- किशोर मांदळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल :
- ‘संस्कृतच काय कुठल्याही भाषेचा निषेध करणें हितावह नाहींच’, हें मांदळे यांचें म्हणणें योग्य आहे.
- मात्र, चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकोबा यांच्या काळीं मराठी ही जनभाषा बनलेली होती. त्यामुळे, संस्कृतच्या निषेधासाठी नव्हे, तर जनसामान्यांच्या भाषेत ज्ञान आणण्यासाठी या सर्वांनी प्रादेशिक भाषेत लिहिलें. इतरत्रही आपल्याला मध्य युगात हेंच दिसतें. कबीर, तुलसी, सूरदास, मीराबाई, नरसी मेहता, नामदेव, सावता माळी, जनाबाई, पुरंदरदास, त्यागराज, वगैरे सर्वांच्याच रचना प्रादेशिक भाषेतच आहेत. रामायण-महाभारत या संस्कृत ग्रंथांवर आधारित प्रादेशिक रचनाही झालेल्या आहेत, हें आपण आधीच पाहिलें आहे.
- फुलपाखरू :
‘संस्कृतमध्ये फुलपाखराला वेगळा (स्वतंत्र) शब्द नाहीं’ असें दुर्गा भागवत यांनी म्हटल्याचा उल्लेख करून मांदळे यांनी संस्कृतवर टीका केलेली आहे. ती किती योग्य आहे, हें पाहूं या.
- एक गोष्ट नक्की. संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द नाहीं हें logically सर्वथैव असंभव आहे. एखादी गोष्ट जर भारतात नसेलच, तर तिला संस्कृमध्ये शब्द नसणारच . उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधीळ कांगारू, एमू वगैरे प्राणी भारताताच काय, पण जगात इतरत्र कुठेही उपलब्ध नाहींत. त्यामुळे, संस्कृतच काय, पण जगातील इतर कुठल्याही भाषेत त्यांच्यासाठी शब्द नाहीं, सगळे जण त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियातील local शब्दच वापरतात. पण, फुलपाखराचें तसें नाहीं. तें तर भारतात उपलब्ध आहेच. तर मग, त्यासाठी संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमध्ये शब्द असणारच.
- ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला स्वतंत्र शब्द नाहीं’ असें कदाचित दुर्गा भागवत यांना अभिप्रेत असावें.
- फुलपाखरावरची चर्चा पुढे, वेगळी, परिशिष्ट– (१) मध्ये, केलेली आहे.
- अकारविल्हे संस्कृत शब्दकोश :
आपटे यांचा कोश ( कोष ) गेल्या १२५ वर्षांहून अधिक काळ उपलब्ध आहेच. मांदळे यांनी प्रश्न मांडला आहे तो, डेक्कन कॉलेजनें हातीं घेतलेल्या प्रकल्पाचा. खरें तर, एखाद्या प्रकल्पाचा , per se त्या भाषेशी व भाषिक संस्कृतीशी काय संबंध ?
तरीही, शब्दकोश या विषयात आपण थोडेसें जाऊं या.
- मला स्वत:ला डेक्कन कॉलेजच्या प्रकल्पाची कांहींच कल्पना नाहीं . मात्र, शब्दकोशाचा प्रकल्प पूर्ण होण्याला जो उशीर लागूं शकतो, त्याची बरीच कारणें असूं शकतात.
- भांडारकर इनस्टिट्यूटला महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार (finalise) करायला कांहीं दशकें लागली. (अर्थात, हें शब्दकोशाचें काम नव्हते ; पण यावरून आपल्याला, प्रकल्पांच्या कामांची कांहीं कल्पना येईल ).
- अरविंद कुमार व कुसुम कुमार या संपादकद्वयानें कांहीं वर्षांपूर्वी ‘हिंदी थिसॉरस’ बनवला आहे, त्यांनी, तें काम किती काळ चाललें होतें व तें कसें कठीण होतें, याची कल्पना दिली आहे. विनय वाईकर व ज़रीना सानी यांनी संपादित केलेल्या ‘आईना-ए-ग़ज़ल’ या मिनी-शब्दकोशाचें काम कशा प्रकारें झालें, याचें विवरण वाईकर यांनी दिलेलें आहे.
- आपटे यांच्या शब्दकोशात कांहीं शब्द / शब्दार्थ सापडत नाहींत, पण इतर कोशांमध्ये (ज्यांचे कोशकार संस्कृतचे जाणकार होते) हे शब्द दिलेले आहेत. माधवराव पटवर्धन (माधव ज्यूलियन) हे फारसी भाषेचे पंडित होते. त्यांनी त्यांचा फारसी-मराठी कोश बनविण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, हें त्यांच्या प्रस्तावनेतून जाणवते. तरीही, कांहीं राहिलेले शब्द त्यांना नंतर मिळाले, ते त्यांनी ‘पुरवणी’मध्ये include केले.अन् एवढें करून, त्यांच्या कोशात कांहीं शब्द सापडत नाहींत. यू. म. पठाण यांच्या ‘फारसी-मराठी व्यत्पत्ती कोशा’ला परिपूर्ण करण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले, हें वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलें आहे. मूळ ‘प्रामाणिक हिंदी कोश’ हा आचार्य रामचंद्र वर्मा यांनी बनवलेला आहे. त्यांच्या अभिधानावरूच त्यांच्या ज्ञानाची कल्पना यावी. तरीही, या शब्दकोशाचें द्वितीय संस्करण करतांना डॉ. बदरीनाथ कपूर यांनी, नवीन शब्द व नवीन अर्थ कसे अंतर्भूत केलेले आहेत, याबद्दल त्यांच्या प्रस्तावनेत विस्तारानें लिहिलें आहे.
- म्हणजेच, कुठलाही कोश बनवणें, आणि तो परिपूर्ण व अचूक असावा याची खबरदारी घेऊन तो पूर्ण करणें ही सोपी गोष्ट नाहींच. अशा कामाला वेळ हा लागणारच.
- अर्थात्, डेक्कन कॉलेज च्या प्रकल्पातील delay मध्ये कांहीं अन्य कारणेंही असल्यास, त्याची मला कल्पना नाहीं. हें मी आधीच स्पष्ट केलें आहे.
पण त्या delay चा आणि मांदळे यांनी mention केलेल्या संस्कृत भाषेच्या श्रेष्ठत्वाच्या (‘तथाकथित’ ) ‘मिथका’चा संबंध काय, हें मात्र मांदळे यांनी स्पष्ट केलेलें नाहीं.
त्यामुळे, भाषिक संदर्भात त्यांचा हा मुद्दा गैरलागू ठरतो.
(पुढे चालू )
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply