वर्षभरातील तीन ऋतुंपैकी माझा सर्वात आवडता ऋतू, पावसाळाच आहे!! आधीचे चार महिने उन्हात तापलेल्या धरित्रीला पहिल्या पावसाने थंडावा मिळतो.. मग पुढे मार्च महिन्यापर्यंत, पंख्याची गरज भासत नाही..
अगदी लहानपणी आई कडेवर घेतलेल्या बाळाला, तिचाच पदर डोक्यावर ठेवून त्याला पाऊस लागू नये, याची काळजी घेते.. ते जरा मोठं झालं की, शाळेत जाऊ लागतं.. मग त्याला छत्रीतून नेणे व आणणे हे तिचं काम होऊन जातं. अशाच प्रकारे, माझं बालपण गेलं आहे.. जून महिन्यात पाऊस सुरु झाला की, शाळेतील इतर मुलं रेनकोट घालून यायची. त्या रेनकोटला येणारा एक विशिष्ट वास, अजूनही मला आठवतो आहे..
उन्हाळी सुट्टीत गावी गेल्यावर पुण्यात यायला जून उजडायचा.. पहिला वळीव पाऊस अनुभवताना, अतोनात आनंद मिळायचा. त्या पावसात गाईचं वासरुं शेपटी वर करुन हुंदडताना पाहिलेलं आठवतंय.. पाऊस उघडल्यावर सवंगड्यांसोबत हनुमान झऱ्यातून खेकडे पकडायला लांबवर गेलेलो आहे.. शेतातून चालताना चिखलाचा थर, जाडजूड चप्पल घातल्यासारखा पावलांना लागायचा…
माझी शाळा जवळच होती, त्यामुळे रेनकोट कधी घेतलाच नाही. शाळेत जाताना किंवा येताना पाऊस पडायला लागलाच तर, एखाद्या आडोशाला उभं रहायचं.. उघडला की पळत घर गाठायचं हे ठरलेलं असायचं.. कधी वह्या, पुस्तकं भिजलीच तर सुकण्यासाठी ती, घरात पसरुन ठेवावी लागायची.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, मराठीचे सर, बाहेर पाऊस पडत असताना पावसावरचीच कविता शिकवायचे.. ती कविता मनामध्ये कायमची रुजली जायची.. या दिवसांत अनेकदा भिजल्यामुळे सर्दी, पडसे हमखास व्हायचे. मग लोखंडी तवा गरम करुन, डोक्यावर टाॅवेलची घडी ठेवून, डोकं शेकलं जायचं.. तर कधी ओव्याची कागदी बिडी करुन, ती ओढून धुर सोडण्याची संधी मिळे.. फारच तब्येत बिघडली तर रामेश्वर चौकातील, डाॅक्टर साठे हे ठरलेले..
त्याकाळी पावसाळी सॅण्डल किंवा स्लीपर वापरली जाई. स्लीपरमुळे टाचेपासून वरपर्यंत रस्त्यावरील मातकट पाण्याच्या थेंबांची नक्षी उमटली जाई. जवळून जाणाऱ्या चारचाकीने घडविलेल्या पाण्याने एका बाजूने पॅन्ट भिजून जाई..
काॅलेजला जाताना, पावसाळ्यात छत्री वापरली जाई. ती सांभाळण्याची कसरत करताना नाकीनऊ येत असे. अनेकदा छत्री असूनही पावसात भिजण्याचा आनंद घेतला जाई. काॅलेज संपल्यानंतर मी व्यवसायात पडलो.
मग रेनकोट वापरु लागलो. रेनकोटचा सूट घालून टीव्हीएस ५० चालविताना गाडी खोलगट रस्त्यावर पाण्यात डुबून बंद पडत असे. मग तिचा स्पार्क प्लग साफ करुन, किका मारत बसावे लागे.. अशावेळी गाडी तशीच सोडून निघून जाण्याची इच्छा होत असे.. मात्र धाडस काही व्हायचं नाही..
एकदा अशाच रात्री, प्रिमिअर शो संपल्यावर मी दुचाकीवरून भर पावसात, पिंपळे निलखला गेलो होतो.. जाताना समोरुन येणाऱ्या वाऱ्याच्या व पावसाच्या झोताने मी गाडीसह हेलपाटत होतो.. शेवटी कसाबसा मुक्कामी पोहोचलो..
अशा पावसाळ्यात एसटीने प्रवास करायला आनंद वाटतो.. सगळीकडे हिरवागार निसर्ग दिसत असतो.. खिडकी बंद असली तरीही फटीतून, पाण्याचे थेंब अंगावर येतच असतात.. तसाच रेल्वेचाही प्रवास सुखावून जातो. रुळांवर साचलेल्या पाण्यातून फवारे उडवत गाडी वेगाने धावत असते.. अंगात भरलेल्या थंडीला उतारा म्हणून, गरम चहाचे घोट शरीरात तात्पुरती ऊब आणतात..
एखाद्या रम्य ठिकाणी गेल्यावर, जर पाऊस पडत असेल तर ती आठवण अविस्मरणीय ठरते.. तिथे फिरताना एखादं गाणं कानावर पडलं तर ते कधीच विसरलं जात नाही..
मी मित्रासोबत, सिंहगडावर पावसाळ्यात गेलो होतो. तेथील धुक्यातून व रिपरिप पावसात, अख्खा सिंहगड फिरलो होतो. ती आठवण आजही ताजी आहे..
काही वर्षांपूर्वी असाच मी पावसापासून वाचण्यासाठी, एका दुकानाच्या आडोशाला उभा होतो. तेवढ्यात एक सफारी गाडी माझ्यासमोर येऊन उभी राहिली.. आतमधून, सुनीताराजे पवार यांनी बोलावले व गाडीत बसवून, त्या मला ‘संस्कृती’त घेऊन गेल्या..
हेमंत शहा नावाचा माझा एक मित्र आहे. त्याने एकदा मला पावसात भिजताना पाहिले, दुसरे दिवशी त्याने एक मोठा घोळदार रेनकोट आणून दिला.. काही वर्षांनंतर तो रेनकोट वापरण्यायोग्य राहिला नाही, तरीही त्याची घडी, मी जपून ठेवलेली आहे.
पावसाळ्यात छत्री विसरणं, हे अनेकदा घडलेलं आहे.. आताही मी या पावसाळ्यासाठी नवीन छत्री घेतलेली आहे.. कालच आषाढाच्या पहिल्या दिवशी, तिचं रितसर उद्घाटन झालेलं आहे.. आता या पावसाळ्यात, तिची सोबत नेहमीच राहिल..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१-७-२२.
Leave a Reply