रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणे.
उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळा च विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्याने बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणे कमी होत जातात. आणि लवकर बरे वाटते. म्हणून जेवणाची वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जेवणाची वेळ पाळली तर औषध घ्यायच्या वेळा पाळायची वेळ येत नाही.
जेवण नेमके कोणत्या वेळी घ्यावे, असा शोध मी ग्रंथात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला थेट उत्तर मिळाले नाही.पण एक श्लोक मात्र मिळाला आणि विचारांना दिशा मिळाली.
अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 11-63 मधे शास्त्रकार म्हणतात,
प्रातराशे तु अजीर्णे अपि,
सायमाशो न दूष्यति ।
अजीर्णे सायमाशे तु
प्रातराशो हि दूष्यति ।।
म्हणजे दिवसा सेवन केलेले अन्न सम्यक रितीने जर पचले नाही, आणि जर सायंकाळी भोजन केले तर विशेष हानी होत नाही.
पण सायंकाळी घेतलेले भोजन जर सकाळी पचले नसेल आणि सकाळी पुनः अन्न सेवन केले तर मात्र हानी अवश्य होते.
अजीर्ण होऊ नये म्हणून हा श्लोक उद्धरीत केला आहे. आता शास्त्रकारांनी ज्या कारणासाठी हा श्लोक तिथे सांगितला होता, त्याचे कारण वेगळे होते. अजीर्ण केव्हा होते, कसे होते हे सांगताना हा श्लोक सांगितला आहे.
आता या श्लोकातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रातः आणि सायम् प्रातःकाल आणि सायंकाळ. म्हणजे सकाळ आणि सायंकाळ.
इथे दुपारी आणि रात्री असे शब्द वापरलेले नाहीत. याकडे विशेष लक्ष द्यावे. यावरून असे लक्षात येते, की आपल्या दोन वेळा जेवायच्या. सकाळी आणि सायंकाळी.
हे काही आपल्याला जमणारे नाही बुवा, असं म्हणून, सोडून द्यायचा हा विषय नाही. कारण औषधाशिवाय निरोगी जगायचं असेल तर कुछ ना कुछ करना तो पडेगा ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.02.2017
Leave a Reply