- ‘आजच्या जगात भौतिक व्यवहारासाठी संस्कृतचा कांहींही उपयोग नाहीं’ ( इति शिरवळकर) –
- हा मुद्दा आपण आधीच हाताळला आहे. आंतरराष्ट्रीत कीर्तीचे ज्येष्ठ विद्वान (कै.) दिनेश माहुलकरांचा अनुभव व त्याचें कथन काय सांगतें, तें आपण पाहिलें आहे. अन्य उदाहरणेंही पाहिली आहेत. त्यामुळे, यावर अधिक लिहिण्याची जरूर नाहीं.
*(ज्यांना प्रा. माहुलकरांची माहिती नसेल , त्यांनी सरोजिनी वैद्य या, महाराष्ट्र राज्य विकास संस्थेच्या संचालक असतांनाचें, वक्तव्य वाचावें. या संस्थेनें माहुलकरांचें पुस्तक प्रसिद्ध केलेलें आहे. माहुलकरांनी त्यांचें मराठी पुस्तक प्रकाशनासाठी या राज्यसंस्थेला देऊन संस्थेचा बहुमान केलेला आहे , अशी वैद्यबाईंची कृतज्ञतेची भावना आहे. माझा व माहुलकरांचा व्यक्तिगत परिचय होता, हें माझें भाग्यच! ).
- दुसरें म्हणजे, आपलें जुने, कालिदास-भास-भारवि-दंडी-भवभूती-पाणिनी-वररुचि-पतंजलि-कौटल्य-व्यास-वाल्मीकि इत्यादींचें साहित्य आपण वाया जाऊं देणार आहोत काय ? धर्माचें जाऊ द्या, पण वेद हे जगातील अति-प्राचीन वाङमयांपैकी एक आहे (कदाचित् सर्वात-प्राचीनही असेल) , आपण त्याला दुर्लक्षून, त्याला ‘लुप्त’ किंवा ‘नष्ट’ होऊं देणार आहोत काय ? तसें केलें तर, आपल्यासारखे ‘हतभागी’ आपणच!
- हें म्हणजे, ‘आपले माता-पिता अतिशय म्हातारे झाले आहेत, त्यांचा व्यावहारिक उपयोग काय?’, असें म्हणण्यासारखेंच आहे. (माझ्याप्रमाणें साठी-सत्तरीच्या पुढलें वय असलेल्या मंडळींना माझ्या या कथनाची योग्यायोग्यता पटेलच).
(इथें माझा हेतू अजिबात व्यक्तिगत नाहीं ; तर मुद्दा मांडण्यासाठी दिलेलें हें फक्त उदाहरण आहे ; हें कृपया ध्यानीं घ्यावें, ही माझी शिरवळकरांना विनंती).
- कर्मकांडाचा भाग सोडून द्या, पण श्राद्ध व पितृपक्ष यांचा मूळ उद्देशच, आपल्या पूर्वजांची आठवण काढणें व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणें, यासाठीच आहे. आपण मोठ्या लोकांची जयंती, पुण्यतिथी, सेंटेनरी वगैरे साजरी करतो, यामागचा हेतू, त्यांची स्मृती कृतज्ञतापूर्वक जागवणें, हाच आहे.
हें सर्व करायचें , मग पुरातन साहित्याचें जतन कां करायचें नाहीं ?
- ‘वंदे मातरम्’ या गीतानें स्वातंत्र्यपूर्व काळात लाखो भारतीयांना स्फूर्ती दिली. ‘जन-गण-मन’ हें तर भारताचें राष्ट्रगीत बनलें . ‘ सत्यम् शिवम् सुंदरम्’ हा एक पॉप्युलर वाक्प्रचार बनलेला आहे. आणि, हे सगळे आधुनिककालीन आहेत, पुरातन नाहींत. म्हणजे, अगदी २०व्या शतकातही संस्कृतचें जें महत्व होतें, तें ध्यानात येईल.
- जर्मनी, USA वगैरे पाश्चिमात्य देशांमध्ये आजही संस्कृतचा अभ्यास करणारी अध्यासनें आहेत, विद्वान आहेत ; आणि आपण भारतीयांनी मात्र त्या साहित्याच्या विरोधात बोलायचें, याच्यासारखी खेदकर parody दुसरी नसेल.
- मला ‘ मॅस्लोची नीड्-हायरार्की ’ या मानसशास्त्रीय सिद्दांताची आठवण येते. त्या सिद्धांताप्रमाणें , ‘उभ्या-त्रिकोणा’च्या आकृतीतील, ( ) , पायाजवळच्या, म्हणजे खालच्या तळाजवळच्या-भागातील , needs (आवश्यकता) आधी पूर्ण व्हाव्या लागतात ; आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच, वरच्या (उच्च) पातळीतील needs पूर्ण करण्याकडे कल असतो. त्यामुळे, लोक आधी, जीवनोपयोगी, career साठी आवश्यक, प्रोफेशनसाठी जरुरी असलेल्या, गोष्टीतच बुडालेले असतात. म्हणून, भाषेची शुद्धाशुद्धता, संस्कृत-भाषेचें महत्व व तिच्यातील ज्ञानामुळे होणारा फायदा, असल्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, किंवा त्याचें महत्वही त्यांना वाटत नाहीं. तें ठीकच आहे, तें परिस्थितीजन्य आहे ; व त्यामुळे, त्यासाठी त्यांच्या priority साठी त्याना दोष देतां येत नाहीं.
पण , वर उल्लेखलेल्या ‘३ टक्क्यांनी ’ जरी याचा विचार केला , तरी काळजी करायचें कारण नाहीं.
- लिपी व संस्कृतचा तसा अर्थाअर्थी संबंध नाहीं, व प्रादेशिक भाषांच्या लिप्यांमध्ये संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहेत, याचा उल्लेख आपण आधीच केला आहे.
त्यातून आतां, सॉफ्टवेअरद्वारें ‘ट्रान्सलिटरेशन ’ ( लिपीबदल) क्षणार्धात शक्य होतें. त्यामुळे, भारतीय भाषांच्या संदर्भात तरी, लिप्यांच्या भिन्नत्वाचा प्रश्न निकालात निघालेला आहे.
- व्यासंगी विद्वान ( व लोकसत्ताचे भूतपूर्व प्रमुख संपादक) अरुण टिकेकर यांचें संस्कृतसंबंधी, मराठीसंबंधी व in-general भाषेसंबंधी कांही विचार उद्धृत करतो –
“भाषेच्या बाबतीत आपलें ‘तोडी नाख तबला अने फोडी नाख पेटी’ असें झालें आहे. संस्कृत भाषेचा पाय आपण तोडून टाकला. संस्कृत थोडी फार आली की बर्याच भारतीय भाषा कळण्याची सोय होते, हें आपण विसरलो आणि संस्कृत ही ‘मृत भाषा’ असा ग्रह करून घेतला. संस्कृत ही ब्राह्मण्याची निशाणी असल्याचें मानलें. …. पाठांतर करणें कमीपणाचें मानलें. ……. ‘द्विभाषा-कोविद’ , ‘त्रिभाषा-कोविद’ मंडळी आज अचानक कुठे गेली ? या प्रश्नाचा शोध घेतला की, देश–स्तरावर मराठी प्रभाव कां उरला नाहीं, मराठी-भाषकांना कोणत्याच क्षेत्रात कोणीच कसें विचारत नाहीं, ….. कन्नड-बंगाली भाषांचा प्रभाव कां ‘वाढत चालला आहे’, याचें उत्तर मिळतें. ….. संस्कृत ही शिष्टांची, तथाकथित उच्चभ्रूंची, उच्चवर्णीयांची भाषा, म्हणून ती आम्ही शिकणार नाहीं. शिवाय ती ‘मृत भाषा’. ती शिकवायचें–शिकायचें कारणच नाहीं, हें आहे आमचें तर्कट. संस्कृत शिकल्यानें मराठी चांगली होईल हें कोणालाच ‘पटत’ नाहीं. ….. एक भाषा चांगली आली तर दुसरीही लवकर समजते–उमगते हें मानायला आम्ही तयार नाहीं. …. मुंबई–पुण्याकडल्या आणि कोंकण–घाटाकडल्या मराठी भाषकांची हिंदी हा तर देशभरच्या लोकांच्या चेष्टेचा विषय असतो. मग आम्हाला कोणती भाषा नीट, व्यवस्थित येते म्हणायचें ? कोणतीच येत नाहीं हेंच विदारक सत्य आहे” .
मोठा उतारा आहे, पण महत्वाचा आहे. मोठ्या व्यासंगी, संशोधक, संस्कृती,भाषा यांच्या बद्दल आस्था बाळगणारा, सामाजिक विचार करणारा, सामाजिक कमतरतांबद्दल मन:पूर्वक खंत बाळगणारा, अशा अरुण टिकेकरांचें कथन उद्धृत केल्यावर, त्या विषयाबद्दल आणखी कांहीं बोलायची आवश्यकता नाहीं.
- ‘भौतिकशास्त्रांच्या सर्व शाखांमधील संशोधन आणि ज्ञानाचा आवाका वेगानें वाढत असतांना तें ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्याचा मर्यादित वेळ द्यावा लागत असतांना तो वेळ क्लिष्ट संस्कृतच्या अध्ययनात कोण वाया घालवूं शकेल ? ’ ( इति शिरवळकर) –
- कुणालाही जें करावेसें वाटतें, तें करण्याचें त्यांना भारतीय संविधान स्वातंत्र्य देतें.
*मात्र, एक गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी की, जर समाजातील सर्वांनीच , फक्त भौतिकशास्त्र, फक्त इंजिनियरिंग , फक्त कंप्यूटर अशा कुठल्याही एका क्षेत्रातच शिक्षण, कार्य व करियर केलें तर, सगळा समाज एकसुरी होऊन जाईल, लोक जणूं ‘क्लोन’सारखे होऊन जातील. आणि, तसें झालें तर, समाजासाठी ती फारच धोकादायक गोष्ट आहे. समाजानें मल्टिडायमेन्शलच असायला हवें, तरच त्याची सर्वांगीण प्रगती होईल.
*सामाजिक काय, सांस्कृतिक काय, भाषिक काय, या सर्वांच्या बाबतीत हें ध्यानात ठेवायला हवें की, कधीच परमनंट ‘Steady State ’ नसते ; तेव्हां जर प्रगती होत नसेल तर अधोगती निश्चितच ! आणि, हें, ’आज’ म्हणजे सद्य स्थितीत कळत नाहीं, तर कांहीं काळाने मागे-वळून पाहिल्यावरच तें जाणवते, आणि ‘हा Turning Point होता ’ असें त्यावेळेसच कळतें.
*(एक उदाहरण म्हणजे, आपण औरंगझेबाच्या राज्याकडे बघूं. त्याच्या कृत्यांमुळे मुघल साम्राज्य रसातळाला जाईल, असें कुणी त्याच्या राज्यकाळात वर्तवलें असतें, तर त्याला सगळ्यांनी वेड्यातच काढलें असतें. पण मुघल साम्राज्याचा र्हास त्याच्या उत्तर-काळापासूनच सुरूं झाला , हें सत्य, नंतर, मागून पाहिल्यावर प्रतीत होतें.)
*म्हणून, कुणाला भौतिकशास्त्र शिकायचें असेल, त्याने (अथवा तिनें) तें जरूर करावें, अन्य कुणाला कला-क्षेत्रात जायचें असेल त्यानें तसें करावें, कुणाला भाषाशास्त्रात, किंवा खासकरून संस्कृतशी संबंधित क्षेत्रात कार्य करायचें अशेल, तर त्याला ( / तिला ) ती फ्रीडम आहे. आणि, भाग्याची गोष्ट अशी की, विविध लोकांच्या आवडीनिवडी भिन्नभिन्न असतातच. उदा., नाटक-सिनेमात करियर करणार्यांना कुणी सांगून बघावें की, ‘इथें पाय जमवणें कठीण आहे, इथें अस्थैर्य आहे, इथें रात्रंदिवस काम करावें लागतें, हेल्थवर अनिष्ट परिणाम होतो, पहा किती आत्महत्या होतात तें’, वगैरे वगैरे. पण ज्याला / जिला त्या क्षेत्रात जायची तीव्र इच्छा आहे, तो / ती या सगळ्या सांगण्याकडे कानाडोळाच करेल.
*त्यामुळे, शिरवळकरांनी असें assume करूं नये की, सगळ्याच लोकांना सायन्स व त्यावर आधारित विषयांमध्येच रस असेल ; व कुणालाच संस्कृत शिकायची इच्छा नसेल.
- समाज कुणावरही अमुक एका प्रोफेशनची सक्ती करूं शकत नाही, (आणि, तसें केल्यास काय होऊं शकेल, याची कल्पना येण्यासाठी आयन रँड या लेखिकेची ‘अँथम’ ही कादंबरी अवश्य वाचावी).
- संस्कृतचें अध्ययन जर इतकें useless असतें, तर मग जर्मनी, इंग्लंड व USA मधील reputed युनिव्हर्सिटींनी (उदा. हार्वर्ड) , संस्कृत विषयाची ‘चेअर’ ठेवलीच नसती , आणि आजही ( होय, आजही, अगदी २१ व्या शतकातही ) पाश्चिमात्य ज्ञानी व्यासंगी विद्वानांनी त्यांचें आयुष्य संस्कृत व पुरातन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासात घालवलें नसतें. मला पाश्चिमात्यांचें उदाहरण देतांना कांहीं आनंद होतो आहे असें नाहीं , पण सत्य नजरेआड करूनही चालणार नाहीं. हें म्हणजे कस्तुरीमृगासारखें होतें आहे ; त्याला माहीतच नसतें आपल्याकडे काय अमूल्य ठेवा आहे , पण सर्वत्र तो सुगंध दरवळत असतो. आम्हीच आमच्याकडील अशा अनमोल ठेव्याला ठोकरायचें , आणि पाश्चिमात्यांनी त्याचें महत्व जाणून त्याचा अभ्यास करायचा, या paradox ला काय म्हणावें !
- शिरवळकरांच्या शेवटच्या कमेंटबद्दल :
असें मोरेही म्हणत नाहींत, किंवा अन्य कुणीही म्हणत नाहीं की, ‘आपली मातृभाषा सोडून द्यावी व फक्त संस्कृतचाच अंगिकार करावा, तिच्याच वापराचा आग्रह धरावा ’. हा शिरवळकर यांचा केवळ अपसमज आहे. भारतात बहुभाषिकत्व अनेक सहस्त्रकांपासून आहेच. त्यामुळेच तर आपण इतर अनेक भाषा शिकतो. इंग्रजी तर आपण शिकतोच शिकतो, कारण ती काळाची गरज आहे. पूर्वी गोव्याचे लोक पोर्तुगीझ शिकत. शेजारील-प्रदेशाची भाषाही आपण अनेकदा शिकतो (जसें , गुजराती). कांहीं जण तर, फ्रेंच, जर्मन, चिनी मँडेरिन , जपानी, रशियन, स्पॅनिश, अशा परदेशीय भाषाही शिकतात. त्याचप्रमाणें, कुणालाही संस्कृत शिकायाला हरकत नसावी.
- ‘संस्कृतसाठी राष्ट्रभाषेचा दर्जा हा निष्फळ प्रयत्न’, हें शिरवळकरांचे म्हणणें एका अर्थानें बरोबर आहे.
- आपण या विषयावर कांहीं चर्चा केलेली आहे. एक तर, ही संधी १९४७-१९५० नंतर गेलेली आहे. दुसरें म्हणजे, आजही भारताची ऑफिशियली कुठलीही राष्ट्रभाषा नाहीं (हिंदीसुद्धा).
- संविधानानें अनेक भाषांना मान्यता दिलेली आहे, तशी मान्यता संस्कृतलाही द्यायला (अजून दिली नसल्यास) , हरकत नसावी.
(पुढे चालू )
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply