पावा वाजवी कान्हा जेव्हा
सूरात हरवी सृष्टी
स्थितप्रज्ञता त्यातही होती
अन अभेद्य दूरदृष्टी!!
अर्थ–
कृष्ण हा शब्दच कानावर पडला की चेहऱ्यावर स्मित येते. कृष्ण हा शब्द हा मुळातंच स्थितप्रज्ञ या शब्दाला निर्माण करणारा आहे असे मला वाटते. ज्याच्या पाशी सारं काही मिळवण्याची क्षमता होती त्याने केवळ मार्गदर्शन करावं आयुष्यभर. हे पटतं का विचार केल्यावर. माझ्या सारख्या माणसाला ते पटत नाहीच पण जर यावर सखोल विचार केला तर समजते की स्थितप्रज्ञ होणं हे यालाच म्हणतात.
ज्याच्या अंगाला सुख टोचत नाही आणि ज्याला दुःखाने भोवळ येत नाही त्याला स्थितप्रज्ञाता आहे असे म्हणतात.
आपण कोणाला सुख देतो की दुःख देतो यावर विचार होणं गरजेचं आहेच पण आपण जर कोणास मार्ग दाखवीत असू तर तो योग्य आहे का? हे पडताळून पाहणे जास्त गरजेचे आहे.
स्थितप्रज्ञ होण्यासाठी मन कठोर करावे लागते. अन ते कठोरपण दुःखाच्या वेळी दर्शविणे यापेक्षा सुखाच्या प्रसंगी किती टिकते याला महत्व आहे.
म्हणून असावं कृष्णा सारखं लोभ, राग, मत्सर, इर्षा यापलीकडे प्रेम जर ठेवलं तर या जगात वाईट काहीच नाही. आणि सूर देऊ शकलो नाही तरी सुरात मिसळणे यालाही तेवढेच महत्व आहेच.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply