नवीन लेखन...

पावसातला प्रवास

“प्रवास पावसातला 

जून महिना आला तरी अजून पावसाला सुरुवात झाली नाही.

मागच्या वार्षिक घेतलेल्या छत्र्या यावर्षीही कामी येणार होत्या . डोंबिवलीला ऑफिस होतं तर मोटारसायकलने प्रवास व्हायचा .

रेनकोट घालून जायचो .

शिवाजी चौकात फिरताना छत्र्या घेऊन पावसात मजा असते . छोट्या सुरुलला कॉटूनचीच छत्री हवी असते. पावसाळा संपला की या छत्र्या कुठं जातात माहित नसते.

पण स्वाती , माझी पत्नी सगळे रेनकोट , छत्र्या बरोबर सांभाळून ठेवते.

मुलांना दरवर्षी छत्र्या घ्यायला आवडतात. मलापण .स्वाती हा खर्च वाचवते.मागच्या वर्षीच्या छत्र्या ती बाहेर काढते.

यावर्षीं छत्र्या वापरायची वेळ अजून यायची होती.पाऊस तसा आला पण भुरका भुरका .एक -दोनदा पेपरात मुंबईला अतिवृष्टीचा इशारा म्हणून छापून आलं होतं . पण अशा बातम्या या पाऊस वाचत नसावा . तो काही आला नाही . यामुळेच वाचकाचा पेपरावरचा आन पावसावरचा विश्वास उडाला .

तर हा जुन महिना आला की पावसाच्या गोष्टी सुरु होतात.आला आला म्हणून.

पण कधी वेळे वर यायला का हा बांधील थोडीच आहे माणसाला ?

पण पावसाचं एक खरं असतं ……पाळत नसला तर तो महिना मात्र पाळतो.येतोच.

यावर्षीही दरवर्षी सारखीच पावसाला सुरवात झाली ...पण छत्री वापरण्यासारखी नाही .

अजून जोर धरला नव्हता लोकल थांबवण्यासारखा .

बाहेर पाऊस चालू होता . बारीक रिमझिम.

खिडकीतून बाहेर बघितले .

तसेच इतरही मंडळी कमीच होती रस्त्यावरून जाणारी येणारी . जरासं पाणी साचलं होतं.जमिनीवर.

अशा साचलेल्या पाण्याला माझी छोटी मुलगी सुरूल ‘‘सुरूलनदी वा सुरूल तलाव ” असं नांव देत असते.

चहा पिता पिता मी स्वातीला छत्री काढायला सांगितलॆ .कारण बाहेर पाऊस टपोऱ्या थेंबाचा वाटत होता .

चला पहिला दिवस पावसातला छत्रीचा . पावसाळा मला नेहमीच आवडतो.

अंबरनाथला नोकरी होती तर कामाला जाताना मोटारसायकलवर मस्त भिज़त भिज़त , कधी रेनकोट घालून अमिताबचे” रिम झीम गीरे सावन , ” एक रास्ता है जिंदगी . ‘ असे गाणे गुणगुणत जाण्याचे आठवत होते. मोटारसायकलच्या प्रवासात कितीतरी कविता सुचायच्या . घरुन निघताना एकदा एक ओळ सुचली की तीच गुणगुणत गुणगुणत अंबरनाथ येईपर्यंत पूर्ण व्हायचीच .अशा कविता दिवाळी अंकात पाठवायचो .प्रसिद्ध झाल्या की . माझा हुरूप वाढायचा. अशा कवितांचा एक काव्यसंग्रह काढला

फुलराणी प्रकाशनाने. नांव दिलं ” बेहोशीतच जगणंअसतं“. हे बेहोशीतच जगणं शिकवलं खरं तर पावसानं…आवडीनं या छंदात रमायचं, आयुष्य मजा घेत घेत जगायला शिकवतं हा पाऊसच.मला आठवते. मला मुंबईला पहिली mseb तील पोस्टिंग मिळत असताना, कल्याण, ठाणे अशी शहर मिळत असताना मी निवडलं….रोहा हा गांव.

कारण होतं…पाऊस. कोकणात पाऊस.तेथे पाऊस खूप पडतो असं ऐकलं होतं .

शिवाय बाकी रत्नागिरी, चिपळूण यासारखं दूरही नव्हतं . रोहा,कोलाड या भागातले नऊ वर्ष आजही कालच घडणाऱ्या सारखे ताजेताजे आहेत.. आताही .पावसातून घोसाळा-रेवदंडा-मुरुड किंवा चणेरा-मार्गे मुरुड हा जंगलातला–टेकड्यातला रस्ता mseb च्या लाईनचे फाल्ट शोधत शोधत हजारदा मोटारसायकलने गेलो असेल .आणि पावसातून हे काम करताना तो आनंद वेगळाच.

“इतक्या पावसात कशाला त्रास घेता” अशी काळजी घेत गावकरी गरम गरम चहा देत. इतरही मदत देत . यांचे फोन वापरु देत . घरातला दिवा पेटला की सार्थक वाटायचं …पावसातनं , जंगलतान फिरायचं . तसंच इकडे कोलाड -भिरा ताम्हाणी घाट हाही भाग पावसात तर वेगळाच वाटायचा .नोकरी करत नाहीच तर नऊ दहा वर्ष नुसतं भटकंती करतोय -पिकनिक करतोय असे दिवसं गेलेत ते सारे. लग्न तेथेअसताना झालं होते. स्वातीसोबत मग रविवार वा सुट्टीचा दिवस मुरुड बीच , रायगड किल्ला तर कधी महाबळेश्वर असे कितीदा तरी वेळा फिरणं झालेत . पावसाच्या या आठवणी आल्बम सारख्या मनात असतात.कुंडलिका नदीत डुंबणे , कोलाड या धरणावर भटकणे. बेहोशीतच जगणं होतं हे सारं .

गावागावात लोकांना लाईट च्या तक्रारी निवारण करता करता गावातील रस्त्यावरील दिवे , पाणी पुरवठा याचे कनेक्शन लवकर तातडीने देणे. गावकरी खूप आभार मानायचे. नोकरीतूनही असं समाजकार्य करायला मिळतं ..हे समाधान मला मिळायचं . किती गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवताना सत्कार झाला .

पत्नीला आजही तेथील नोकरीचे दिवस पाहिजे असते .

” चला, निघा गाडीची वेळ होतेय” बायकोच्या आवाजानं मला भाग पाडलंय….आठवणीतून बाहेर यायला अन घराबाहेर पडायला .अर्थात ऑफिसला जायला.

जाता जाता पेपर चाळला .मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आज व उद्या असा दिला होता. सॅक पाठी मागे अडकवून निघालॊ .आठवणीने छत्री घेतली .. पाच सहा मिनिटात मी नेहमीसारखा वन प्लॅटफार्मवर पोहोचत असतो शार्टकटने. लोकउद्याणच्या गेटजवळ इतक्या पावसातही रोजची भीकारिण पोस्टबॉकसजवळ बसली होती. मानायला हवं . प्रामाणिक कर्मचाऱ्यासारखी रोज ती वेळ पाळते. सकाळी सात ते दहा अशा वेळातच ती बसते. सकाळी सकाळी ऑफीसला जाणारे लोकं तिला पैसे देतात.खायला काही बाही देत असतात . मी जर एखाद्याला काही या भिकारीणीला देताना पाहिलं …….तर .मला हे आवडत नाही . चांगले हात पाय असणारे बाया -पुरुष , भीक मागणं .पटत नाही मनाला.

एकदा आमच्या चिनार इमारतीतील तिवारी नावाचा दोस्त तिला पैसे देताना मी बघितलं . याला नंतर हटकलं ,” असं तुमच्या अशा दानशूरपणामुळे अजून भिकारी वाढत असतात . एक दिवस चिनारच्या दरवाज्याजवळही ते बसतील . आन रोज रोज पैसे देता त्यापेक्षा १०x ३० x १२= ३६००रुपये एकदाच का नाही देत तिला वर्षभराचे ? ना तुला त्रास ना तिला ?

तो फक्त हसला .

मला वेळेवर सुचलेला हा विचार नंतर लोकलमधल्या मित्रात शेअर केले. अनेक जण हसले.भिकारी लोकांनी घरी बसावं ..दानशूर व्यक्तीनं त्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करत राहावे …..ही मागे झालेली गोष्ट ठवत आठवत मी तिच्या पुढून गेलो . नेहमीसारखं तिने मला बघून दुसरीकडे तोंड फिरवलं .कारण माझ्याकडनं तिला कधीच भीक मिळत नसते .हे चान्गले कळलेलं असतं . पुढं गेलो .राजुच्या किराणा माझा मित्र ,ईश्वर गायकवाड रोजच्या सारखे अंडी दूध घेत होते.

” अहो , पेटकर , तुमची मोटारसायकल घरीच असतेना . आज द्या बरं मुलाला शिकायची आहे”.

“घरून स्वातीकडून चाबी घ्या ” असं सांगून मी पळू लागलो .

कारण ०८-१५ झाले होते लोकलची वेळ होत होती. पाऊस चालूच होता . मी रूळ ओलांडताना हाताला चुरचुर यासारखं झाला. छत्रीचा दांडा व छत्रीची बटन धातूची होती . याला बोट टच असल्यानं रूळ ओलांडताना वरच्या तारा व छत्री याती अंतर व त्यामुळे शॉक लागायची भीती असते .

लगेच मी बोट काढलं बटणांवरच .उंच माणूस जर असा छत्री घेऊन असा या वायरखालून गेला तर नक्की मोठं अपघातच होणार.

असं रेल्वे लाईनखालून जाणं पावसात तर धोकादायकच .शॉटकट हा आयुष्याचाही शार्टकटच शकतो. ०८ : २१ चा इंडीकेटर लागला होता . लोकल यायची होती . फर्स्ट क्लासच्या आमच्या काही मंडळींनी गाडीत बसायला रांगेची शिस्त लावली .

ते एक चांगलं काम होतं .. धावपळ न करता सर्वांना चढायला मिळतं . बसायला जागाही मिळते. महाजन , मिलिंद , पटवर्धन , समीर सगळे रोजचे रोज असणारे माझेआधीच या आधीच रांगेत उभे होते. कसलंतरी अनाऊन्सिंग होत होतं .अंधेरिला ब्रिज कोसळल्यामुळे त्या साईडला लोकल व आता पॅसजर गाड्याही थांबलेल्या आहेत . पाऊस चालू होता .सायन भागात रुळावर पाणी आल्यानं लोकल उशिरा असल्याचे मिलिंद म्हणत होता . आजचा पाऊस ऑफिसला दांडी मारायला लावतो की काय ?

असं वाटून गेलं .. आपण जावं की जाऊ नये ..काय करावं …की जावं परत घराला?

छे …..इतकं नको पहिल्याच पावसाला घाबरायला ?भित्रा कुठला ?स्वतःलाच म्हणत ..मी रांगेतील चर्चेत सामील झालो .

मनात पावसाचे व पावसामुळं दिवसभर काही अडचणी निर्माण होतील याचे थोडेथोडे विचार डोकावत होतेच . मुलगी सुकू आज जाणार आहे माटुंग्याला ऍडमिशनला .लहान सहान गोष्टीनं असं मुलांपुढे घाबरणं पळपुटे बाप का सिद्ध करणार? पाऊस चालू होता. गाडी आली .

रांगेने सगळे चढलेत. खिडकीजवळ कुणीही बसायला तयार नव्हता . पावसानं शीटस ओल्या झाल्यामुळे .

चला मी बसतो. असं म्हणून मी पेपर अंथरुन बसलो . व्हॉट्स – अपवर अंधरीतील पुलाच्या बातम्या कळत होत्या .कुर्ला पर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता लोकलला. सायनाला पाणी रूळावर आलं.दादर या साईडला जाणाऱ्या प्रवाशाचे हाल होणार थोडे. गाडी सुरु झाली . गर्दी होती .कुणीही पावसामुळं घरी थांबलेले दिसलं नाही.

खिडकीतून कल्याणची खाडी , खाडीत पडणारा पाऊस . काश्मीरच्या दल लेकची आठवण करून देणारे दृश्य होते , ठाकुर्लीच्या जवळपासचे .

बाजूच्या डब्यात लेडीजचा नेहमीचा आवाज .बसण्यावरून ,उभं राहण्यावरूनही भांडणं . खेड्यात यात पाऊस आला रे आला की अंगणातून वाहत जाणारं पाणी , कुंपणं यावरुन हमखास भांडणं होतात . पाऊस मस्त बरसत असतो.ते आठवलं .येथे शकलेल्या , नोकrरीला असणाऱ्या बायका लोकलमध्ये भांडतात .

मजाही वाटली .भांडणाला काहीही कारण चालतं. रोज रोज प्रवास करणारे लोकं एकमेकांना ओळखत नाहीत …की एकमेकांची ओळख वाढवत असतील…भांडणांमुळं ? खेडेगावात उन्हाळभर मोकळं रान असणाऱ्या अंगणाला कुंपण वा खोलगट भाग , यातून वाहणारा पाणी यावरून पाऊस न भांडण लावून देतो .वर्षभर मिळून मिसळून मिसळून तेथेच लग्न , भोजनं वा भजनं झालेले असतात. पाऊस चालू होता. ठाकुर्ली आलं .

चढण्यासाठी मारामार . आधीच कल्याणला पॅक असणार गाडी शीग भरावी अशी भरत जात असते. दिवा स्टेशनवाल्याचे तर फारच हाल होत असतात . सतत दरवाज्यावरच लटकून प्रवास करतात ते.नोकरीसाठी , घरासाठी .असा जीवाला रोज त्रास करत करत मरत मरत प्रवास करणं.

मीही यातला एक भागच नसतो का ?

ठाण्यानंतर मी उभा राहिलो . उभं असणाऱ्याला जागा दिली , संदीपला माझ्या पॅन्टवर एक डाग दिसला .

“हे काय ?कविराज तुमच्या पँटवर डाग?”

” मी डाग लपवीत नसतो, डाग दाखवीत फरत असतो ‘ सहज माझ्या तोंडातून निघाले वाक्य .

” वा , कवी महाशय”

माझ्या डब्यात तर मला कोणी इंजिनियर म्हणून ओळखत नाही .कवी म्हणूनच ओळखतात .

एवढा ” संजू” नावचा सिनेमा आला . दाखवू नये तेदाखवतात अशा सिनेमात . सुनील दत्त असते तर काढू दिला असता का असा चित्रपट ?मी आपला बडबडत होतो ….

“कोणीही काहीही ऑब्जेक्शन घेत नाहीत अशा गोष्टीवर .” मी आपला एकटाच बडबडतोय .

कुणाही प्रवाशान आपल्या आपल्या मोबाईलवर ” संजू” सिनेमा बघू नये …

संधी मिळाली की माणूस चूप बसत नाही .. मीह याला अपवाद नव्हतो .

मी संदीपशी बोलायचं नाटक करुन इतरानी ऐकावं म्हणूनच मोठ्याने ने पुढे बोलू लागलो . विधूविनोदरावांनी आता सलमानखानावर सिनेमा काढावा . तोही असाच जेल , बायका , खुन सर्वकाही करून समाजात उंच मानेनं फिरत असतो .

नाही तर मला बनवा हिरो …..आण सगळया लफडे, बायका , बाँम्ब स्फोट अशा साऱ्या वाईट गोष्टीची जंत्री आधीच लिहावी .नंतर मी तसंतसं करत जाईन

आजूबाजूचे आता आमच्या चर्चा ऐकत होते.मला थोडा वेडाही समजू लागले असावेत .

माझ्या कवितेतून , कथेतून काही तरी लोकांना मी देत असतो .असला चित्रपट बघूच नये यावर विडंबन कविता म्हणूनच दाखवली.

कितीही चान्गला सिनेमा असला तरी मी तो बघणार नाही अशी मी शपथ घेतली .मागोमाग दोघातिघांनीही मला साथ दिली .

ऐकणाऱ्यावर परीणाम झाला बघून बरं वाटलं . घाटकोपर आलं . पाऊस चालू होता. काही प्रवाशी उतरले. गर्दी कमी झाली .

विद्याविहार येताच मी गेटजवळ गेलो . कुर्ला येथे गाडी थांबली . मी उतरलो . पाऊस चालू होता. कुर्ला स्टेशनबाहेर पाणी साचलेले.

पँटला गुडघ्यावर गुंडाळून घेतलं. सगळीकडे पाणीच पाणी साचलेले. संततधार चालूच होती. बसस्टोपला आलॊ.एकही बस नव्हती . कोणीही

थांब्यावर थांबलेले नव्हतं .

फक्त पाणी आणि पाणी .छत्र्या आणि छत्र्या दुसरं काहीही नाही.

९: २६ झाले होते . बससाठी थांबुन वेळ घालवण्यात काही अर्थ नाही असं समजून पायीच निघालो.पाऊस सुरूच होता. रस्त्यावरील पाण्यानं माझा पॅन्ट खालून ओला चिंब झाला होता.बोरिवलीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्याचे फोन येत होते…ते काही ऑफिसला येऊ शकणार नाही म्हणून. लोकल बंद असल्याने……

मी काय म्हणणार…ठीक आहे …आराम करा …एवढं तर म्हणू शकतोच मी ..म्हटलंही .

पावसातून चालताना शाळेतील दिवसाची आठवण येत होती .

दफ्तर , डबा घेऊन छत्री सांभाळत सांभाळत जाताना मुद्दाम साचलेले पाणी उड्या मारीत दुसऱ्याच्या अंगावर उडवणं..मजा यायची

आजही तेच करत होतो ..कुणाला न कळता . शाळेत भिजलेले कपडे बघून मास्तर म्हणायचे , पेटकर, जा शर्ट पॅंट बदलून ये.

असं जर का म्हटलं मास्तरानी पावसातला प्रवास पुन्हा करावा लागायचा . पुन्हा भिजायला मिळायचं .

एकदा तर तीनदा कपडे बदलले.पूर्ण दिवस ये जा ये जा करत करत.

शाळा , वर्गात बसलोच नाही त्या दिवशी ….

चालत चालत बी के सी च्या टेलिफोन बसस्टॅंप जवळ पोहोचलो .रिक्षासाठी मारामार दिसत होती . एक रिक्षा आली कि लोकं तुटून पडत होते .रस्त्यावर तुरळकच वाहतूक होती . बस नावालाही दिसत नव्हत्या .

कुणी रिक्षावालाही थांबत नव्हता .

बाजूला एक तरुणी माझ्यासारखी रिक्षाची वाट बघत उभी होती .. छत्री नव्हती तिच्याजवळ .

पावसात भिजताना तिला पाहणं सहजच होत होतं माझ्याकडनं .

पावसाचा हेवा वाटत होता . केसावरुन थेम्ब नितळत नितळत नाकावरून अजून जरा खाली खाली येत सारं अंग अंग स्पर्श करून

जात होतं .

इतक्यात रिक्षा थांबला ,माझेजवळ .तीही बसावी ..वाटत होतं . तिच्याआधी तीन शिटा झाल्याने ..नाईलाज माझा .

रिक्षा रस्त्यावरचे पाणी उडवत उडवत चालली.

मध्ये बसणाऱ्याची काहीतरी चुळबुळ सुरु होती . दहादा खिशे , बॅग चेक करत होता .

बहुधा मोबाईल शोधत असावा …तर . मोबाईल तर हातात होता त्याच्या .

इतक्यात तोच म्हणाला ,”सर वीस रुपये द्याल का? माझे पॉकेट बहुतेक पडलं असावं वा मारल्या गेलं असावं.”

मी हणालो ,” का नाही , नक्की. ”

असं म्हणून मी शंभर रुपये देऊ केले त्याला .

म्हणालो ,”अरे दिवसभर खायला यायला , आणि परत यायचेवेळी लागतील तुला ”

तो म्हणाला ,” ऑफिसा पोहोचलो की मित्र देतील ..पण आता सध्या रिक्षापुरते हवेत .”

ठीक आहे.. म्हणत मी त्याला वीस रुपये दिले .

माझा मोबाईल नंबर मागून घेतला त्याने . ऑफिसला पोहोचलो की पैसे आणून देतो म्हणता होता .

अरे , एवढं कुठं बघत बसतो म्हणून बाकी ऑफिसचा पत्ता वगैरे तो मला विचारत बसला.

पावणेअकरा झाले होते घड्याळात . आर बी आय (rbi)) पोहोचलो . धावतच ऑफीस गाठले. कँटीनला फोन लावून रमेशला मस्त

गरमागरम चहा व सोबत वडा आणायला सांगीतले . ओलेकपडे, चेहरा फ्रेश करत बसलो . पाऊस चालूच होता.

ऑफिसातले अर्धेअधिक कर्मचारी बेपत्ता दिसले.

जादूगार पावसामुळे.

खिडकीतून गार्डन मधील पाऊस बघत बघत चहा पीत होतो .साहेब मी मीटिंगला फोर्ट ऑफिसला गेले होते.

थोडा निवांतपणा .

गार्डनमधील कॉलेज कुमार कुमारी पावसात भिज़त होती.

” साहेब, आज लवकर जावं का”

म्हणत प्रथमेश आला.

‘का रे?”

या वेळी सायंकाळला काही गडबड घोटाळा होईल या भीतीने…तो विचारत होता.. मागच्या वर्षीचा अनुभव व रात्रभर कार्यालयातच थांबणे.

या टेन्शनने .

 जा, जा”मी म्हणालो .

तीन साडेतीनला पाऊस थांबला होता .

आता माझी प्रथमेशसारखी भीती दूर झाली .

संध्याकाळी लोकलला आता काही प्रॉब्लेम नसणार…म्हणवन.

पाच वाजले. एक फोन आला .

” सर.सकाळी रिक्षात भेटलेला मी .आता तुमच्या ऑफिससमोर खाली उभा आहे. येता का खाली ?’ ‘

“अरे, यार..कशाला एवढा त्रास घेतला ? वीस रुपये नसते दिले तर काय झालं असते?”

” नाही सर , ..खूप ताण हलका झाला होता माझा ”

” ठीक आहे , सद्या मी कामातआहे, अस करा..वाचमनाकडे देऊ जा पैसे..”

पुन्हा फोनवर वाचमनला घेत पैसे मिळाले याची खात्री करून तो गेला .

जाताना पुन्हा पुन्हा थँक्स म्हणत.

मला त्याचे कौतुक वाटले. बांद्रा येथून त्याच्या ऑफिसातून मुद्दाम पैसे परत करायला तो आला होता याचे.

वीस रुपयाला किती किंम्मत होती ना त्याच्या दृष्टीने .

कामाच्या वेळी मदतीला धावून येणाऱ्याला महत्त्व असते .

घर फोन केला . सुकू आली का विचारलं . पाऊस आहे का विचारलं .

या वीस रुपये परत देणाऱ्या तरुणाची गोष्ट सांगितली स्वातीला .मी विचार करू लागलो .

मी याचे जागेवर असतो तर …. अनोळखी व्यक्तीला मी लगेच पैसा मागीतले असतेका ? एवढा चांगला सुटाबुटातला माणूस .. पैसे नाही

तर कशाला बसावं रिक्षात ?

रिक्षातू उतरताना किती फजिती झाली असत ना ..रिक्षावाल्याने बोंबाबोंब करून पार इज्जत घालवली असती …लोकांपुढं .

असं काही घडण्यापेक्षा अनोळखी माणसाकडून पैसे घेणेकधीही चांगले.लाज कसली यात..कधीकधीच तर घडतं असं.

सकाळी भिकारीणीला दोष देत होतो.आन आता याच भूमिकेत मी स्वतःला बघत होतो .

पण भीक मागणाऱ्याचं समर्थन नाही बरं हे …असंही समजत होतच मला .

पण येथे आम्ही दोघेही बरोबरच होतो.

मग आठवीत बसलो ………… पैसे न देणाऱ्या लोकांबद्दल .

मागच्या महिण्यात एक उधारीचे किस्सा झाला तो .

कँटीनधील काम करणाऱ्या शशीचे. रमेश च्या आधी शशी चहा आणून द्यायचा .

एक दिवस हळूच केबिनमध्ये आला .

” साहेब, जरा पैसे हवे होते”

“कशाला?”

” दवाखाण्यात ऍडमिट व्हायचं आहे”

” ठीक आहे,किती हवेत?’

” दोन हजार रुपये”

मी खिशात होते ते पैसे मोजले. यातून दोन हजार रुपये त्याला दिले .

चार पाच दिवस कामावर दिसला नाही शशी .

सहज फोन केला.

उत्तर आले .

साहेब दवाखाण्यात आहो . अजून एकाआठवड्याने येईन म्हणाला .

दुसऱ्या आठवड्यात पुन्हा “एक हजार लागतील साहेब. ”

मी कामापुरते पैसे ठेवून उरलेले नऊशे रूपये शशीला दिले.

काही दिवसानंतर ऑफीसात चर्चा सुरु होती की शशीने अनेकांचे पैसे डुबवले म्हणून . मला खरं वाटेना .

मी याला मोबाइलवर कॉल के ला .

” काय रे, तू अनेकांचे पैसेघेतलास. परत करत नाही म्हणतात लोकं “

” नाही , साहेब खोटे बोलतात.”शशीचे पालुपद.

याचेवर माझा असलेला विश्वास व तो माझा साध्यापणाचा गैरफायदा घेतो आहे, हे मला कळतच नव्हतं .

कँटीनच्या मालकाला फोन लावला . त्याला सगळं सांगितलं . ” साहेब, पैसे देता ना मला तर विचारायचं होतं”

फसवल्या गेलो होतो मी .

एक दोनदा फोन केला..उचलायचा..आता आता तर उचलतही नाही .

गेलेच माझे ते पैसे.

अशा शशीपेक्षा गेटवरील भिकारीण बरी.

मला जन्मात विसरणार नाही तो . कुठेतरी रुखरुख राहील त्याला …त्याचा विषय बंदच केला माझ्याकडून.

त्याचे मन त्याला खात राहील नेहमीसाठी .

बायकोला घर वीस रुपये देणाऱ्याबद्दल लगेच सांगितलं …मग शशीचं प्रकरण का लपवलं ?

माझेकडे उत्तर नाही त्याचं .

स्वतःचा अपमान, फसवणूक लपवत राहतो का आपण ?

मुलीला कधीकधी दहा वीस रुपयाचा खाऊ घेताना रडवतो, नाराज करतो ..अन दोन हजार नऊशे रुपये अनोळखी माणसाला सहज देतो.

पाऊस संपूर्णतः थांबला होता.

घरी गेलो की सुकूला , सुरूलला मनासारखं मोठ्ठ चॉकलेट नेणार .मुलींना खुश करणार….विचार करत करत…चांगला बाप, चांगला नवरा व्हायचं..ठरवत.

एका दिवसाने , एका पावसाने , एका प्रवासाने किती किती शिकवलं ना मला .

ही कथा माझी असेल ..तुमचीही असू शकते ना ?

— श्रीकांत पेटकर

Avatar
About श्रीकांत पेटकर 43 Articles
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..