संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान :
शेषराव मोरे यांच्या लेखाचें हेंच शीर्षक आहे, त्याअर्थी, तसें योगदान वास्तवात आहे, असें त्यांचें मत असल्याचें स्पष्ट आहे. मी या बाबतीत मोरे यांच्याशी सहमत आहे.
- गेल्या कांहीं सहस्त्रकांचा भारताचा इतिहास पाहिला तर, भारताच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या काळात भिन्नभिन्न राजवटी होत्या. इ.स च्या आधीची कांहीं व इ.स.च्या सुरुवातीची कांहीं शतकें भारताच्या कांहीं भागात (महाराष्ट्राचाही कांहीं भाग) शक, कुषाण, हूण वगैरेंची सत्ता होती. मध्य युगात आसामातील कांहीं भागात ब्रह्मदेशाच्या सीमेवरून आलेल्या अहोम यांची राजवट होती. गेली जवळजवळ १००० वर्षें पाहिली तर, इ.स ११९२ (महंमद घोरी) ते १७५७-१८५७ पर्यंत (म्हणजे, पलाशीची, प्लासीची, लढाई ; गदर / स्वातंत्र्ययुद्ध) , या ५५०-६५० वर्षांतील बराच काळ, बर्याच भागात मुस्लिमांची राजवट होती (विजयनगर, राणाप्रताप, शिवराय, छत्रसाल, मराठे, हे कांहीं अपवाद) . १९४७ पर्यंत, म्हणजे शेदोनशे वर्षें परदेशी इंग्रजांची (जे प्रोटेस्टंट आहेत) राजवट होती. चारसाडेचारशे वर्षें गोव्यावर पोर्तुगीझांची सत्ता होती (जे रोमन कॅथॉलिक आहेत) , व कांहीं थोड्या भागावर फ्रेंचांची सत्ता होती. या भूभागात वेवगेगळ्या काळीं भिन्नभिन्न प्रादेशिक भाषा उदयाला आल्या व लोपल्या. एवढें सगळें होऊनही भारतातील भावनिक ऐक्य अढळ राहिलें. याचें कारण म्हणजे संस्कृतच्या साह्यानें भारतभर आधीच्या काळात (व नंतरच्याही काळात ) पसरलेली व स्थिरावलेली ‘कॉमन’ संस्कृती. एवढेंच नव्हे, तर, ही संस्कृती अनेक शतकें ‘Far East आशिया’मधील देशांमध्येही पसरली . इथें अभिप्रेत आहे ती, राजकीय-सत्ता नव्हे , धार्मिक-अधिसत्ता नव्हे ; तर भौगोलिक संदर्भात सांस्कृतिक-ऐक्य, हें आहे.
- भारतीय परंपरा पाहिल्यास, आपल्या येथील बहुतांश लोक व विद्वज्जन, अन्य धर्मांप्रमाणें ‘एकाच पुस्तकाला’ (जसें, बायबल किंवा कुराण ) बांधील नव्हते. भारतात वेदप्रामाण्यही चाले व अवैदिक दर्शनेंही आहेत. एकेश्वरवार-अद्वैतवाद-द्वैतवाद-विशिष्टाद्वैतवाद-इहवाद-निरीश्वरवाद, अनेक विचारधारा नांदल्या आहेत. (इथें ‘वाद’ म्हणजे विचारधारा, असें अभिप्रेत आहे). अनेक पंथ आहेत. येथें वैविध्य हें natural समजलें जातें. भारतात वादसंवादाची परंपरा आहे. ( इथें ‘वाद’ म्हणजे मुद्देसूद , point-by-point डिस्कशन , पॉइंट-काउंटरपॉइंट , मुद्दा आणि त्याचें उत्तर, प्रश्न-प्रतिप्रश्न, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, अशा प्रकारची जी बौद्धिक चर्चा चाले, ती अभिप्रेत आहे. याचें एक उदाहरण म्हणजे, आद्य शंकराचार्य व पंडित मंडनमिश्र यांच्यात झालेला बौद्धिक ‘वाद’). इथें विद्वत्सभा होत, राजेही आपल्या पुढाकारानें अशा सभा भरवत. तिथें अनेक विषयांची गंभीर चर्चा चाले, विचार-वैविध्य स्वीकारलें जाई, फ्रीडम-ऑफ-एक्सप्रेशन, फ्रीडम-ऑफ-थॉट यांना मान होता. रामायण-महाभारत-भगवद्गीता-हरिवंश-भागवत, वगैरे ग्रंथांनीही भारतभर पसरून, या भूभागात संस्कृतिक एकात्म्य साधायला मोठी मदत केलेली आहे. अन्य विषयांच्या ग्रंर्थांनीही तेंच केलें, उदा. चरक-सुश्रुत-वाग्भट यांच्या ग्रंथांनी आयुर्वेद भारतभर पसरवला.
- विविध विषयांचे ग्रंथ लिहितांनाही, ग्रंथकर्ता पूर्वसूरींचा सन्मानपूर्वक उल्लेख करून व त्यांची मतें मांडून, नंतर आपलें स्वत:चें भिन्न मत मांडत असे.भारतात, ‘यूनिटी इन् डायव्हर्सिटी’ खरोखरच होती, आणि ही ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यात संस्कृत भाषेचा मोठाच सहभाग होता / आहे.
- या संदर्भात लोकमान्य टिळकांच्या, केसरीमधील अग्रलेखाचा कांहीं भाग पहा ( संदर्भ : ‘महाभारत : संघर्ष आणि समन्वय’ , लेखक – रवीन्द्र गोडबोले ) –
‘….लोकांच्या.आचारात किंवा विचारात जें कांहीं साम्य आहे तें महाभारत किंवा रामायण या आर्ष महाकव्यांमुळेच उत्पन्न झालें आहे ; व आजमितीस जागृत आहे. बंगाल्यात जा, काश्मिरात जा, किंवा मद्रासेत जा, रामायण–महाभारतातील कथा, उपकथा किंवा आख्यानें ही लोकांस सारखीच आवडतात, व त्यांच्या श्रवणानें एकसारखेच विचार त्यांच्या मनांत उत्पन्न होऊन भरतभूमीच्या राष्ट्रीय ऐक्याची साक्ष देतात… ’ .
लोकमान्य टिळक हे थोर राजकीय नेते तर होतेच, पण ते संस्कृतचे आणि संस्कृती या विषयांचे मोठे विद्वान होते. ‘गीता रहस्य’, यासारखे तत्वज्ञानाधिष्ठित व ‘Orion’, ‘Artic Home In the Vedas’ यासारखे संशोधनाधारित ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. तेव्हां त्याचे एकात्मकेबद्दलचें मत ग्राह्य धरायलाच हवें.
- राजोपाध्ये यांच्या एका ऑब्झर्वेशनबद्दल : मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद :
‘… मराठी अभ्यासविश्वात सांगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती ’ ( इति राजोपाध्ये ) :
हा मुद्दा महत्वाचा आहे जरूर, पण तो मूळ विषयाशी डायरेक्टली संबंधित नाहीं, म्हणून, त्याचा परामर्श, मुद्दाम शेवटी, ‘ परिशिष्ट – (२) ’ मध्ये घेतला आहे.
मात्र, मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद बर्यापैकी-व्यवस्थित मिळाला आहे , असें मला वाटतें.
(पुढे चालू )
— सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply