पाऊल आणि पाय, हे दिसायला जरी समान शब्द वाटत असले तरी दोन्हीत खूप फरक आहे. पाऊल हा शब्दच नाजुक आहे तर पाय म्हटलं की, शब्दातच ‘जडपणा’ जाणवतो. लहान बाळ जेव्हा चालायला लागतं तेव्हा आपण त्यानं आज ‘पहिलं पाऊल’ टाकलं असंच म्हणतो.
जेव्हा मराठीच्या अस्मितेबद्दल सांगायचे असते तेव्हा ‘मराठी पाऊल, पडते पुढे’ असे अभिमानाने आपण म्हणतो. दरवर्षी वारकरी आषाढीला पंढरपूरला पायी वारी करतात, तेव्हा त्यांच्या तनामनात एकच ध्यास असतो तो म्हणजे ‘पाऊले चालती, पंढरीची वाट..’ ती ‘पाऊलेच’ त्यांना विठ्ठलाच्या पायापर्यंत घेऊन जातात.
लग्नानंतर गृहलक्ष्मी उंबरठ्यावर ठेवलेल्या मापाला आपल्या उजव्या पाऊलाने पाडून ते ओलांडून गृहप्रवेश करते. गौरी आवाहनाला लक्ष्मीची पावलं काढून घरात देवीची प्रतिष्ठापना केली जाते. त्या गौरीच्या ‘पाऊलखुणा’ आत्मिक समाधान देतात.
एखाद्यावर आपण नाराज झालो तर ती नाराजी पराकोटीच्या शब्दात व्यक्त करताना ‘मी तुझ्या घरात, यापुढे पाऊलही टाकणार नाही’ अशी भाषा वापरतो.
कधी आपल्या मनाप्रमाणेच सारं काही घडत असेल तर त्या घरात आपले पाय रेंगाळतात. आपल्याला आवडणाऱ्या माणसाच्या घरातून आपला पायही निघत नाही.
‘पाऊलवाट’ ही पहिल्यांदा एकट्याचीच असते, नंतर ती वहीवाट होते. पाऊल हे जपून टाकायचे असते तर यशाच्या शिखरावर आत्मविश्वासाने पाय रोवायचा असतो.
कधी एखाद्या क्षणिक मोहापायी स्त्रीचं पाऊल वाकडं पडलं तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. एखाद्या पुरूषाचा व्यसनात घसरलेला पाय हा त्याचा सर्वनाश करु शकतो.
रस्त्याने जाताना मैफलीचे सूर कानावर आले की, नकळत आपले पाय घुटमळतात.
उद्योग किंवा व्यवसायात टाकलेलं पहिलं पाऊल हे कौतुकास्पद असतं तर कधी एखाद्यानं जीवनात केलेली पायपीट ही त्याच्या आयुष्यभराच्या अनुभवांची शिदोरी ठरते.
ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श करताना त्यांचा आशीर्वादाच्या हाताचा आपल्या डोक्याला होणारा स्पर्श अनामिक समाधान देऊन जातो. येता जाता कधी कुणाला आपल्या पायाचा चुकून धक्का लागला तर आपण लगेच त्याची क्षमा मागून मोकळे होतो.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असे आपण सहज म्हणून जातो, मात्र लहानपणी त्याच्याबद्दल केलेला अंदाज मोठेपणी चुकूही शकतो.
जेव्हा आपण खूप चालून कंटाळून जातो, तेव्हा पोहोचण्याच्या ठिकाणी जाण्याचे राहिलेले अंतर पाय ओढत ओढत कापावे लागते.
जी माणसं कोणतेही वाहन न वापरता पायीच कुठेही जातात, त्यांना विनोदाने ‘११’ नंबरची बस म्हणतात.
आपलं डोकं जरी यशानं आभाळाला टेकलं असलं तरी पाय मात्र जमिनीवरच असावेत. जीवनात ज्याला हे कळलं, तोच खरा माणूस!
चालताना पुढच्या पायास ठेच लागली तर लगेच मागचा शहाणा होतो. तो खाली बघून चालण्याची सूचना देतो. रात्री अचानक वीज गेल्यावर आपल्या पायांनाच दिसू लागल्यासारखे आपण जपून पाऊल टाकू लागतो.
पायांचं महत्त्व खूप आहे, आपल्या शरीराचा संपूर्ण भार व तोल ते अविरत सांभाळतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढल्यावर ते संकटसमयी पळू शकत नाहीत.
शाळेत असताना शिक्षा म्हणून ओणवं होऊन पाय धरण्याची शिक्षा सहज सहन केली जायची. मोठं झाल्यावर ओणवं तर होता येत नाहीच, मग पायापर्यंत बोटं कशी पोहचणार?
जीवनात, व्यवसायात यशाच्या दिशेने एकेक पाऊल टाकत पायऱ्या चढताना आपल्याला अनेक सुहृद हात देऊन वरती आपल्याबरोबर घेतात, काहीजण असूयेपोटी ढकलूनही देतात. त्यांना हे कळत नाही की, काही काळानंतर याच पायऱ्या उतरताना पुन्हा यांच्याशी गाठभेट होणार आहे.
एकेक ‘पाऊल’ टाकत मी इतकं तुम्हाला सांगितलं, आता मात्र मी काढता ‘पाय’ घेतो.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-३-२१.
Leave a Reply