मुक्ताईनगरच्या प्रवासाची अपूर्वाई माझी भगिनी आणि बंधू यांना जास्त होती कारण १९७५ च्या जडण-घडणीच्या वयापासून ते आता पोक्तपणाच्या (२०२२) वयापर्यंतीच्या वाटचालीत ते या परिसरापासून दूर होते. साहजिकच त्यांची (आणि नेहेमीप्रमाणे उगाचच माझीही) अवस्था- “छोड आए हम वो गलियाँ ” अशी झाली होती. परतल्यावर मला सहज चाळताना चक्क २२/०४/२०१३ ची खालील नोंद आढळली.
……………………………………………………………………………………………………
“नैत्रवैद्य बिल्डींग ”
हे भुसावळच्या आमच्या इमारतीचे नांव होते आणि आमच्या पत्त्याची ती औपचारिक ओळख होती. १९७५ नंतर तिची पडझड झाली आणि आता सध्याचे तिचे रूप नक्कीच बघणीय नाही. त्या ढिगाऱ्याखाली बालपणाच्या आठवणी नक्कीच थोड्याफार चिरडल्या गेलेल्या आहेत. पण तरीही या विषयावर कादंबरी लिहिण्याची घोषणा इतके वेळा झाली आहे की तो आता चेष्टेचा विषय झाला आहे.
खरंतर ही कल्पना सुचली, मार्च २०१० मध्ये – ” विपश्यने ” च्या वेळी ! त्या दिवसांमध्ये इतके उचंबळून टाकणारे प्रसंग उसळ्या मारून मनाच्या पृष्ठभागावर आठवत होते की वाटलं होतं हातात नव्याने पेन घ्यावे. दरम्यान नेहेमीप्रमाणे लाटा विरून गेल्या. चुकून-माकून एखादा प्रसंग अचानक आठवतो आणि मी टिपिकल वाक्य उच्चारत स्वतःला सावरतो- ” आगामी नैत्रवैद्य बिल्डींग मधील प्रकरण किंवा याबाबत अधिक वाचायला मिळेल …” इ इ
मधल्या काळात अग्रक्रम बदलले, झगड्यात वरखाली हेलकावे बसले, मनासारखे झाले नाही आणि या लिखाणाने बॅक सीट स्वीकारली. मोठ्या सायासाने डिसेंबर २०१२ मध्ये भुसावळला “माजी विद्यार्थी मेळाव्याचा “घाट घातला. त्यावेळी सलग एकटाकी ८-९ पाने शाळेबद्दल, वर्गमित्रांबद्दल, शाळेतील शिक्षकांबद्दल लिहिली आणि बरोबर नेली होती -जमलेल्यांना ऐकविण्यासाठी ! पण त्या मेळाव्याचा इतका अपेक्षित विचका झाला की सगळेजण जमता-जमता पांगले.
दरम्यान सौ. नीही अशाच थीमवर पण वेगळा आवाका असलेलं लेखन सुरु केलं आणि मला हक्काचे कारण मिळाले- न लिहिण्यासाठी !
काल सांगलीत असंच काय काय मनात घोळत होतं.अचानक वाटलं -सलग नव्हे तर तुकड्या तुकड्यांनी “नैत्रवैद्य बिल्डींग ” लिहावं आणि उसंतीने सांधत बसू म्हणे ! पण जास्त टाळाटाळ बरी नाही -अशा उत्कट विषयाला. तशीही सध्या चालढकल करावी अशीही परिस्थिती नाहीए.
मित्र-मंडळींनी वालचंदवरील कादंबरीचा (२००४ पासून पुन्हा एकदा माझ्याकडून उगाचच पेंडींग) नाद कधीचाच सोडलाय. त्यामागची कारण परंपरा अर्थातच वेगळी -फक्त कंटाळा कॉमन ! कुणास ठाऊक,या निमित्ताने तेही लेखन fine tune होईल.
तिथे करण्यासारखे फारसे नाही. मेल्स तयार आहेत, फक्त तीन भाषांची मधली सांधेजोड करायची आहे. तोही मग काळाचा एक सलग पट्टा होईल. मेल्समधील विचार,मित्रांच्या भाषेचं सौंदर्य, त्यांचे दृष्टिकोन न बदलता (बाय द वे- या कादंबरीचं नांव असेल ” ए , चला रे !”) , थोडं पॅच वर्क इतपत त्या कादंबरीत अभिप्रेत आहे. फोटो आणि कोलाज टाकून थोडासा नॉस्टॅल्जिया वाढविणे आणि ते पुस्तक “ऐश्वर्यवती ” करणे हा विचार आहे.
सध्या थोडा वेळ आहे, आघाड्या-आणि परिस्थिती आवाक्यात आलीय.
” बजाज “मध्ये सेकंड शिफ्टला बसून, मनाच्या एका अस्वस्थ अवस्थेत “सहप्रवासी” लिहून झाले होते , तसं काहीसं आता जमवून आणायचं आहे. म्हणून अजिबात वेळ न घालविता आज ही सुरुवात !
आणि हो,प्रस्तावित कादंबरीच्या मुखपृष्ठाचे,नेहेमीच्या सवयीने एक स्केच बनवून ठेवलंय -तेवढेच घाट्यांच्या शिरीषचे काम कमी ! तेही गडबडीने शोधायला हवे.
… २२/०४/२०१३
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply