जकार्ता मध्ये जहाजावर जाण्यापूर्वी सलग तिसऱ्या वर्षी स्ट्रेस टेस्टचे टार्गेट रिझल्ट वेळेआधीच पूर्ण झाली म्हणून इंडोनेशियन सिस्टर ने अभिनंदन करून अंगाला चिकटवलेले सेन्सर्स काढायला सांगितले.
स्ट्रेस टेस्ट तर वीस पंचवीस मिनिटं ट्रेडमिल वर धावून पूर्ण होते. खरी टेस्ट तर जहाजावर आल्यावरच होते फिजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारचे स्ट्रेस दिवस रात्र कधीही आणि कोणत्याही वेळी ईमर्जन्सी आली की असेल तसे धावत पळत जावे लागते. जहाजातील इंजिन रूम म्हणजे कमीत कमी चार ते पाच मजले आणि सगळे जिने एकदमच तीव्र उताराचे, अकोमोडेशन सुद्धा इंजिन रूम च्या वर चार ते पाच मजले. एखाद्या दिवशी दिवसभरात दहा मजले किती वेळा वर खाली करायला लागतील त्याची काही खात्री नसते. इंजिन रूम मध्ये तापमान 35 ते 40 अंश सेल्सियस आणि स्टीम तसेच फ्युएल च्या उष्ण आणि अतीतप्त लाईन त्याला हात लागला की चटकाच काय फोड आलाच म्हणून समजा. घरापासून लांब आणि जीव मुठीत धरून सतत स्ट्रेस मध्ये काम करायचे आणि एक एक दिवस ढकलायचा.
मागील बारा वर्षांत जुनियर इंजिनियर पासून ते चीफ इंजिनियरच्या प्रवासात बारा वेळेस जहाजावर येणे जाणे झाले. जहाजावर असताना कोणताही त्रास नाही, सर्दी खोकला नाही की ताप नाही. उलट घरी असताना टायफॉइड, मलेरिया नाहीतर खोकला चालूच असतो.
जहाजावर होणारी शरीराची धावपळ आणि मनावर कामाचा असलेला स्ट्रेस याचा विचार केल्यावर बालपण आठवायला लागते.
1990 साली मी जेमतेम सहा ते सात वर्षांचा होतो, माझे बाबा बदली झाल्यामुळे वर्धा पोलीस स्टेशनंला आमच्या कल्याण जवळच्या कोन गावापासून शेकडो मैल लांब एकटेच ड्युटीमुळे आम्हाला गावांत ठेवून राहायचे . आई आणि आम्ही दोन भावंड आमच्या आजी आणि इतर चुलत्यांसह आमच्या गावातल्या घरात राहायचो. मला अचानक ताप भरायचा आणि उतारायचा देखील. पण ताप भरत असताना माझ्या हाता पायांचे सांधे सुजायचे. आई मालिश करून वेदना कमी करायची. तेव्हा फोन वगैरेची फारशी सुविधा नव्हती त्यामुळे बाबांना कळवायचा मार्ग नव्हता. आईने एक दिवस साधा ताप असेल म्हणून क्रोसिन वगैरे देऊन बघितलं पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. हातापायाच्या सांध्याना सूज आणि जास्तीचा ताप यामुळे आई मनातून खूप हादरली, तिने माझ्या मामाला लोणावळ्याला फोन केला आणि माझ्याबद्दल सांगितलं. लोणावळ्याला असलेला माझा डॉक्टर मामा अनेस्थेटीस्ट होता, त्याने ताबडतोब मला घेऊन तिकडे लोणावळ्याला यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने पाच वर्षांच्या माझ्या भावाला आणि माझ्या मोठ्या चुलत भावाला घेतले माझी अवस्था दोन दिवसात इतकी मलूल झाली होती की आईने अक्षरशः मला कडेवर उचलून घेतले होते. सकाळची सिंहगड पकडून आम्ही लोणावळ्याला पोहोचलो आईने मला कडेवरून मामाच्या पुढ्यात टाकले आणि भाऊ याला बघ रे काय होतंय म्हणून हंबरडा फोडला. मामाने आणि मामीने रडणाऱ्या आईला शांत केले. तिची समजूत काढली आणि लगेचच मामाने त्याच्या ओळखीच्या लहान मुलांच्या डॉक्टरांना संपर्क केला आणि तपासण्या केल्या. गांधी नावाचे एक डॉक्टर आठवड्यातून एका वारी पुण्याहून लोणावळ्याला येत असत मामाने त्यांच्याकडे नेले. त्यावेळेला आपल्या साडे सहा वर्षांच्या मुलाच्या हृदयाला जन्माला आल्यापासून लहानसे छीद्र होते आणि त्याचा त्रास आता सुरु झालाय हे रोगनिदान ऐकून माझ्या आईला चक्कर आली. मामाने तिला सावरले आणि समजावून सांगितले की यामध्ये घाबरण्या सारखे नाहीये, यावर उपचार आहेत आणि बऱ्याचशा मुलांना हा आजार असतो. मामाने बाबांना फोन करून कळवलं आणि त्यांनासुद्धा फोनवर धीर दिला.
माझ्यावर औषधोपचार सुरु झाले सतीश गांधी डॉक्टरांनी मला पेनीसिलीनचे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितलं. त्यावेळेस हे इंजेक्शन द्यायला आणि त्यातल्या त्यात साडे सहा वर्षांच्या मुलाला द्यायचे याबद्दल गांधी डॉक्टरांसह सगळ्यांनाच भीती वाटत होती. अगदी मामा सुद्धा घाबरला होता त्याने आणखीन काही डॉक्टरांचे सल्ले घेतले आणि पेनीसिलीन शिवाय पर्याय नसल्याने, माझ्या जीवाचे इंजेक्शनच्या रिऍक्शन मुळे बरे वाईट होऊ शकते या भीतीपेक्षा स्वतःच्या भाच्यावर हा प्रसंग ओढवल्याने जास्त काळजीत पडला.
आईला तर काहीच सुचत नव्हते, तिचा मामावर पूर्ण विश्वास होता, एकसारखी मामाला बोलायची मी त्याला तुझ्या ताब्यात दिलाय आता तूच त्याला वाचवशील. मला पेनीसिलीनचा पहिला डोस देण्यात आला. गांधी डॉक्टर आणि पेनीसिलीन ची मात्रा मला लागू पडली. हळू हळू माझ्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली.
मी चालायला फिरायला लागल्यावर मामाने आम्हाला आमच्या घरी कोनला जाऊ दिले तोपर्यंत मामा आणि मामीने आईला एवढा धीर दिला की आणखीन पुढील पाच वर्षे मला पुढील दर एकवीस दिवसांनी पेनीसिलीन चे इंजेक्शन घ्यावे लागेल यासाठी तिच्या मनाची तयारी केली.
माझ्या आजारपणात बाबा आमच्याजवळ असावेत म्हणून वर्धा येथून कल्याण जवळ बदली व्हावी म्हणून बाबांनी ओळख काढून तेव्हाच्या गृहराज्य मंत्र्याकडे ओळख काढली. बदली व्हावी म्हणून बाबांनी त्यांच्या संपूर्ण सर्व्हिस मध्ये फक्त तेव्हा एकदाच प्रयत्न केला होता. आईने आम्हा दोघा लहान भावांना मुंबईत असलेल्या पोलीस मुख्यालयात नेले होते पोलीस महासंचालकाना आम्हा दोघा लहान भावंडाना बघून खात्री पटली की कुटुंबापासून लांब एखाद्या अधिकाऱ्याला पोस्टिंग देणे योग्य नाही. आईला एकीकडे आपण लहान मुलांना नेऊन बदलीसाठी आर्जव करतोय म्हणून अपराधी वाटत होते. याउलट निवृत्तीला आलेल्या पोलीस महासंचालकांनी आईला, मुली घाबरू नकोस आणि वाईट सुद्धा वाटून घेऊ नकोस. एकदम वर्धा येथून ठाणे किंवा मुंबईला बदली करणे शक्य नाही पण नाशिक जिल्ह्यात आणून तुम्हाला कल्याणहुन सोयीचे पडेल म्हणून मनमाड मध्ये पोस्टिंगची मी ऑर्डर काढतो.
बाबांसह आम्ही मनमाडला पोलीस लाईनीत ऑफिसर्स क्वार्टर मध्ये राहायला गेलो. मनमाडला जाण्यापूर्वी आई मला दर एकवीस दिवसानी गावातल्या धमेले यांच्याकडे पेनीसिलीन चे इंजेक्शन द्यायला न्यायची. पहिल्या वेळेस त्यांनी मी साडे सहा वर्षांचा असल्याने इंजेक्शन देण्यास नकार दिला पण नंतर त्यांचे आणि मामाचे बोलणे झाले आणि ते तयार झाले. मनमाडला गेल्यावर तिथले कोणीच डॉक्टर मला पेनीसीलीन चे इंजेक्शन द्यायला तयार होत नव्हते. शेवटी बाबांनी युनिफॉर्म घातला आणि मला पोलीस जीप मध्ये नेऊन एका डॉक्टरला हा माझा मुलगा आहे आणि मी माझ्या जवाबदारीवर सांगतोय की त्याला इंजेक्शन द्या तेव्हा कुठे डॉक्टर तयार झाले आणि मनमाड मध्ये वर्षभर प्रत्येक एकवीस दिवसानी पेनीसीलीनचे इंजेक्शन मिळू लागले. पुढे मालेगावला बदली झाल्यावर सुद्धा तिथे सुद्धा कोणीच डॉक्टर तयार होईना मग बाबा त्यांना पोलिसी वर्दीतून खाक्या न दाखवता विनवणी करत.
मला तर अशी सवय पडली होती की कॅलेंडर मध्ये आज इंजेक्शन घेतल्यापासून पुढील इंजेक्शन ज्या एकवीसव्या दिवशी येईल त्याच्यावर कॅलेंडर मध्ये आधीच फुली मारून ठेवायची. सुरवातीला लहान असताना इंजेक्शन घेताना रडू यायचे, मला रडताना बघून आईला रडू यायचे बाबांचे डोळे पाण्याने भरायचे पण हातपाय धरून मला इंजेक्शन घ्यायला लावायचे. नंतर नंतर मग समजायला लागल्यावर मनाची अशी समजूत झाली की कितीही रडलो ओरडलो तरी इंजेक्शन टोचून घ्यावेच लागते त्यामुळे निमूटपणे घेतले तर आई बाबांना पण बरे वाटेल. कधी कधी शहर आणि डॉक्टर बदलला किंवा डॉक्टरचाच पेनीसीलीन देताना हात थरथर करायला लागला की कमरेवर सूज यायची. दोन तीन दिवस खूप दुखायचं.
साडे सहा वर्षा पासून वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत न चुकता दर एकवीस दिवसांनी पेनीसिलीन चे इंजेक्शन घेतल्या नंतर माझी तब्येत बघून डॉक्टर गांधी समाधानाने हसले. माझ्या छातीवर नेहमी प्रमाणे स्टेथोस्कोप लावून श्वास आत बाहेर करायला लावले आणि आनंदाने माझ्या आईला म्हणाले आता तुमचा मुलगा पूर्णपणे नॉर्मल झाला आहे. एव्हरेस्ट शिखर सुद्धा सर करू शकतो, याला भविष्यात हृदयाशी संबंधित कोणतेही दुखणे होणार नाही याची मी खात्री देतो.
माझ्या आईला आणि बाबांना मी सगळ्यांपेक्षा वेगळा वाटायचो, मला त्यांनी कधीही अभ्यासासाठी जबरदस्ती केली नाही की माझी कोणाशी कधीही तुलना केली नाही. एवढेच मार्क मिळाले पाहिजेत की डॉक्टरच हो किंवा इंजिनियरच हो असंही कधी केले नाही. दोघांना मी इतरांपेक्षा वेगळा वाटायचो पण दुबळा कधीच वाटलो नाही मी आयुष्यात काही करेन न करेन पण सगळ्यांपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळे करेन एवढं मात्र दोघांच्याही मनात होते.
प्रियाला सुद्धा लग्नापूर्वी माझ्या हार्ट चा प्रॉब्लेम सांगितला ती स्वतः डॉक्टर असल्यापेक्षा तीच तीचे हार्ट मला देऊन बसल्याने तिला त्यात काही विशेष वाटले नाही.
मामा आणि मामीने आईला तिच्या मागे डोंगरासारखे उभं राहून जे पाठबळ दिले त्या ऋणातून आईचीच काय माझी सुद्धा या जन्मात सुटका होणे शक्य नाही.
बालवयात कॅलेंडर वर दिवस मोजून फुल्या मारायची सवय अजूनही आहे, जहाज जॉईन केले की एक एक दिवस गेला की घरी जायचा दिवस येईपर्यंत फुली मारत दिवस मोजत राहावे लागतेय.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply