नवीन लेखन...

लहान मुलांवरील हृदयशस्त्रक्रियेचे जनक डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक

(५ एप्रिल १८९९ ते १५ सप्‍टेंबर १९६४)

डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक

लहान मुलांमध्‍ये जन्‍मतः असलेल्‍या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्‍यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक विसाव्‍या शतकातील अग्रगण्‍य  शल्‍यविशारद होते. शल्‍यचिकित्‍सेतील भरीव कामगिरीसाठी कित्‍येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्‍यांच्‍या नावाची शिफारस करण्‍यात आली. व्‍हॅनडरबिल्‍ट विद्यापीठ व जॉन हॉपकीन्‍स विद्यापीठ अशा दोन अत्‍यंत नामांकित विद्यापीठांत त्‍यांनी शिक्षण घेतले व शल्‍यचिकित्‍सा प्रमुख म्‍हणून कामही केले.

अमेरिकेतील जॉर्जिया राज्‍यातील कुलोडेन गावात ब्‍लॅलॉक यांचा जन्‍म झाला. जॉर्ज ब्‍लॅलॉक व मार्था यांच्‍या पाच अपत्‍यांमध्‍ये आल्‍फ्रेड सगळ्यांत ज्‍येष्‍ठ. त्‍यांचे वडील कापूस उत्पादक शेतकरी होते व त्‍यांचा व्‍यापारही होता. सर्व मुलांनी उत्तम शिक्षण घेतले पाहिजे यावर त्‍यांचा कटाक्ष होता. चौदाव्‍या  वर्षी आल्‍फ्रेडला जॉर्जिया मिलीटरी स्‍कूलमध्‍ये दाखल करण्‍यात आले तर पुढच्‍याच वर्षी जॉर्जिया विद्यापीठात त्‍यांनी प्रवेश घेतला. जॉर्जिया विद्यापीठात शिकत असताना त्‍यांचा ओढा वैद्यकशास्‍त्राकडे वळला. प्राणीशास्‍त्राचे प्राध्‍यापक डॉ. जॉन कॅम्‍पबेल यांनी ब्‍लॅलॉकला शिफारसपत्र दिले व ब्‍लॅलॉक यांनी जॉन हॉपकिन्‍स युनिव्‍हर्सिटी स्‍कूल ऑफ मेडिसीन मध्‍ये प्रवेश घेतला. तेथे शिकत असतानाच शल्‍यचिकित्‍सक होण्‍याचे त्‍यांनी नक्‍की केले. विशेष करून शल्‍यचिकित्‍सेतील नवीन प्रयोग करावे असा काहीसा त्‍यांच्‍या मनाचा कल झाला. जॉन हॉपकीन्‍स येथे शिकत असतांनाच ब्‍लॅलॉक यांची टिन्‍सले हॅरिसन यांच्‍याशी ओळख झाली. हॅरिसन, ब्‍लॅलॉक यांचे सहाध्‍यायी तर होतेच पण विद्यापीठात शिकत असताना दोघेही एकाच खोलीत राहात असत. आयुष्‍यभराच्‍या निर्भेळ मैत्रीची ही सुरुवात होती.

वैद्यकीय पदवी घेतल्‍यानंतर डॉ. विल्‍यम हॅलस्‍टीड यांच्‍याकडे काम करावयास मिळावे अशी ब्‍लॅलॉक यांची इच्‍छा होती. त्‍यानुसार पदवीच्‍या शेवटच्‍या वर्षाला असतांना ब्‍लॅलॉक यांनी डॉ. हॅलस्‍टीड यांना पत्र लिहिले. त्‍यांना डॉ. हॅल‍स्‍टीड यांचे उत्तर देखील आले परंतु डॉ. हॅलस्‍टीड यांनी त्‍यांना प्रशिक्षणार्थी म्‍हणून घेतले नाही. ब्‍लॅलॉक खूप काम करीत व शल्‍यचिकित्‍सेत ते निपुण होते परंतु महाविद्यालयात असतानाचा त्‍यांचा एकूण निकाल डॉ. हॅलस्‍टीड यांना फारसा उत्‍साहवर्धक वाटला नाही व त्‍यांना ब्‍लॅलॉकना नकार कळविला. ब्‍लॅलॉकना युरोलॉजी (मूत्रविकार) विभागात प्रशिक्षणार्थी (इन्‍टर्न)   म्‍हणून नेमणूक मिळाली. काम करीत असतांना ब्‍लॅलॉक मूत्रपिंडाच्‍या विकाराने त्रस्‍त झाले व त्‍यांचे एक मूत्रपिंड काढून टाकावे लागले. तरीही हार न मानता ब्‍लॅलॉकनी उत्‍कृष्‍ट काम केले. पुढच्‍या वर्षी त्‍यांना शल्‍यचिकित्‍सा विभागात एक वर्षासाठी नेमणूक मिळाली. ती नेमणूक संपल्‍यानंतर ब्‍लॅलॉक, डॉ. सॅम्‍युएल क्रोवे यांच्‍याकडे काम करू लागले. ब्‍लॅलॉकना शल्‍यचिकित्‍सक व्‍हावयाचे आहे हे डॉ. क्रोवे यांना माहिती होते. ब्‍लॅलॉकचे झपाटले जाऊन अतिशय निष्‍ठापूर्वक काम करणे पाहून ते अतिशय प्रभावित झाले व डॉ. हार्वे कुशींग यांच्‍याकडे शब्‍द टाकला. डॉ. कुशींग, जॉन हॉपकीन्‍स मध्‍ये शल्‍यविशारद म्‍हणून काम करीत असत. जेव्‍हा डॉ. क्रोवे त्‍यांच्‍याशी ब्‍लॅलॉकविषयी बोलले तेव्‍हा डॉ. कुशींग, बोस्‍टन येथील पीटर बेंट ब्रिगहॅम रुग्‍णालयाच्‍या शल्‍यचिकित्‍सा  विभागाचे प्रमुख होते (त्‍यापूर्वी ते जॉन हॉपकीन्‍समध्‍ये शल्‍यचिकित्‍सक होते). डॉ. कुशींग यांनी ब्‍लॅलॉकला मुलाखतीसाठी बोलावले व बोस्‍टन येथे प्रशिक्षण घेण्‍यासाठी निमंत्रित केले. ब्‍लॅलॉकनी ही नेमणूक स्‍वीकारली व ते उत्‍साहाने बोस्‍टनला जाण्‍याची तयारी करू लागले. मध्‍यंतरीच्‍या काळात ब्‍लॅलॉक यांचे सहाध्‍यायी डॉ. टिन्‍सले हॅरीसन यांनी नॅशव्‍हीलच्‍या व्हॅनडरबिल्‍ट रुग्‍णालयात प्रमुख निवासी डॉक्‍टर म्‍हणून कामास सुरुवात केली होती. त्‍यांनी नॅशव्‍हील रुग्‍णालयाच्‍या शल्‍यचिकित्‍सा  विभागाचे प्रमुख डॉ. बार्नी ब्रुक्‍स यांच्‍याकडे ब्‍लॅलॉक यांच्‍या नावाची शिफारस केली व त्‍यांनी ब्‍लॅलॉकना नेमणूक द्यावी म्‍हणून लकडा लावला. डॉ. ब्रुक्‍स यांनी हॅरिसनची विनंती मान्‍य केली व शल्‍यचिकित्‍सेसाठी प्रमुख निवासी डॉक्‍टर म्‍हणून ब्‍लॅलॉकना निमंत्रित केले. वास्‍तविक ब्‍लॅलॉकनी तेव्‍हा  बोस्‍टनची नेमणूक स्‍वीकारली होती. बोस्‍टनला पोहोचल्‍यावर आगगाडीत असतांनाच ब्‍लॅलॉकना हॅरिसनची तार मिळाली. त्‍यांनी डॉ. कुशींगला नम्रपणे नकार दिला व डॉ. ब्रुक्‍सचे निमंत्रण स्‍वीकारून १९२५ च्‍या जुलै महिन्‍यात नॅशव्हिलसाठी प्रस्‍थान ठेवले. तेथील एक वर्षाची नेमणूक पूर्ण केल्‍यावर त्‍यांनी व्‍हॅनडरबिल्‍ट येथेच अध्‍यापकपद स्‍वीकारले. १९२७ मध्‍ये त्‍यांना क्षयाची भावना झाली. दोन वर्षे उपचार घेत असतांना देखील त्‍यांनी काम करणे चालूच ठेवले. याच दरम्‍यान त्‍यांनी बर्लिन, जर्मनी व केंब्रीज, इंग्‍लंड येथे तज्‍ज्ञांची भेट घेतली. केंब्रीज येथे त्‍यांनी जी. व्‍ही. अॅनरेप व सर जोसेफ बारक्रॉफ्टच्‍या मार्गदर्शनाखाली कामही केले.

जानेवारी १९३० मध्‍ये डॉ. ब्‍लॅलॉकनी व्हिविअन थॉमस नावाच्‍या आफ्रिकन-अमेरिकन तरुणास प्रयोगशाळेत पूर्ण वेळ सहाय्यक म्‍हणून नेमले. ब्‍लॅलॉक-थॉमस यांच्‍या एकत्रित कामामुळे पुढे वैद्यकीय क्षेत्राला कलाटणी मिळाली.

ब्‍लॅलॉक सतत प्रयोगशाळेत नवीन नवीन शोध लावण्‍यात गर्क असत. त्‍यांनी श्‍वानांवर बरेच प्रयोग केले. त्‍यादरम्‍यान त्‍यांच्‍या असे निदर्शनास आले की रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने ‘सर्जिकल शॉक’ येतो. त्‍यावर ‘ब्‍लड प्‍लाझमा’ वा ‘होल ब्‍लड प्रॉडक्‍ट्सचा’ वापर उपचारासाठी करून पाहिला व त्‍याचा उत्तम परिणाम होतो असे त्‍यांच्‍या लक्षात आले. दुसर्‍या महायुद्धाच्‍या कालावधीत ब्‍लॅलॉकनी विकसित केलेल्‍या या उपचारपद्धतीमुळे कित्‍येक सैनिकांना जीवदान मिळाले.

ब्‍लॅलॉक व व्हिविअन थॉमस व्‍हॅनडरबिल्‍ट येथे काम करीत असत. थॉमस व्‍यवसायाने सुतार होता. ब्‍लॅलॉककडे प्रयोगशाळेत सहायक म्‍हणून रुजू झाल्‍यावर थोड्याच अवधीत त्‍याने शल्‍यचिकित्‍सेतील विविध प्रक्रिया शिकून घेतल्‍या. स्‍वतंत्रपणे प्रयोग करणे, प्रयोगासंदर्भातील नोंदी व टिपणे अचूकपणे लिहिणे तो सफाईदारपणे करू लागला.

१९४१ मध्‍ये डॉ. ब्‍लॅलॉक जॉन हॉपकीन्‍सच्‍या शल्‍यचिकित्‍सा विभागाचे प्रमुख झाले. तेथे व्‍हॅनडरबिल्‍ट मधील त्‍यांच्‍या संशोधकांचा चमू घेऊनच ते गेले. रोजच्‍या कामांबरोबरच ते स्‍वतः शस्‍त्रक्रिया करीत, तसेच प्रयोगशाळेतील संशोधन देखील त्‍यांनी चालू ठेवले. त्‍याचबरोबर प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी यांच्‍यासाठी ते दर शुक्रवारी खास ‘फ्रायडे नून क्लिनिक’ चालवीत असत. त्‍यामध्‍ये विद्यार्थी, रुग्‍णाला तपासून त्‍यावरील उपचार पद्धती ब्‍लॅलॉकना विषद करीत व ब्‍लॅलॉक त्‍यानुसार विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करीत. यात केवळ विद्यार्थीच नव्‍हे तर इतर अध्‍यापकही सहभागी होत.

येथे असतांनाच ब्‍लॅलॉक यांनी ‘ब्‍लू बेबी’ वर उपचार करणारी प्रणाली विकसित केली. त्‍याची सुरुवात अशी झाली; डॉ. एडवर्ड पार्क्स बालरोगतज्‍ज्ञ होते व त्‍या विषयाचे प्राध्‍यापकही होते. एक दिवस त्‍यांनी डॉ. ब्‍लॅलॉकची भेट घेतली व जन्‍मतःच या विकाराने ग्रासलेल्‍या तान्‍हुल्‍यांसाठी (त्‍यांना ‘ब्‍लू बेबी’ असे संबोधिले जात असे.) काही करता येईल का अशी विचारणा केली. डॉ. ब्‍लॅलॉकनी यावर काम करावयास सुरुवात केली.

२९ नोव्‍हेंबर १९४४ रोजी ब्‍लॅलॉकनी स्‍वतः विकसित केलेले तंत्र वापरून पहिली शस्‍त्रक्रिया केली. यादरम्‍यान डॉ. विल्‍यम लॉंगमायर त्‍यांचे सहायक होते. त्याशिवाय आणखी एक अशी व्यक्ती त्यांच्यकडे प्रशिक्षणार्थी होती ज्याव्यक्तीने पुढे हृद्यशल्यचिकित्सेच्या क्षेत्रात स्व:तहाचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. ती व्यक्ती म्हणजे डॉ डेंटन कुली.  व्हिव्हिअन थॉमस तर होतेच. शस्‍त्रक्रिया यशस्‍वीपणे पार पडली. त्‍यानंतर ब्‍लॅलॉकनी अशा प्रकारच्‍या कित्‍येक शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केल्‍या. त्‍यांच्‍या या प्रक्रियेमुळे हृदयशल्‍यचिकित्‍सेला वेगळे आधुनिक परिमाण लाभले व बालहृदयशल्‍यचिकित्‍सेला नवीन कलाटणी मिळाली. यामुळे ब्‍लॅलॉकचे नाव जगभरात झालेच पण हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या इतिहासात देखील कायमचे कोरले गेले.

या नवीन उपचारप्रणालीसंदर्भात एका कार्यशाळेत चर्चा करत असतांना ब्‍लॅलॉक यांची डॉ. हेलन टॉऊसिग यांच्‍याशी भेट झाली. त्‍यांनी त्‍यात काही सुधारणा सुचविल्‍या. आज या प्रक्रियेमुळे हजारो बालकांना जीवदान मिळाले आहे. ब्‍लॅलॉक व टॉऊसिग  यांच्‍या सन्‍मानार्थ या प्रणालीला त्‍यांचे नाव देण्‍यात आले आहे. ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-शंट’ असे त्‍याचे नामाभिधान आहे.

जॉन हॉपकीन्‍स मध्‍ये काम करीत असताना ब्‍लॅलॉक यांनी हृदय व रक्‍तवाहिन्‍यांवरील शल्‍यचिकित्‍सेसंदर्भातील संशोधन चालूच ठेवले. त्‍यादरम्‍यान त्‍यांनी १९४४ मध्‍ये डॉ. पार्क्‍सबरोबर ‘बायपास ऑपरेशन’ विकसित केले तर १९४८ मध्‍ये डॉ. रोलिन्‍स हॅनलॉन यांच्‍याबरोबर हृदयाला रक्‍तपुरवठा करणार्‍या रक्‍तवाहिन्‍यांवर शस्‍त्रक्रिया करणारी प्रणाली विकसित केली.

१९५० सालापर्यंत ब्‍लॅलॉकनी जन्‍मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्‍या एक हजारपेक्षा जास्‍त शस्‍त्रक्रिया केल्‍या.

ब्‍लॅलॉकनी वैद्यकीय संशोधनाला वाहून घेतले होते. ते उत्‍कृष्‍ट हृदयशल्‍यविशारद होते पण त्‍याबरोबरीने ते प्रयोगशाळेतही काम करीत. त्‍यांनी त्‍यांच्‍या आयुष्‍यात १३५ शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्‍याव्‍यतिरिक्‍त ‘प्रिन्सिपल्‍स ऑफ सर्जिकल केअर : शॉक अॅंड अदर प्रॉब्‍लेम्‍स’ हे पुस्‍तकही लिहिले.

ब्‍लॅलॉक यांनी अध्‍यापन केले. कित्‍येक नामांकित शल्‍यचिकित्‍सक त्‍यांच्‍याकडे प्रशिक्षण घेऊन गेले.

डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक, नॅशव्हिल येथे शल्‍यचिकित्‍सकांच्या समोर भाषण करताना

त्‍यांना कित्‍येक सन्‍मान व पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले. अमेरिकेतील ९ विद्यापीठांनी त्‍यांना मानद पदवी प्रदान केली. १९५५ साली जॉन हॉपकीन्‍स रुग्‍णालयाच्‍या ‘मेडिकल बोर्डाचे’ अध्‍यक्ष म्‍हणून त्‍यांची निवड करण्‍यात आली. १९६४ साली निवृत्त झाल्‍यानंतर जॉन हॉपकीन्‍स रुग्‍णालयातील शल्‍यचिकित्‍सेचे मानद प्राध्‍यापकपद व शल्‍यचिकित्‍सा विभागाचे मानद प्रमुखपद देऊन त्‍यांना गौरविण्‍यात आले.

राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील ४५ संस्‍थांचे ते सन्‍माननीय सदस्‍य होते. त्‍यामधे अमेरिकन फिलॉसॉफीकल सोसायटी, नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्‍स व रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन या संस्‍थांचा समावेश होता. विविध नियतकालिकांचे ते संपादक होते. वैद्यकीय क्षेत्रातील त्‍यांच्‍या अतुलनीय कामगिरीसाठी त्‍यांना राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील १८ बहुमानांनी गौरविण्‍यात आले. ‘मेटास अॅवॉर्ड’, ‘द रेने लेरिच अॅवॉर्ड’ तसेच ‘द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ हा क्‍यूबा सरकारतर्फे दिला जाणारा पुरस्‍कार यांचा या बहुमानांत समावेश होता.

अखेरीस ते कर्करोगाने आजारी झाले. वेदना व क्‍लेश सहन करीत असतांना देखील त्‍यांनी त्‍यांच्‍या कामाप्रती असलेली निष्‍ठा कायम ठेविली. १५ सप्‍टेंबर १९६४ रोजी डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक काळाच्‍या पडद्याआड गेले. १९६५ च्‍या फेब्रुवारीत त्‍यांना मरणोत्तर ‘हेन्‍री जेकब बिगलो’ पदक प्रदान करण्‍यात आले. जॉन हॉपकीन्‍स येथील क्‍लीनिकल सायन्‍सच्‍या इमारतीस डॉ. ब्‍लॅलॉक यांचे नाव देण्‍यात आले आहे. २००३ मध्‍ये ब्‍लॅलॉक व थॉमस यांच्‍या एकत्रित कार्यावर आधारित, ‘पार्टनर्स ऑफ द हार्ट’ या नावाचा एक लघुपट तयार करण्‍यात आला. या लघुपटात अमेरिकन हिस्‍टोरियन ऑर्गनायझेशनतर्फे दिला जाणारा ‘बेस्‍ट हिस्‍टरी डॉक्‍युमेंटरी’चा २००४ चा पुरस्‍कार मिळाला.

त्‍यानंतर २००४ मध्‍ये एच.बी.ओ. च्‍या वतीने ‘समथिंग द लॉर्ड मेड’ या नावाचा एक चित्रपट तयार करण्‍यात आला. या चित्रपटास तीन एमी सन्‍मान मिळाले.

तळटीपः काही बालकांच्‍या हृदयात जन्‍मतः छीद्र असते ज्‍यामुळे शुद्ध व अशुद्ध रक्‍त एकमेकांत मिसळते त्‍यामुळे ती बालके अल्‍पायुषी ठरतात. त्‍यांच्‍या हाताची नखे व ओठ यांवर निळसर झाक दिसते. वैद्यकीय क्षेत्रात त्‍यांना ‘ब्‍लू बेबी’ असे संबोधिले जाते.

— डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 

 

 

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..