नवीन लेखन...

पीसीओडी, स्त्रीत्व आणि भारतीयत्व

स्त्रीत्व डोक्यावर घेतलेल्या पदरावर आणि हातभर बाह्या आणि कपाळभर कुंकवावर सुद्धा अवलंबून आहे. हेच स्त्रीत्व आहे, असं कुठं म्हटलंय ?

स्त्रीचा पोशाखावरून ती सुसंस्कृत आहे की नाही कसं ओळखणार ? हे खूपच लांबच सांगितलय,
बाह्य गोष्टीमधून लक्षात येणारं स्त्रीत्व हे लक्षात येईनासं झालंय. आणि हेच पीसीओडीचं कारण आहे, हे मला सुचवायचं होतं. कसं ते आता सविस्तर पाहू.

भारतीय आचार विचार आणि पीसीओडी हा विषय आणि आयडीयल वूमनहूड हे दोन स्वतंत्र विषय आहेत.

पाॅलीसिस्टीक ओव्हेरीयन डिसीज असं नाव धारण करणाऱ्या रोगाचे मूळ स्त्रीत्व नष्ट होत जाण्यामधे आहे. दरमहा जे डिंब तयार होऊन बाहेर पडते, ते बाहेर न पडता, बीजांडामधेच रहाते, म्हणजे पीसीओडी असं वरवर भासते. त्याचे मूळ कारण मात्र बदलत चाललेल्या जीवनशैलीमधे आहेत. त्याच्या काही कारणांचा अभ्यास केला तर, सुखाचा अतिरेक, कफ वाढविणारा आहार, बैठे काम, वाकण्याची सर्व कामे बंद होणे, जेवणाच्या अनियमित वेळा, आणि मुख्य म्हणजे आपण स्त्री आहोत हेच विसरून जाणे.अशी सर्वसाधारण कारणे लक्षात येतात.

याची लक्षणे कोणती ?
दरमहा मासिक पाळी न येणे, जाडी वाढणे, घाम खूप येणे, दाढी मिश्यांच्या ठिकाणी केस येणे, आवाज घोगरा होत जाणे, प्रवृत्ती पुरूषी होत जाणे, स्त्रीयांचे वैशिष्ट्य मानलेल्या, स्त्रीयांच्या मुलभुत गुणात असलेला नाजूकपणा कमी होत जाणे, बोलण्या चालण्यात, हावभावात पुरूषांप्रमाणे आक्रमकपणा येणे, ही सर्व पीसीओडीची लक्षणे आहेत.

यावरून काय लक्षात येते ?
स्त्रीत्व संपत जाणे, म्हणजेच पीसीओडी.

रोग होण्याची तीन प्रमुख कारणे सांगितलेली आहेत. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. हे आधी लक्षात ठेवले पाहिजे.

दरमहा येणारी मासिक पाळी ही जिला कटकट वाटते, तिला पीसीओडी हा आजार लवकर होतो, भरीत भर म्हणून ती दरमहा येणाऱ्या रजःस्रावाला ” प्राॅब्लेम ” असे संबोधते. याचा अर्थ कटकट. दरमहा रजःप्रवृत्ती यायलाच हवी अशी भावना तयार झाल्याशिवाय मन, इंद्रिये, विषय, शरीर, अभिव्यक्ती ही साखळी पूर्ण होतच नाही. जर ती “कटकट” या अर्थी डोक्यात गेली असेल तर तिची अभिव्यक्ती कशी होणार ? आणि का व्हावी ?

मुळात हा आजार भारतीय नाही, तर पाश्चात्य विचारसरणीची देणगी आहे, असे मी म्हटले तर माझे काय चुकले ?

भारतीय असा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे हा आजार भगिनींना केव्हापासून सुरू झाला तर जेव्हा नैसर्गिक मासिक चक्राचा विचार पाश्चात्य पद्धतीने होऊ लागला, तेव्हापासून ना !

भारतीय विचारानुसार याला ‘मासिक धर्म’ असे संबोधले आहे. केवळ भारतीय धर्मशास्त्रातच नव्हे तर आयुर्वेदात देखील यावेळी शरीरातील टाकावू द्रव्ये बाहेर टाकली जातात. जो आर्तव गर्भधारणा न झाल्याने रज स्वरूप बनला आहे, त्याला शरीरातून बाहेर टाकणे ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. केवळ गर्भाशयातूनच नव्हे तर घामातूनही ही शुद्धी होत असते. तिचा स्पर्श, घाम, श्वास इ. मधून मलाचे निष्क्रमण होत असते, म्हणून तिने अन्नपदार्थांना स्पर्शू नये असे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर अशोकासारख्या औषधी झाडांना देखील तिने त्या चार दिवसात स्पर्शही करू नये. असे सांगितलेले आहे. हे काही स्त्रीला कमी लेखण्यासाठी नव्हे तर तिला सक्तीची विश्रांती देण्यासाठी होते, हे लक्षातच घेतले जात नाहीये.
यावेळी तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था अत्यंत कोमल असते. तिला विश्रांतीची अत्यंत गरज असते. म्हणून तिला “अस्पर्शा” (अस्पृश्य नाही.) सांगितले आहे. हा तिचा सन्मानच आहे. अन्य कोणत्याही देशात अशी विश्रांती स्त्रीला या चार दिवसात देण्यात येत नाही. हा आहे स्त्रीयांकडे आणि तीच्या दरमहा होणाऱ्या शुद्धीकडे पाहाण्याचा शुद्ध भारतीय दृष्टीकोन.
यात काय विकृत मानसिकता दिसते कळतच नाही ?

पाश्चात्य बुद्धीच्या विचारवंतांनी जेव्हा स्त्री पुरूष समानतेचे खुळ डोक्यात भरवले, तेव्हापासून मासिक पाळीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला आणि तिटकारा सुरू झाला.
स्त्रीयांनी घराबाहेर पडूच नये, वगैरे वादात मी जातच नाहीये.
स्त्री पुरूष कर्तृत्वाने समानच आहेत, यात कोणालाही शंका नाही.

माझ्यावर स्त्रीत्व लादून, त्या पुरूष देवानेही अन्यायच केला आहे, ( इथे सोयीस्कररीत्या देव आठवतात. एरवी देव म्हणजे अंधश्रद्धा किंवा भोंदुगिरी वाटते, काहीजणांना.) असे म्हणून कसे चालेल ? स्त्रीला पुनर्निर्माण यंत्रणा म्हणजे अख्खं मातृत्व बहाल केलंय, सहनशक्ती दिलीय, हे मातृत्वच धोक्यात येतंय हे लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न करतोय. बाकी काही नाही.

पाश्चात्य विचार हा भोगवादी आहे.
पैसे मिळवण्यासाठी स्त्री शरीराचा वापर कोणी सुरू केला ? दाढीच्या जाहिराती मधेदेखील सुंदर ललना दिसू लागल्या. इथे त्यांना सोयीस्कररीत्या स्त्री पुरूष समानता हवी. फक्त नवऱ्याने मिळवलेल्या मिळकतीवर हौस मौज करता येणार नाही, त्यासाठी घरात येणारा पैसा वाढला पाहिजे. पैसे जास्ती मिळतील, तर आणखीन चार सुखाच्या गोष्टीची खरेदी करता येईल, म्हणून घरातील (लक्ष्मी स्वरूप मानलेल्या ) स्त्रीयांनी दुसऱ्यांच्या दारात जाऊन चाकरी करून मिंधेपणा स्विकारण्यात धन्यता मानली. ???
ही काय भारतीय मानसिकता आहे ?

त्याही पुढे जाऊन त्या विशिष्ट दिवसात, हव्या तश्या उड्या मारायच्या, हवे तसे डोंगर चढायचे, सायकली चालवायच्या, टेनिस, बॅडमिंटन, खेळायचे, अशा जाहिरातीतून दाखवली जाणारी स्त्री चालते ? आरोग्याचा विचार करून पहा, हा त्या दिवसात स्त्रीयांवर होत असलेला अत्याचार नाही का ?
हा काय भारतीय विचार आहे ?

स्त्रीत्वाचा पराकोटीचा तिटकारा जेव्हा मनात घर करतो, तेव्हा मनामधे दोष उत्पन्न होतो. वाताचा प्रकोप होतो आणि अवरोध निर्माण होतो.

आयुर्वेदीय भाषेत पीसीओडीची संप्राप्ती वर्णन करायची झाल्यास, चुकीच्या जीवनशैलीमुळे तीनही दोष बिघडतात. कफ आणि वात वाढतो आणि पित्त कमी होते. विकृत कफ दोषामुळे, आम निर्माण आणि अग्निदुष्टी, पित्त क्षय, निरंतर हेतु सेवनाने अपान वायुची दुष्टी, आणि बदललेली मानसिकता यामुळे आणि व्याधी स्वभावामुळे दोष गर्भाशयात संचित होतात. बीजांडामध्ये स्थानसंश्रय करतात. अवरोध निर्माण होतो. अवरोधाने पुनः वातप्रकोप होतो.
या अवरोधामुळे तयार बीज पुढे सरकतच नाही.

एका बाजूने हेतु सेवन सुरू राहिले तर केलेल्या पंचकर्माचा आणि इतर शमन शोधनाचा तसा काहीही परिणाम होत नाही. आणि व्याधी दुष्चिकित्स्य बनतो. झाला तरी तात्पुरता होतो, पुनः ये रे माझ्या मागल्या !

चिकित्सा करताना “हेतुसेवन बंद करणे” ही पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट रहाते. या व्याधीतील वर वर्णन केलेल्या अनेक हेतुंमधील एक हेतु, जो मला जास्ती महत्त्वाचा वाटतो तो आहे, विचार बदलवणे.!
“मला दरमहा मासिक पाळी आलीच पाहिजे. त्याने माझी शरीर शुद्धी होत आहे. जे माझ्या स्त्रीत्वाचे वैशिष्ट्य आहे, ते स्त्रीत्व मी जागृत करीत आहे” असा सकारात्मक विचार अंतर्मनात पक्का झाल्याशिवाय, बाहेरून केवळ हार्मोन्स बदलवणारी औषधे घेत रहाणे, हा वरवरचा तात्पुरता उपाय आहे. त्यात मेटफाॅरमिन सारखी मधुमेहावरील औषधे कायम स्वरूपात घेणे, हे किती धोकादायक आहे ? आहे का मान्य हे ?
रोगाच्या मुळापर्यंत जाऊन विचार केला तर कळेल, स्त्रीत्व जागृत करणं किती महत्त्वाचे आहे ते !
स्त्रीत्व जागृत करण्यासाठीच, हातात काचेच्या बांगड्या घालणं, पायात वाजणारे पैंजण घालणे आणि डोक्याला ठसठशीत कुंकु लावणे असा उपाय मी चिकित्सा स्वरूप सुचवतो, यापेक्षा काही ( रूग्णाच्या भाषेत जालीम ) उपाय असल्यास जरूर सांगावा. नक्कीच उपयोगी होईल.

कुंकु लावल्याने काय एनर्जी मिळते हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. हे फक्त स्त्रीयांनीच लावायचे असं नाही, स्त्री पुरूष दोघांनीही लावायचे आहे. आमचे विचारच पाश्चात्य होत असल्यामुळे आम्हाला त्याचे महत्त्वच कळेनासे झाले आहे.

हातात काचेच्या बांगड्या घालण्यात कमीपणा कसला ? पण नाजुकपणा नक्कीच येईल. काम करताना, थोडं सांभाळून काम करावं लागेल, बांगडी फुटुन हाताला लागण्याचा धोका असल्यामुळे रागावर संयम येईल, मनावर संयम येईल. मग पुरूषांनी पण हातात बांगड्या का घालू नयेत असाही प्रश्न येईल. पण एक लक्षात ठेवूया. पुरूषी हात नाजुक कामासाठी नाहीतच. ते राकट आहेत.

पायात वाजणारे पैंजण घातल्याने पण तेच होईल, पाय हलला तरी त्यात नाजुकपणा असेल, माझी चाल स्त्रीचीच असली पाहिजे अशी भावना सतत मनात जागृत रहायला हवी, हे महत्त्वाचे !
पुनः एकदा सांगतो, इथे कुठेही स्त्रीला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिला तर माता, लक्ष्मी, शक्ती रूपात आपण पहातोय !

पण आज आम्ही कशाही वागू, स्वच्छंद जगू, पुरूषी दास्य आम्ही मानत नाही, आम्ही कसेही कपडे घालू, पुरूषांनी आपली दृष्टी बदलणे गरजेचे आणि आवश्यक आहे, हा जो सूर स्त्री मुक्तीवाल्यांचा दिसतो, तो भारतीय नाही.

मुळात स्त्रीला एका रथाची दोन चाके मानणारी आपली संस्कृती, रमन्ते तत्र देवता हे मानाचे सर्वोच्च पद बहाल करणारी आपली संस्कृती,
कुमारी अवस्थेपासून, तारूण्य आणि वृद्धावस्थेपर्यंत पुरूषांनीच तिचे रक्षण केले पाहिजे असे ( खरंतर पुरूषांवर अधिक जबाबदारी ) सांगणारी आपली संस्कृती.
तिचा अनादर होईल असा विचारही आपण कधी करत नाही. स्त्रीकडे वासनामय दृष्टीने पहावे, असं कोणत्या भारतीय धर्म ग्रंथात लिहिलंय सांगा बरं. अगदी मनुस्मृतीमधे देखील स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत पवित्र आहे. (जी मंडळी मनुस्मृतीवर टीका करतात, त्यांनी ती मुळातून वाचलेलीच नसते. कोणत्या तरी श्लोकांची तोडफोड करून आपल्याला हवे असतील तसे सोयीस्कर अर्थ काढून विकृतरीत्या सांगितले गेल्यामुळे आम्हाला आमच्याच ग्रंथाचे मूळ अर्थ समजलेले नाहीत.
मनुस्मृतीचा पूर्वग्रहदूषित न ठेवता अभ्यास करायचा असेल तर स्वामी वरदानंद भारती, ( पूर्वाश्रमीचे वैद्य अनंत दामोदर आठवले ) यांनी मनुस्मृतीवर लिहिलेली टीका, जी राधादामोदर प्रतिष्ठानने प्रकाशित केलेली आहे, ती जरूर वाचावी.)

कुंकु, बांगड्या, पैंजण हे सर्व केल्याने काय होईल ?
आपण भारतीय पद्धतीने विचार करायला सुरवात करू.

आरशात पाहिले तरी, हात हलला तरी, पाय हलवला तरी लगेच लक्षात येईल, की मी स्त्री आहे, मासिक पाळी नियमितपणे होण्यासाठी मला चिकित्सा म्हणून हा उपाय सांगितला आहे. ही मानसिकता जेव्हा लक्षात येईल तेव्हाच कायमस्वरूपी रोग जाईल. रोगाच्या या मानसिक हेतुकडे दुर्लक्ष करून कसे चालेल बरे ?

भारतीयत्वापासून आपण लांब गेल्याने, असे गैरसमज वाढत चालले आहेत, या महिलादिनाच्या निमित्ताने ही माहिती आपल्यापर्यंत पोचवता आली.

ज्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांनी घ्यावं, सोडून द्यायचंय त्यांनी सोडून द्यावं.

जय नारी शक्ती !
जय भारतीय विचार !!
जय आयुर्वेद !!!

वैद्य सुविनय दामले, कुडाळ सिंधुदुर्ग.

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..