दिवसा (सूर्याच्या उष्णतेमुळे) प्राण्यांचे आशय ( म्हणजे ह्रदयादि सर्व अवयव) विकसित अवस्थेत असतात. क्रियाशील असतात. सूर्य उगवला की, कमळ उमलते. सूर्य मावळला की कमळ मावळते.
ग्रंथकारांची सौंदर्य दृष्टी इतकी विलक्षण प्रतिभावान आहे, की शरीरातील अवयवाला ते कमळाची उपमा देतात. त्या अवयवांना ते ह्रदय म्हणतात. सूर्यनारायणांच्या प्रकाश आणि उष्णतेमुळे प्राण्यांचे ह्रत्कमळ प्रफुल्लित अवस्थेत असते. दिवसभरातील उष्णतेने आणखीन विकसीत होत जाते. या ऊर्जेमुळे आणि ह्रदयातील गतीशीलतेचा परिणाम होऊन शरीरातील इतर स्रोतसे पण विकसीत रहातात. तसेच दिवसा आपल्या इतर अनेक शारीरिक हालचाली होत असतात. तसेच चिंतन मनन आदि मानसिक कार्येदेखील होत असतात. यामुळे रस रक्त आदिंचे वहन करणाऱ्या स्रोतसांमधील चिकट अडथळे दूर होत असतात. वेळच्या वेळी हा कफसदृश्य विकृत क्लेद पुढे पुढे सरकत रहातो आणि स्रोतसे आतून शुद्ध रहातात. अशा क्लेद विरहित स्रोतसामधे आलेला अन्नरस, जो पचनातून उत्पन्न झालेला असतो, तो दूषित होत नाही.
पुढे आणखीन एक दृष्टांत ग्रंथकर्ते देतात. जसे शुद्ध, चांगल्या दुधामधे चांगले दूध ओतले तर दुधाचे नुकसान होत नाही.
पचनामधे निर्माण झालेली उष्णता आणि गती या दोन्ही गोष्टी जंतुसंसर्ग व्हायला देत नाहीत.
व्यवहारात पण याच गोष्टी दिसतात. मिक्सरमध्ये नारळ वाटताना जी उष्णता निर्माण होते, त्यातील वाटपाला जी गती असते, त्यामुळे नारळामधे विकृती होत नाही. जंतुनिर्माण होत नाही. (जंतु हा शब्द अॅलोपॅथीमधला नाही. हा शब्द देखील आयुर्वेदातीलच आहे. काही ठिकाणी त्याला भूत असे म्हटले आहे. भूत म्हणजे “ते” नव्हे. जे शोधले तरी मिळत नाही, दुर्बीणीने पण दिसत नाही, म्हणजे अतिसूक्ष्म, पण अस्तित्वात असते, ते भूत. )
पण जिथे गती थांबते आणि उष्णता कमी होऊन दमटपणा वाढतो, तिथे जंतुसंसर्ग वाढतो. अगदी मिक्सरमधे देखील होतो ना. वाटलेला नारळ मिक्सरमध्ये वाटून तसाच ठेवला तर ? जंतुसंसर्ग होणारच. जसं मिक्सरमध्ये तसं पोटातही “इन्फेक्शन” होणारच ना.
हे होऊ नये म्हणून उष्णता आणि गती हवी,
जी आपल्याला सूर्यापासून मिळते.
त्यासाठी जेवण….
सूर्य असेपर्यंतच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.03.2017
Leave a Reply