पत सांभाळण्या तीर मारिला
बादशहाचा पुत्र राहिला
पर्जन्याचा कहर झाला
पाच्छापूरी तो भयभीत झाला
अर्थ–
दिल्लीचा बादशहा, आलमगीर, आलंपन्हा औरंगजेब याचा पुत्र अकबर त्याच्या कपटी स्वभावास, त्याने केलेल्या अघोरी कृत्यांना जाणून होता. ज्याने आपल्या भावाला आणि बापाला मारलं तो आपल्या मुलाची किंमत काय करेल अशी भीती अकबरास वाटू लागली आणि ठिणगी पडली, अकबर फुटला आणि बापविरोधात बंड पुकारून उत्तरेतून दख्खनला आला तो थेट संभाजी महाराजांना भेटायला. हात मिळवणी करायची तर संभाजीशीच हे तो ठरवून आला होता. बादशहाचा मुलगा मी हा अहंकार मनातून काही जात नव्हता आणि संभाजी मला लगेच भेटेल आणि स्वतः बादशहाचा पुत्र आला म्हटल्यावर तशीच वागणूक, अदब, सेवा आपल्या पदरात पडेल अशी अपेक्षा अकबरास होती पण झाले उलटेच. संभाजी राजांना अकबर येत असल्याची बातमी समजली पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या साठी सुद्धा ही सुवर्ण संधी होती औरंगजेबाला चारहीमुंड्या चित करण्याची पण, जरी बादशहाचा मुलगा असला तरी तो त्यास योग्य आहे का हे पारखून घेणे गरजेचे होते आणि म्हणूनच संभाजी राजांनी त्याला एकदम भेटणे टाळून त्यास रहाण्यास सुधागडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावात बोलाविले. गावातल्या वाड्यात अकबर राहू लागला, भेटीसाठी तळ मळू लागला. पावसाळ्याचे दिवस होते आणि सह्याद्रीत होणारी जलवृष्टी म्हणजे जलप्रलयाचा जणू नादच. तो अविरत पडणारा पाऊस, ते विजांनी हादरवून जाणारं आभाळ, सभोवताली असलेले घनदाट जंगल, अहोरात्र पडणारा पाऊस हे सारं काही अकबराच्या मनाला सुरुंग लावण्याचे काम करत होते.अकबर खचला, भेटीसाठी संभाजी राजांकडे भीक मागू लागला. अखेर राजांनी भेट दिली. पुढे जाऊन काही मोहिमा एकत्र हाती घेतल्यासुद्धा पण जसा औरंगजेब दख्खनवर चालून येत असल्याची खबर अकबरास समजली तसे त्याने जंजिरा मोहीम अर्धवट सोडून अफगाणिस्तान कडे पलायन केले ते पुढे परत न येण्यासाठी.
आपल्या आयुष्यात देखील असे प्रसंग येत असतात, ज्यावेळी काय करावे सुचत नसते, कोणाशी हातमिळवणी करावी, कोणास दूर करावे हे लक्षात येत नाही तेव्हा सय्यम बाळगून पावलं उचलणं गरजेचं असतं नाहीतर अकबरसारखी अवस्था व्हायला वेळ लागत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply