जान्हवीचे लग्न, लक्ष्मी काकूंनी थाटामाटात लावून दिले होते. प्रेमविवाह होता, शेखर तसा, त्यांना सालस वाटला. मियाँ बीबी राजी! त्यांनी आडकाठी केली नाही.
मांडव परतणी साठी, शेखर आणि जान्हवी आले तेव्हा, लक्ष्मी काकूंनी त्या दोघांचे एक जॉईंट अकाउंट जवळच्या बँकेत उघडून घेतले. दोन दिवस राहून ते नवीन जोडपे परत जाण्याच्या तयारीस लागले. दोघेही नौकरीचे, रजेचे प्रॉब्लेम होते.
जान्हवी एकटीच आपली सूट केस भरत होती.
“येऊ का जानू? झाली तयारी?” काकूंनी रूममध्ये प्रवेश करत विचारले.
“काकू? अग, असं परक्यासारखं विचारतेस काय? ये कि. आणि शेवट पर्यंत, हे तयारीच झेंगट संपत नाही बघ. बोल काय म्हणतेस?”
“हे बघ बाळा, तुझी आई असती तर, तुला चार संसार उपयोगी गोष्टी, माझ्या पेक्ष्या ज्यास्त सांगितल्या असत्या. ती शिकलेली होती. मी आडाणी बाई!”
“काकू! बस कर ते जून रडगाणं! एक तर तू फक्त नात्याने काकू आहेस, पण माझ्यासाठी आईच आहेस! आणि शिक्षणा पेक्षा तुझा अनुभव मोठा आहे.आणि मला त्याचा अभिमान आहे.”
“बर, तर मग, माझं ऐक. मी तुम्हा दोघांचं एक, जॉईंट अकाउंट मी बँकेत उघडल. त्याच हे पासबुक. आज माझ्या लेकीचं लग्न झाल, म्हणून यात माझ्याकडून दहा हजार भरलेत. तुम्हीहि काही सुखद घटना घडली तर, त्यात काही पैसे भरून, ती घटना लिहून ठेवत जा. एक आठवण म्हणून.”
“ओके. काकू. मस्त कल्पना आहे! शेखरला पण आवडेल!”
तिला ते पासबुक देऊन काकू निघून गेल्या.
०००
प्रेम म्हणजे प्रेम असत, पण लग्न म्हणजे व्यवहार असतो. अनेक तडजोडी कराव्या लागतात. चूक नसतानाही नमतं घ्यावं लागत. जोडीदाराशी मतभेद होतात. जिव्हारी लागणारे अपमान सहन करावे लागतात. नवरा-बायकोतला इशू, चीडचड हे सगळंच येत. याला जान्हवी आणि शेखरही अपवाद नव्हते. घरच आवरून, ऑफिसला पोचताना जान्हवीची दमछाक होत होती. शेखर मदत करत नव्हता. दमून भागून शेखर घरी आला तर, जान्हवीची मिटिंग उपटायची!
खडाजंगी रोजचीच झाली होती.
“शेखर, हे अति होतंय! मी हि माणूस आहे. माझ्याही शक्तीला मर्यादा आहेत! मी हि तुझ्या सारखीच जॉब करते! कर ना, एखादा दिवस हाताने चहा! काही बिघडत नाही!”
“जानू, हल्ली शुल्लक कारणांचा तू इशू करतेस. मी सहज म्हणालो होतो, चहा कर म्हणून. कारण माझं डोकं दुखतंय!”
“डोकं दुःखेंना तर काय होईल? रोज मिटींगच्या नावाखाली दारू ढोसून येतोस!”
“ओ गॉड! आतातर तू मला चक्क दारुड्या ठरवते आहेस! काय भुरळ पडली होती कोणास ठाऊक? तुझ्या सारखी भांडकुदळ बायको गळ्यात बांधून घेतली!”
“मी आले नव्हते. माझ्याशी लग्न कर म्हणून तुझ्या दारी! तूच गोंडाघोळात होतास!”
असली भांडण नित्यात आली.
आणि दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला!
०००
घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर, तिने काकूला फोन लावला.
“काकू. मी आणि शेखरनी वेगळं व्हायचं ठरवलंय! तुझ्या कानावर घालावं म्हणून आणि तुझा सल्ला घ्यावा म्हणून फोन केलाय!”
“काय? वेगळं होतंय! आता तुमचा निर्णय झालाच असेल, तर त्याला तशी कारणही असतीच म्हणा! मी ती विचारणार नाही. कारण त्या मुळे तुला त्रासच होईल. असो. ठीकच आहे. जमत नसेल तर, केवळ लोकलज्जे खातर एकत्र राहू नये! पण त्या पूर्वी तू, मी दिलेल्या पासबुकातील सगळी रक्कम खर्च करून मोकळी हो! शेखरसोबतच्या त्या आठवणी मागे रहायला नकोत! मग खुशाल पेपर साइन कर डायव्होर्सचे! तू मोकळी झालीस कि सांग. दुसरं ठिकाण शोधू! ठेवू आता!”
“बाय! आणि थँक्स काकू!”
जान्हवीने फोन कट केला.
०००
ती आपले पासबुक बँकेत जमा करून, खात बंद करण्यासाठी लाईन मध्ये उभी होती. लांब नंबर होता. वेळ जावा म्हणून तिने हातातलं पासबुक उघडलं. त्यातील एंट्री वरून तिची नजर फिरू लागली. रिमार्क कॉलम मधील नोट्स पण पहात होती.
२० फेब.— रु.१०,०००/- जमा. -जानूचे लग्न झालं.काकू तर्फे.
०२मार्च —-रु.५०००/- जमा. हनिमूनला जातोय. जानव्ही
१५मार्च —–रु. ५००/-जमा. नवा टीव्ही घेतला.शेखर.
०५मे ——-रु १०००/- जमा.मला प्रमोशन मिळालं. जानू.
३०मे ——–रु.२०००/-जमा.शेखूच सिलेक्शन
२०जून.—–७०००/- जमा. जानूची प्रेग्नन्सी. कन्फर्म! शेखर.
आणि असे बरेच से होत. जवळ पास चाळीस हजार जमा होते! रकमेपेक्षा आठवणी अनमोल होत्या. किती सुंदर दिवस शेखर सोबत आल्यापासुन घालवले आहेत? शुल्लक इगो पायी, आपण त्याच्यावर आणि स्वतःवर अन्याय करायला निघालो होतो. पण आता केवळ आपण सरेंडर करून, फारशे हाशील होणार नाही. शेखरने पण माघार घ्यायला हवी. तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. ती बँकेची लाईन सोडून माघारी फिरली. काऊंटर जवळ आलेला नंबर सोडून जाणाऱ्या बाईकडे, लोक आश्चर्याने पहात होते.
०००
“शेखर, हे पासबुक घे. यात काही पैसे आहेत. ते तू हवे तसे खर्च करून टाक. ते झाले कि सांग, मी लगेच डायव्होर्स पेपरवर सही करते!”
शेखर आश्चर्याने तिच्याकडे पहातच राहिला. पण काही न बोलता त्याने ते पासबुक, आपल्या ऑफिस बॅगेत कोंबले. आज ऑफिसात जाता जाता हे खात बंद करून टाकू. बँक वाटेतच तर आहे, असा काहीसा विचार करून तो घराबाहेर पडला.
जान्हवी आज घरीच राहिली होती. शेखररात्री उशिरा घरी आला. त्याने बॅगेतून सकाळचे पासबुक टेबलवर आपटले. आणि शॉवर घ्यायला बाथरूम मध्ये निघून गेला. काही तरी बिनसले होते.
हा बँकेत गेलाच नाही कि काय? तिने थरथरत्या हाताने ते पासबुक उघडले. आश्चर्याने ती डोळे फाडून पहातच राहिली.
त्यात आजच्या तारखेस एक एन्ट्री होती!
रु. २१०००/- जमा. माझे प्रेम आणि संसार वाचल्याबद्दल! तिच्या डोळ्यात पाण्याचा डोह साचू लागला. मागून शेखरने तिला अलगद मिठी मारली. त्याने नुकत्याच घेतलेल्या शॉवरमुळे, बॉडी शाम्पूच्या मंद सुगंधात येत होता, ती त्यात विरघळून गेली.
“सॉरी!” ती कशीबशी पुटपुटली.
“जानू! नो थँक, नो सॉरी! आपलं, प्रेमात हेच ठरलं होत! आताही तेच असू दे! आज मला एक नवीन धडा मिळालाय! मी लग्नाआधी, तुझ्यावर प्रेम करायचो तेव्हा, कधी तुझ्याकडून कसली अपेक्षा केली नव्हती. हे आपेक्षेचं मोहळ आपल्या लग्नानंतरच! तेव्हा आज पासून, नो सॉरी! नो थँक! आणि नो अपेक्षा!! तरी आजवर जे, मूर्खासारखं वागलो त्याबद्दल! सॉ —” त्याचा ‘सॉरी’ शब्द तोंडातच राहिला, कारण तिच्या ओठानी त्याचा मार्गच बंद करून टाकला होता.
जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर, ती ‘कुटुंब’ हे व्यवस्था आहे. तिला वाचावा! जमले तर एखाद पासबुक तुम्हीही उघडून घ्या!
— सु र कुलकर्णी.
तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून )
Leave a Reply