- सुशिम कांबळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल :
- ‘कॉलोनियल-इरा’मधील इंग्रजांची बाजू घेण्याचें मला कांहींच कारण नाहीं. मात्र, इंग्रजांनी मुद्दाम मोजक्या लोकांना(च) इंग्रजी शिकवली, असें म्हणणें बरोबर नाहीं. जे लोक socio-economically एका विशिष्ट, upwardly mobile वर्गात होते (जात कुठलीही असो) , ते अशा भाषा शिकतातच, मग ती संस्कृत असो, मध्य-युगात फारसी असो, वा आधुनिक काळात इंग्रजी, (किंवा गोव्यात पोर्तुगीझ, व पाँडिचेरीला फ्रेंच ) . त्या लोकांना स्वत:च्या प्रगतीसाठी ते आवश्यक वाटतें, म्हणून ते ती भाषा शिकतात, हेंच खरें आहे.
( आणि, आज तर भारतावर इंग्रजांचें राज्य नाहीं. तर मग, आज जे upwardly mobile लोक सॉफ्टरेअरच्या कामासाठी व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी इंग्लिश शिकतात, त्याचें काय ? ).
- तसेच संस्कृतचेंही आहे. ‘वैदिकेतरांना गुलाम बनवण्यासाठी संस्कृत मुद्दाम मोजक्याच लोकांना शिकवली गेली ’, असें म्हणणें म्हणजे सत्याचा विपर्यास आहे.
- पुरातन व मध्य युगात अनेक राजांना संस्कृत येत नव्हती (एका सातवाहन राजाची गोष्ट तर प्रसिद्धच आहे). पण ते गुलाम नव्हते, तर राजे होते. असे अनेक क्षत्रिय, वैश्य व अन्य राजे, जसें की शक, कुषाण, हूण , यांना संस्कृत येत नव्हती, पण ते निश्चितच गुलाम नव्हते.
- जैन व बौद्ध जन हे वैदिक नव्हते ; ते तत्कालीन प्राकृत भाषांमध्ये व्यवहार करीत, त्यांच्यातील जनसाधारणांना संस्कृत येत नव्हते; पण त्यातील कोणीही गुलाम नव्हता. जैनांमध्ये तर मोठमोठे ‘श्रेष्ठी’ (धनवंत व्यापारी) होते, वीर-सेनापती होते ; गुलाम कोण होता ?
- शूद्रांबद्दलही तेंच म्हणतां येईल. नरहर कुरुंदकर सांगतात (संदर्भ : वर उल्लेखलेला लेख), की , शूद्र म्हणजे गुलाम हे समीकरणही चुकीचें आहे. (पुरातन काळात ) ‘प्रत्येकाच्या जवळील विकत घेतलेले गुलाम’ हा वेगळा वर्ण आहे. गणिकांना शूद्र मानलें गेलेलें आहे, पण त्यांच्याकडे मोठा नोकरवर्ग असे, गुलामही असत. तसेंच, आधी जे शूद्र होते, ते नंतर क्षत्रिय होण्याची, आणि, शूद्र असूनही राजे असण्याची उदाहरणें आहेत. (जिज्ञासूंनी , नरहर कुरुंदकर या साम्यवादी असलेल्या , पण निष्पक्ष विचारांच्या विचारवंताचें लिखाण मुळातूनच वाचावें. कित्येक अपसमज दूर होतील).
- खरें तर, हिंदूंमधेही, (खास करून , नंतरच्या काळात) किती जनसाधारणांना संस्कृत येत होती ?
- त्यामुळे, संस्कृत येणें न येणें व गुलामगिरी यांचा अर्थाअर्थी कांहींही संबंध नव्हता.
- ‘इतरेजनांची भाषा संस्कृतपेक्षा हजारो वर्षें जुनी आहे ’ , ही statement सुद्धा वास्तवाला धरून नाहीं. भाषाविषयक चर्चा आपण आधी केलेलीच आहे, तिच्या पुनरावृत्तीची आवश्यकता नाहीं. संस्कृत ही येथील भाषांची ‘जननी’ आहे किंवा कसें, याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे.
- अश्वघोषाचा उल्लेख करून, कांबळे म्हणतात की ‘संस्कृत पंडितांनी वैदिक धर्म सोडून जैन वा बौद्ध धर्मात प्रवेश केला होता ’. कांहीं जणांनी कदाचित तसें केलेंही असेल. मात्र, हिंदु धर्मातही वेदप्रामाण्य न मानणारी ‘दर्शनें’ आहेत, जसें सांख्य, योग, वैशेषिक, लोकायत. त्यामुळे, हिंदु धर्माचा भाग राहूनही वेदप्रामाण्याच्या दायर्याबाहेर सहज रहाता येत असे. त्यामुळे, संस्कृत पंडितांन आपला धर्म सोडायची कांहींही जरूर नव्हती.
मात्र, जैनांनी व बौद्धांनी संस्कृतमध्ये रचना करण्याचें कारण तें नव्हे. जैन किंवा बौद्ध विद्वानांनी प्राकृतात लिहिलें, तसेच प्रादेशिक भाषांमध्ये लिहिलें, व संस्कृतातही लिहिलें. त्या कारणांचा ऊहापोह आपण आधी केलेलाच आहे.
- ‘संस्कृत समाजाची भाषा होऊं शकली नाहीं, मग तिनें ऐक्य प्रस्थापित कसें झालें ?’ ( इति कांबळे ) –
प्रागैतिहासिक काळीं आर्ष-संस्कृत ही एका पूर्ण–समाजाचीच भाषा होती. परंतु, शेकडो वर्षें लोटल्यावर तिचें रूप, संपर्क-भाषा, ज्ञान-भाषा, दुवा-भाषा (Link Language) अशा स्वरूपाचें झालें. त्यामुळे विविध विषयांमधील ज्ञान—- मग तें, तत्वज्ञान असो, अध्यात्म असो, खगोलशास्त्र असो, वैद्यक असो, गणित असो, साहित्य-कला असो, किंवा इतर कांहींही असो, —— संस्कृतमुळेच भारताच्या विविध भागांमध्ये पोचलें ; भारतातच नव्हे तर पूर्व-आशियातील अनेक देशापर्यंतही पोचलें.
- ज्ञानेश्वर हे यादवकालीन आहेत. त्यावेळी, (त्यांच्या किमान १५०-२०० वर्षें आधी, म्हणजे मुकंदराजांच्याही आधी), प्राकृतातील, —– महाराष्ट्री, अपभ्रंश अशा क्रमानें, —– ‘मराठी’ हें, (प्राकृत) भाषिक रूप उदयाला आलें होतें. म्हणून ज्ञानेश्वरांनी जनसामान्यांच्या मराठीत लिहिलें. भाषिक बदलांच्या प्रक्रियेची चर्चा आपण आधी केलेलीच आहे. संस्कृत ही त्या काळात केवळ Link-Language म्हणून, ज्ञानभाषा म्हणूनच, राहिलेली होती.
- आपण युरोपचें उदाहरण घेऊं. लॅटिन ही आधीच्या काळीं रोमन-समाजाची भाषा होती. बर्याच नंतरच्या काळात, तिचें स्वरूप केवळ , ज्ञानभाषा व दुवा-भाषा म्हणूनच राहिले. मध्य युगात विविध प्रादेशिक भाषा पुढारल्या होत्या , जसें फ्रेंच, इंग्लिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, वगैरे. पण, मध्ययुगात ज्ञानग्रंथ लॅटिनमध्येंच लिहिले जात. त्यामुळे, अन्य भाषाभाषियांनाही त्यांना सहजपणें समजूं शकत. तरीही प्रादेशिक भाषांमध्ये रचना होतच होत्या. उदा. इंग्रजीत मिल्टन, शेक्सपियर, वगैरे.
- मध्य-युगात संस्कृतचेंही तेंच झालें. परंतु, वृथाभिमानी ब्राह्मण-जन, प्रादेशिक भाषेला ‘ज्ञानभाषा’ म्हणून मानेनात. ( ध्यानात घ्या, इथें आपला रोख ‘ज्ञानभाषे’बद्दल आहे. मराठीत रचना करायला आक्षेप घेणारे ब्राह्मणही घरीदारीं मराठीच बोलत, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे ). म्हणूनच, एकनाथांना असें खडसावून विचारावें लागलें की , ‘ मराठी काय चोरापासून झाली?’
- पुरातनकालातील व मध्ययुगातील कांहीं परंपरांचेही तेंच आहे. त्या समर्थनीय नाहींतच. पण, त्याचा दोष जातो, तो समाजातील घटकाला किंवा घटकांना, एखाद्या भाषेला नव्हे, हें आपण पूर्वीच चर्चिलें आहे.
( पुढे चालू )
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply