नवीन लेखन...

पाऊलखुणा

सिनेदिग्दर्शक तुषार गुप्ते यांचा हा लेख कायस्थ विकास या वार्षिकाच्या 2023 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला.


जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता. माझ्याबरोबर अजून एका मुलाची महाराष्ट्रातर्फे निवड झाली होती. 31 ऑक्टोबरला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळी मी तिथेच म्हणजे दिल्लीतच होतो. तेव्हा झालेली भीषण दंगल प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. सर जेजे स्कूल ऑफ आर्टसचं लाईफ संपलं.

जे जे मध्ये शिकत असताना अनेक वर्ग मित्रांपैकी एक वर्गमित्र म्हणजे प्रख्यात कला दिग्दर्शक कै. नितीन देसाई. कॉलेज संपल्यानंतर मी एका जाहिरात कंपनीत रुजू झालो त्यावेळी एका जाहिरातीचा कला दिग्दर्शक म्हणून हे नितीन देसाई होते. त्यावेळी नितीनचा ‘1942 अ लव स्टोरी’ चित्रपटाच्या सेटचे काम पूर्णत्वाला आले होते. त्यावेळी नितीन मला त्याच्या सेटवर घेऊन गेला. तेथील त्याचा भव्य दिव्य सेट, तेथील वातावरण पाहून मी भारावून गेलो, आणि आपणही कला दिग्दर्शनाच्या पाऊलवाटेवर जावे असे वाटू लागलं. त्याच सुमारास म्हणजेच 1995 साली मी दादर सीकेपी हॉलमध्ये एक प्रदर्शन लावले होते. त्याच्या उद्घाटनाला त्या वेळेचे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री गोविंद स्वरूप तसेच चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री वंदना गुप्ते, अभिनेत्री प्रिया बेर्डे, मोहन जोशी, प्रिया तेंडुलकर, स्मिता तळवलकर, विक्रम गोखले यांनी उपस्थिती लावली होती.

प्रिया बेर्डे यांच्याशी माझं नातं बहीण भावाचं झालं ते अगदी आजतागायत. प्रिया बेर्डेचे वडील अरुण कर्नाटकी यांच्या सांगण्यावरून मला बालाजी टेलिफिल्म मध्ये सहाय्यक कला दिग्दर्शकाचे काम मिळाले. आणि माझी पहिलीच अतिशय गाजलेली सिरीयल ठरली ती म्हणजे ‘हम पांच.’ अशोक सराफ, शोभा आनंद, राखी टंडन आणि विद्या बालन अशा कलाकारांचा एक मस्त ग्रुप झाला. सलग चार वर्षे यावर मी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले. रात्री शूटिंग संपल्यानंतर विद्या बालनला माझ्या मोटार सायकलवरून चेंबूरला सोडून मी ठाण्याला घरी येत असे. पुढे बालाजीच्या बारा सिरीयल माझ्याकडे कला दिग्दर्शक म्हणून आल्या. जसजसे काम वाढत गेलं, माझ्यावरची जबाबदारी वाढत गेली तस तसे माझे एकता कपूरशी वाद विकोपाला गेले नी अखेर मी बालाजी सोडली.

यानंतर मला सिनेविस्टा, रामानंद सागर प्रॉडक्शन, स्मिता ठाकरे प्रॉडक्शन, कल्पना शोभना देसाई प्रॉडक्शन, दीपक बाहारी प्रॉडक्शन, मोना कपूर प्रॉडक्शन, मनीषा कोईराला, प्रॉडक्शन, श्रीदेवी प्रॉडक्शन, भीष्म इंटरनॅशनल, मुकेश खन्नाचे प्रॉडक्शन अशा अनेक मोठ्या प्रॉडक्शन मध्ये अनेक मोठमोठे सेट लावताना तारेवरची कसरत होत होती. कुठे ‘यूग’ या सिरीयलचे ऐतिहासिक सेट, तर ‘जय मातादी ‘ हे सिनेविस्टाच्या हिंदू मायथॉलॉजी सेट, म्हणजेच अग्नी लोक, पाताळ लोक, वायु लोक असे अत्यंत किचकट आणि कठीण पण अभ्यासपूर्वक सेट मी लावत होतो. यात जय माताजीच्या सेटचे डायरेक्टर पुनित इस्सार म्हणजेच महाभारतातील दुर्योधन, जी व्यक्ती मला ए तुषार अशा एकेरी नावाने हाक मारी, ती मला दादा बोलू लागली.

कला दिग्दर्शकाचे काम चालू असताना मला स्वतःला लेखनाची आवड होतीच. एके दिवशी मी काही लेखन करत असताना पुनीत इस्सारने पाहिले. तेव्हा त्याने मला तू काय लिहितो आहेस? विचारले. मी एक कथानक लिहितोय म्हणताच त्याने माझे कथानक ऐकले. दोन-चार मिनिटे माझ्याकडे पहात राहिला, माझा हात पकडला त्याच्या गाडीत बसवले आणि अंधेरीच्या एम.आय.डी.सी. च्या खन्ना हाऊस मध्ये नेले. त्यावेळेस देव आनंद साहेबांच्या दिग्दर्शनाखाली शूटिंग चालू होतं नि समोर लावण्यखणी रेखाजी होत्या. ब्रेकमध्ये पुनित इस्सारने देव साहेब व रेखा यांना माझी ओळख करून दिली व हे फिल्मचं नरेशन देतील म्हटले. त्यावेळी आम्ही एका खोलीत मी रेखाजी, देव साहेब, पुनीत इस्सार असे चौघे होतो. 10-15 मिनिटांच्या त्या ब्रेकमध्ये मी कथानक सांगितले ते रेखा यांना खूप आवडले. मी या चित्रपटात काम करायला तयार आहे असे अगदी लगेच जाहीर केले.

रेखाजी आणि देव साहेब यांना पाहून, भेटून, बोलून मी इतका प्रभावित, निशब्द झालो की परत आम्ही आमच्या सेटवर कधी परतलो हे कळलंच नाही.

‘जय मातादी’ या सिरीयल मध्ये मेन लीडिंग रोल म्हणजेच माताच्या रोलमध्ये होत्या त्या म्हणजे ड्रीम गर्ल हेमामालिनी. जसजसे आमचे सेट लागायचे स्वर्गलोक, वायुलोक, अतिशय उत्सुकतेने ही माझी माझ्याकडून सर्व माहिती जाणून घेत होत्या.

फिल्म सिटीला 11 नंबर फ्लोअरवरती ‘जय मातादी’, बारा नंबर मध्ये ‘नूर जहॉ’ ही इस्लाम बेस सिरीयल, 14 नंबर मध्ये ‘इतिहास’ ही सिरीयल, चार नंबर फ्लोअरवरती ‘यूग’ सिरीयल, तसेच गाथा, औरत या सिरीयल देखील फिल्मसिटी मध्ये माझ्या चालू होत्या. फ्लोअर नंबर आठमध्ये मुकेश खन्नाची विराट सिरीयल, जी काल्पनिक राजे राजवाडे यांची काल्पनिक सिरीयल होती. तसेच फिल्म सिटी बापू नगर आणि कालिया मैदान येथे ‘बेताल पचीसी’ या सिरीयलचे सेट लावले जात होते. एकूणच फिल्म सिटीमध्ये माझे असंख्य सेट लावले जात होते. याच काळात फिल्मीस्तान, फिल्मालय आणि मेहबूब या स्टुडिओमध्ये माझे विविध जाहिरातींचे सेट लावले जात होते. अनेक कलाकार, अनेक तंत्रज्ञ, दिग्दर्शकांच्या ओळखी झाल्या.

‘विराट’ या सिरीयलचा महालाचा आऊटडोर सेट मी लावत होतो. त्यावेळी आमिर खान यांच्या ‘गुलाम’ चित्रपटाची मोटरसायकल रेसची रिहर्सल चालू होती. मी जवळच माझ्या कामात गर्क होतो जवळच एक मोठा खड्डा होता आमिर खान रिहर्सल करीत असताना गाडीवरून घसरून फेकला गेला आणि नेमका त्याच खड्ड्याजवळ आला, मी त्याला उलट्या दिशेने पटकन ढकललं त्यामुळेच तो स्कूटरवरून खाली खड्ड्यात पडता-पडता वाचला. आमची चांगली ओळख झाली.

माझ्याकडे असलेल्या अनेक किश्यांपैकीच एक अजून किस्सा. चांदिवली स्टुडिओमध्ये माझा सेट लागला होता. बाजूलाच अमिताभ बच्चन व नाना पाटेकर यांच्या ‘कोहराम’ या हिंदी चित्रपटाचे शुटिंग चालू होतं. या चित्रपटाचे कला दिग्दर्शक मि. आर. वर्मन होते. फार पूर्वी जेव्हा मी स्ट्रगलर होतो, तेव्हा या माणसाने मला एक महिना तंगवल होतं. भेटायला बोलावयाचा नि पूर्ण दिवसभर बसवून ठेवायचा. आणि एक महिन्यानंतर मी बंगाली नाही म्हणून मला काम दिले नव्हते. त्याला या इथे पाहताच मी माझा सेट या वर्मनला दाखवला आणि संपूर्णपणे संभाषण बंगाली भाषेत केलं. कळत नकळत माझा रागाने आवाज मोठा झाला कारण मराठी असल्याने मला त्यावेळी त्याने काम दिले नव्हते. नाना पाटेकरांनी तिथे येऊन काय झालं? विचारताच मी माझा मराठीत बोलून मागचा किस्सा सांगितला.

हे ऐकताच नाना पाटेकर यांनी आर वर्मन याच्या कानफटात मारली आणि सेटवरून हाकलून दिला, आणि माझ्यासमोर ‘कोहराम ‘ या चित्रपटाच्या प्रोड्युसरला धमकी दिली की हा जर परत सेटवरती दिसला किंवा या चित्रपटातही काम करताना दिसला तर मी शूटिंगला येणारच नाही. एका मराठी माणसाने मराठी माणसाचा केलेला हा मोठा आदर.

माझ्या कामावरती खुश होऊन रेनबो साडीच्या ऍड मध्ये मी ते काम करतोय म्हणून नृत्य दिग्दर्शक सरोज खान लगेचच तयार झाल्या. फिल्मालयमध्ये माझा आर्यमान सिरीयलचा सेट असताना तथेच वजूद या हिंदी चित्रपटाच्या सेटवर डान्स प्रॅक्टिस करणाऱ्या माधुरी दीक्षित, सरोज खान यांच्याबरोबर त्या वेळी केलेल्या गप्पागोष्टी, धम्माल मला आजही आठवतेय.

‘राम-राम दीदी मॉ’ या सिरीयलच्या मुख्य भूमिकेत असलेल्या फरिदा जलाल यांनी मला आपल्या घरी जेवायला आदराने बोलावल्याचा किस्सा. तसेच रजा मुराद, जयश्री टी, अंजना मुमताझ, होमी वाडिया, मनीषा कोईराला, श्रीदेवी, पंकज कपूर, नितीश भारद्वाज, महेश कोठारे, कुनिका, कल्पना अय्यर, रामानंद सागर, रवी चोप्रा, आणि रोहन शहा, अमिताभ बच्चन यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली.

‘ब्रम्हांडनायक साईबाबा’ या चित्रपटाचा पूर्ण शिर्डी गावचा फिल्म सिटीत लावलेला सेट बघून बी आर फिल्मचे रवी चोप्रा यांनी मला बी आर मध्ये कलादिग्दर्शक म्हणून बोलावलं. त्यांच्याबरोबर अनेक जाहिरातींचे सेट लावता लावता त्यांच्या क्रिएटिव्ह टीम मध्ये घेऊन बागबान आणि भूतनाथ या चित्रपटासाठीही संधी उपलब्ध करून दिली. त्यावेळी अमिताभ बच्चन सर यांच्या घरी जाऊन 45 मिनिटांची वन टू वन माझी मीटिंग झाली होती. त्याचवेळी आर्यसमाज या संस्थेचा वेदांवरती आधारित सिरीयलचा अडीच लाख वर्षांपूर्वीचा पाषाण युगाचा सेट मी उभारला होता. हा माझा सेट बागबानच्या सेटला लागून होता. तो पाहून अमित सरांनी मला त्याविषयी काही प्रश्न विचारले तर तेव्हा मी अख्खा सेट एक्सप्लेन केला होता. मी सांगत असताना ते स्तिमित होऊन माझं सर्व बोलणं शांतपणे ऐकत होते.

तसंच गोविंदाने मीटिंगसाठी घरी बोलावून एका चित्रपटाच्या मध्यस्थीमध्ये माझ्यावर मोठी जबाबदारी दिली होती ती मी यशस्वीपणे पाडली याचेही अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत.

एकदा पाकिस्तानी गायिका, अभिनेत्री सलमा आगा, हीचा लोखंडवाला अंधेरी येथे बंगला आहे तो तिला शूटिंगसाठी द्यायचा होता. त्या बंगल्याचे मला शूटिंगसाठी आर्ट डायरेक्शन करायचे होते म्हणून मी तिला भेटण्यासाठी माझी गाडी बाहेर लावून आत गेलो. एका व्यक्तीने मला संपूर्ण बंगला दाखवला. त्या व्यक्तीची माझ्याशी ओळख करून सलमा आगा निघून गेली. गप्पा मारता मारता दुपारचे तीन वाजल्यापासून रात्रीचे नऊ वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालूच होत्या. ती व्यक्ती होती चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार खय्याम.

एकदा आनंद सागर म्हणजे रामानंद सागर यांचा ज्येष्ठ पुत्र यांनी मला एका सिरीयल साठी खैरानीच्या एस. जे. स्टुडिओत बोलावले. तो तयार सेट बघून मला वाटले यात अजून काय दिग्दर्शन करणार? तेव्हा तसे मी सांगताच आनंद सागरने मला एक सुखद धक्का दिला. तो म्हणाला,’ मी तुला त्यासाठी बोलावलेलंच नाही, तर तू या सिरीयलचे दिग्दर्शन माझ्याबरोबर कर.’ मी आनंदी झालो. आणि अशा प्रकारे माझ्या दिग्दर्शकाचा प्रवास सुरू झाला. हॅलो डॉली, स्वयम एक अहसास, तडक, अशा अनेक सिरीयल दिग्दर्शन म्हणून केल्या.

‘मिस मॅच’ या मराठी चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम करत असताना एका गाण्याला सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना प्लेबॅकसाठी घेतले. यावेळी स्टुडिओत त्या आल्या त्यांचं बोलणं, त्यांचं गाणं आणि त्यांच्याबरोबर मारलेल्या अविस्मरणीय गप्पा असे मोठ मोठे प्रसंग जसेच्या तसे अजूनही डोळ्यासमोर तरळतात.

जूही चावला लोकप्रियतेच्या शिखरावर असताना बी. आर. ची ऍड करत असताना तसेच बी.आर. ची हिरो सायकलची राणी मुखर्जी बरोबर ऍड करताना झालेली फजिती आठवली की अजूनही हसू येते. तर फिल्मसिटीमध्ये रात्री येता जाताना भयावह प्रसंगांना तोंड दिले ते आठवलं की अंगावर आजही शहारा येतो. एकदा तर रात्री बारा वाजता फिल्मसिटीमध्ये मोटार सायकलसमोर अचानक आलेले तीन बिबळे, प्रचंड मोठा अजगर असे किती प्रसंग नमूद करू.

2005 ला मराठी चित्रपट ‘साने गुरुजी’ या चित्रपटाच्या कला दिग्दर्शनाला प्रथम पारितोषिक मिळालं. पण माझ्या या पारितोषिकाचे मला न सांगता निर्मात्याने मीच याचा कला दिग्दर्शक आहे असे सांगून ते घेतलं. ही एक अत्यंत खेदाची गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते.

2004 ला सरकारी ऐतिहासिक प्रोजेक्टला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने बेस्ट आर्ट डायरेक्टर म्हणून सत्कार केला. असे अनेक सत्कार झाले, त्यामधील माझ्या ठाण्यातून मला मिळालेला ‘ठाणे गुणीजन’ 2008, हा अत्यंत जवळचा, घरचा पुरस्कार.

लिखाणाची आवड असल्याने माझे अनेक चित्रपट लिहून आहेत. मराठी हिंदी चित्रपट सिरीयल करण्याचा मानस आहे. असो माझा हा 33-34 वर्षांचा कला प्रवास सांगताना खरंतर ‘पाऊलखुणा’न ठेवता माझी ‘खरी-खुरी फिल्मबाजी’ हे टायटल योग्य वाटतं.

तुषार गुप्ते (दिग्दर्शक)
93224 07093
tushargupte.art@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..