”पाऊले चालती ऽऽ” हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे. हे शब्द, एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. पण त्याचे गंतव्य स्थान निश्चित आहे. चालणार्याला हे माहीत आहे. ते स्थान तो कधी गाठणार आहे हे मात्र अज्ञात आहे. ”अजूनी वाट चालतचि आहे” असे प्रत्येकजण म्हणत म्हणतच एका लांबच्या यात्रेचा प्रवासी असतो.
प्रस्तुतचा ‘पाऊले चालती’ हा ग्रंथ म्हणजे असाच एक दीर्घ प्रवास आहे. अथक परिश्रमांची तयारी, गुणग्राहक व चैतन्यशील वृत्ती, चोख व्यवहार आणि शिस्तबद्ध कार्यशैलीच्या जोडीला समन्वयशील स्वभाव, कुशाग्र बुद्धिमत्ता अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाचे म्हणजे ग्रंथलेखक श्री मायगोखले यांचे विविध पैलू उलगडून दाखविणारे हे जीवनानुभव म्हणजे एक प्रदीर्घ कादंबरीच आहे. त्याचा कालावधी लेखकाच्या सध्याच्या आयुष्याएवढ्या म्हणजे जवळजवळ चौर्याऐंशी वर्षांचा आहे. या अनुभवांचे गाठोडे विविध प्रसंगांनी, कौटुंबिक अनुबंधानी आणि अनेक व्यक्तींच्या संबंधांनी, सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक घटनांनी भरलेले आहे.
या ग्रंथाचे लिखाण म्हणजे जसे आपण सहजपणे बोलतो, संवाद साधतो त्याप्रमाणे या ग्रंथाचा लिहिण्याचा अकृत्रिम ओघ आहे. कथनाच्या प्रवाही ओघातून येणारे घटनाप्रसंग, स्थळे, व्यक्तिमत्वे यासंबंघींची उत्सुकता वाढत राहते. म्हणून पूर्ण ग्रंथाचे सलग वाचन केल्याशिवाय त्यातली खुमारी कळणार नाही.
लेखकाने या ग्रंथात मनोगत सुरुवातीलाच कथन केले आहे. का, कसं, कशासाठी याची मीमांसा देण्याचा प्रयत्न मनोगतात आहे. ग्रंथामध्ये पुढे काय असेल याचा ऊहापोह आहे. आपण लिहिणार असलेल्या ग्रंथाचे स्वरुप कसे असेल याचे विवेचन हा या भूमिकेचाच एक भाग आहे. इतकेच नाही तर, त्यात व्यक्त केलेला प्रांजळपणा अधिक नितळ आहे. आपल्या लेखनाकडे आपण कसे पाहतो याची जाण लेखकाला आहे. त्यात वाचकाला थेट भिडण्याचा प्रयत्न आहे. लेखनात थोडासा नवखेपणा आहे असे प्रथमदर्शनी वाटले तरी जिव्हाळयाने संवाद साधलेला आहे. त्यामुळे आपोआप वाचक लेखकाच्या जवळ जातो. संवादात सहभागी होतो. पुढचे वाचन करीत असताना मनोगत हे वाटाड्यासारखे सोबत करीत राहते. प्रसंगांची कालानुक्रमे गुंफण लक्षात ठेवण्यात मदत करीत राहते. मग पटते कीं, मनोगतात जे आले ते योग्यच झाले. किंबहुना अशा तर्हेचीच मनोगते लिहावीत.
आतापर्यंत लेखकाने ललित, ललितेतर लेखन किती केले असा असा प्रश्न या ग्रंथाच्या निमित्ताने उपस्थित होतो. ते फार नाही असा साधारण उल्लेख लेखकाने केला आहे. लेखकाने आतापर्यंत अशा तर्हेचे लेखन फार केलेले नाही, असा विनय त्यातून दिसतो. परंतु प्रस्तुतचे लिखाण त्या विनयाला छेद देणारे आहे. अनिल अवचट ज्या सहजतेने लेखन करतात, वाचकाशी संवाद साधतात, तसा सहजपणा या लेखनात आहे. कुठेही ओढाताण करुन वाक्ये एकमेकांच्या भेटीला आलेली नाहीत, ना शब्दांनी कुठे असहकार पुकारलेला आहे, ना कुठे शब्दामध्ये विजोडपणा आहे. ‘कसदार’ म्हणून जे लेखक स्वत:च्या लेखनाची प्रौढी मिरवतात त्यांनी हा ग्रंथ एकदा नजरेखालून घालण्याची तसदी जरुर घ्यावी. लेखकाच्या सहजसुंदर लेखनाचा मोह त्यांनाही टाळता येणार नाही.
सुरुवातीच्या भागांमध्ये आपल्याशी संबंधित नातलगांचा, आप्तमित्रांचा घेतलेला आढावा हा केवळ चरित्राची पाने भरण्यासाठी आहे, असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु नातलगांची, आप्तांची मंदियाळी ही चरित्रकाराची संपत्ती असते. इतिहासाचे लेखन करताना, या सगळयांचा संबंध जुळविताना, हे संदर्भ फार आवश्यक ठरतात. इतिहासात चरित्र लेखनात फार मोठी उणीव असेल, तर ती हीच आहे. कौटुंबिक नाते, आप्त त्यांच्या जीवनातील घटनांच्या तारखा मिळणे अवघड झाल्याने अनेक चरित्रे अपुरी ठरलेली आहेत. या ग्रंथाने ती उणीव दूर केली आहे. उद्या ‘गोखले’ कुटुंबाच्या विषयी संदर्भ शोधण्याची वेळ आली तर, या ‘पाऊले चालती’ चा संदर्भ उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे लेखकाने ज्या सगळ्यांना सामावून घेतले आहे, ते अनाठायी नसून उपयुक्त / आवश्यक आहे. वृक्षाचे चित्र काढताना खोडासोबत फांद्या, पाने, फुले असणारच. तशी ऋतूप्रमाणे त्याची रूपे बदलणारच. ती दाखविताना काहीजण जमिनीखाली असलेली मुळेही दाखवितात. त्यांना अनावश्यक कसे म्हणायचे? इतिहासाची ती अपरिहार्य वाटचाल आहे.
लेखकाचा सगळा प्रवास जसा झाला तसा तो चित्रित करताना संयमाची कसोटी लागते. आलेले सगळेच अनुभव आनंददायी असतात असे नाही. काही कटु आणि क्लेशकारक असतात. परंतु ती कटुताही फार संयतपणे व्यक्त झालेली आहे. आनंददायी प्रसंगातही हवेत असल्याचा कुठे आभास नाही. लेखकांच्या पत्नी, सिंधूंच्या प्रकरणातले हळवेपण हा मोठा डोह, तळ न सापडणारा. वाचताना पुढे जाण्याचे धैर्य होत नाही. तिथेच मन कुंठित होते. फूल कोमेजून निखळताना फांदीला काय वाटत असेल? पाणी ओसरल्यानंतर नदीला काय वाटत असेल ? हळुवारपणे आणि तितकेच भावनेने ओथंबलेले हे प्रकरण फार हृदयस्पर्शी झाले आहे.
एकूण वाचन करताना, प्रत्येकाशी लेखकाचे जसे संबंध आहेत, तसे वाचकांचेही प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे जुळत जातात असे सतत वाटत राहते. लेखकाच्या कुटुंबातील नातलग आपलेही नातलग आहेत, इतके ते वाचकालाही जवळचे वाटतात. लेखकाचा ज्या ज्या संस्थांशी संबंध आलेला आहे, त्यातल्या काही संस्था अनेक वाचकांना परिचित असतील, तशा अनेक व्यक्तीदेखील. परंतु त्यांचे अंतरंग ज्या तऱ्हेने उलगडून दाखविले आहे, त्यामुळे त्यांचे अंतरंग अधिक स्पष्ट झाले आहे. त्यांची ही माहिती म्हणून संदर्भ म्हणून मोलाची आहे. त्यामुळे हे चरित्र केवळ माय गोखले यांच्यापुरते मर्यादित राहात नाही. त्याला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. लेखकाने एक मोठे काम हातावेगळे केले आहे असेच म्हणावेसे वाटते. ठाण्याचा इतिहास लिहिताना याची ओळख टाळून पुढे जाता येणार नाही. ‘प्राच्यविद्या’ या संस्थेबद्दल लिहिताना या या आत्मकथन ग्रंथाला त्यात नक्कीच स्थान राहील असा विश्वास वाटतो.
नोकरीच्या निमित्ताने लेखक दहा-बारा गावांमध्ये राहिलेला आहे. फिरतीच्या कामामुळे पाच-पन्नास गावांत त्यान आठ-आठ दिवस मुक्काम केलेला आहे. त्यामुळे शेकडो नव्हे हजारो माणसांशी लेखकाचा अगदी निकटचा संबंध आलेला आहे. भारत सहकारी बँक, मराठी ग्रंथ संग्रहालय, विद्याप्रसारक मंडळ या संस्थांचे आणि त्या बरोबरच इतर अनेक संस्था आणि व्यक्ती आणि लेखकाच्या संपर्कात आलेल्या अनेक मित्रमंडळींचे वर्णन इतके आपुलकीचे आहे की वाचकाला ते सर्व आपलेच सुहृद आहेत असे वाटते.
लेखक अधेमध्ये गंभीर होतो आणि मनाला भिडणारा विचार लिहितो. विशेषत: दु:खाचे प्रसंग आले म्हणजे लेखक हळवा होतो. आणि जीवनातले तत्त्वज्ञान सहजपणे सांगून जातो. मी कोण आहे, मी या जगात कोठून कशाकरिता आलो. मी कोठे जाणार आहे, थोडक्यात म्हणजे ‘कोऽहम्’ या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न लेखकाने समारोपात केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचून संपले तरी वाचक थोडा वेळ तरी विचारमग्न स्थितीतच राहतो.
Leave a Reply