निष्क्रियतेचा तमोगुण फोफावला होता त्यावेळी त्याचे आयुष्य निरर्थकतेच्या चितेत जळू लागले होते. ज्ञानयोग आणि कर्मयोग साधनेत अखंड मग्न असलेल्या तेजस्वी परशुरामांना असे मानवी जीवन बघणे शक्य नव्हते. त्यांनी त्या माणसांमध्ये सत्कार्याची चेतना निर्माण केली. त्यांना निष्क्रियतेच्या चितेतून बाहेर काढले. त्या चितेतून बाहेर आलेले आणि परशुरामांच्या या दिव्य प्रेरणेने पावन झालेले ते चित्पावन होत. आद्य क्रान्तिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट ही सर्व त्या चित्पावन समाजाची तेजस्वी उदाहरणे होत. विष्णूचा अवतार असलेल्या या परशुरामाचे चिपळूणजवळ लोटे परशुराम या गावी प्राचीन मंदिर आहे. त्यातूनच कोकणातील जनतेने त्यांच्यावरील पूज्यभाव अखंड राखला आहे, हे लक्षात येते ”
सागराच्या गाजेमधले हे बोल ऐकून कोकणभूमी स्वतःच्या पावन निर्मितीकथेने हर्षभरित झाली. आपल्या मातीत त्या थोर ऋषीचे ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही मुरलेले आहे, या जाणीवेने धन्य झाली. तिने आकाशाकडे पाहिले. तर तेही भारावलेल्या अवस्थेत मेघांनी दाटून आले होते…!!
स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात जरा वेगळा उल्लेख आहे की परशुरामांनी एक बाण समुद्रामध्ये मारला. जेथपर्यंत तो बाण समुद्रात पोचला, तेथपर्यंत समुद्राला मागे सरण्याची आज्ञा परशुरामांनी दिली, त्यामुळे जो भूभाग निर्माण झाला तो कोकण होय.
कोकण नावाची व्युत्पत्ती पाहू गेल्यास ती अनेक प्रकारे मिळते. जुन्या संस्कृत भाषेत कोकण शब्द निरनिराळ्या पद्धतीने लिहिलेला दिसतो. कुकुण, कुङ्कुण, कोङ्कण, कोकण अशी रूपे दिसतात. कानडीत कोङ्कु असा शब्द आहे. कोङ्कु म्हणजे उंचसखल जमीन. कोङ्कु- वन यावरून कोकण शब्द आला असावा. सागरीमार्गामुळे कोकणाचा व इतर प्रान्तांचा व्यापारसंबंध खूप जुना आहे. त्यामुळे त्या त्या प्रान्तातले शब्द कोकणात बरेच आले. फारसीत कोह म्हणजे पर्वत आणि कुण्ड म्हणजे खड्डा. या कोह – कुण्ड मधून कोकण शब्द तयार झाला असावा. तसेच कोंग नावे लोक येथे वसाहत करून आले असावेत, त्यांच्यावरूनही कोंकण शब्द आला असावा.
कोकणातल्या या शुद्ध निसर्गरम्य पवित्र वातावरणात सर्वेश्वराबद्दल श्रद्धा रुजणारच. ज्याला दक्षिण काशी म्हणून गौरविले जाते ते कोकणातले हरिहरेश्वराचे मंदिर सर्व शिवमंदिरात श्रेष्ठ समजले जाते. कारण तेथे उत्पत्ती-स्थिती-लयाचे ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव आहेत. हरि म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर यांच्या पूर्णैक्याचे हे अपूर्व स्थळ आहे. हरिहरेश्वरमंदिर, कालभैरव व योगेश्वरीमंदिर, सिद्धिविनायकमंदिर व हनुमानमंदिर अशी येथे चार मंदिरे आहेत. सावित्री नदी जेथे समुद्राला मिळते तिच्या मुखावर हरिहरेश्वर गाव वसले आहे. डोळ्याचे पारणे फिटावे असे मनोहर निसर्गसौंदर्य या गावाला लाभले आहे. एका बाजूला जणू पाचूंनी मढलेले ब्रह्माद्री, पुष्पाद्री, हर्षिनाचल आणि हरिहर हे हिरवेगार चार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत निर्मळ असा निळा निळा अथांग समुद्र. त्या सागराच्या लाटा केवळ वसुंधरेच्या सुषमेने उत्तेजित होऊनच नव्हे तर एकत्वाची साक्ष देणाऱ्या श्रीहरिहरेश्वराच्या दर्शनासाठीही उसळताना दिसतात!! असे म्हणतात की वामन अवतारात बटू वामनाने आपले दुसरे पाऊल याच स्थळापासून ठेवले. म्हणजे पृथ्वीवर विश्वंभराचे पहिले नाते कोकणभूमीशी जोडले गेले..!
हरिहरेश्वराप्रमाणे कोकणातील इतरही अनेक शिव, गणेश इ. देवदेवतांच्या प्राचीन मंदिरांचा पुराणांत, इतिहासात, आख्यायिकांत असा दाखला मिळतो. पुरातन काष्ठशिल्पाकृतीचा वारसा कोकणातल्या बऱ्याच मंदिरांनी जपला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कोकणचा अपरान्त म्हणूनच उल्लेख आहे. या प्रदेशात विपुल प्रमाणात पाऊस पडत असल्याने हा प्रदेश नैसर्गिकदृष्ट्या अतिशय संपन्न आहे, असेही यात म्हटले आहे.
खरोखर सृष्टिसौंदर्याच्या दृष्टीने कोकण हे महाराष्ट्राचे गौरवस्थानच होय.
–डॉ. अनुराधा सुधीर कुलकर्णीं
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply