जिम्बे या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले व उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे लहान भाऊ असलेले सुप्रसिद्ध संगीतकार तौफिक कुरेशी यांनी संगीत क्षेत्रात स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६२ रोजी झाला. उस्ताद अल्लाराखा आणि उस्ताद झाकीर हुसेन हे त्यांचे गुरु होत. त्यांच्या घरी मोठमोठे कलाकार यायचे.
पं. रविशंकरजी, पं. हरिप्रसादजी, पं. शिवकुमारजी, उस्ताद अमजद अलीजी, उस्ताद अली अकबर खांसाहेब असे. त्यांना नुसते पाहणे, त्यांच्या चर्चा ऐकणे, हाही त्यांचा मोठा रियाझ होता. पर्क्युशनिस्ट म्हणून जगभरात नाव कमावलेल्या तौफिक कुरेशी यांना या वाद्याचे अनभिषिक्त सम्राट मानले जाते. एक उत्कृष्ट तबला व ताल वादक असलेल्या कुरेशी यांनी संगीतकार म्हणूनही नाव कमावले आहे.
अभिजात भारतीय संगीतातील पारंपारिकता आणि त्यातील आधुनिकता यांची सांगड कुरेशी यांनी घातलेली आहे. त्यांनी सिनेसृष्टीत अनेक वर्षे विविध तालवाद्य्ो वाजवली आहेत. २००० मध्ये त्यांचा ‘ऱ्हिधून’हा नवा अल्बम आला. त्यात त्यांनी ‘ऱ्हिदमचे, तालाचे वेगळे प्रयोग केले आहेत. उस्ताद अल्लाराखा यांनी त्यात अनेक वर्षांनी गायन केले होते.‘ऱ्हिधून’अल्बमने तौफिक कुरेशी यांची नवी ओळख निर्माण झाली. ग्रॅमी अॅवॉर्डप्राप्त ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’या अल्बममधील त्यांच्या सहभागाची आणि त्यांनी सादर केलेल्या वादनाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. पर्क्युशन वाद्याच्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केलेले तौफिक या वाद्यावरील त्यांच्या पकडीमुळे आणि सादरीकरणाच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जागा पटकावून बसले आहेत.
जयपूर-अतरौली घराण्याच्या गायिका गीतिका वर्दे-कुरेशी या तौफिक कुरेशी यांच्या पत्नी होत. १९९३ साली उभयतांनी परस्परांचे आयुष्यभराचे जोडीदार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. नझरिया, हम अपने, मीरा, तुम बिन, ले आयिले हे त्यांचे अल्बम गाजलेले आहेत. तौफिक कुरेशी व गीतिका वर्दे यांचा मुलगा शिखरनाद हा तबला वादक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply