जेवण सकाळी आणि सायंकाळी करावे ?
काहीतरीच सांगताय राव ! ही काय जेवायची वेळ आहे ? भूक तर लागली पाहिजे ना ! आमचं सकाळचा नाश्ता खाल्लेलाच पचत नाही, तर जेवायचं कुठुन ?
यासाठी काही मुलभुत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आज जे काही सांगितले जातेय, ते कितपत योग्य आहे ते आधी ठरवावं लागेल.
दर दोन तास किंवा चार तासांनी सतत खात रहा, असे आज डाॅक्टरांकडून सांगितले जाते, नाहीतर म्हणे अॅसिडीटी वाढेल म्हणून खावे, असेही सांगितले जाते, असे रुग्ण सांगतात, डाएटीशियन तेच सांगतात, जिम इन्स्ट्रक्टर तेच सांगतात. मुळात प्राॅब्लेम इथेच सुरू होतोय. ज्यांना आरोग्य माहिती आहे त्यांना आहारशास्त्राची माहिती नाही. ज्या डाएटीशियनना आहारशास्त्र माहिती आहे, त्यांना आरोग्याची काहीही कल्पना नाही. आणि जिम इन्स्ट्रक्टरना फक्त प्रोटीन डाएट खपवणे एवढेच माहिती. बाकी त्यांना ओकी ठो माहिती नाही. पण आयुर्वेद तज्ञांना त्यांच्या सिलॅबसमध्ये दोन्ही शास्त्र शिकवली जातात. हेच आयुर्वेदाची प्लस बाजू.
आयुर्वेदात आहाराविषयीचे एक अत्यंत मह्त्त्वाचे सूत्र सांगितले जाते, ते म्हणजे “भूक असेल तेव्हा जेवावे, नसेल तर खाऊ नये.” या सूत्राचा आधार घेऊन असे निश्चित सांगता येईल कि दर दोन चार तासांनी भूक नसली तर अजिबात खाऊ नये.
गॅस पेटलेला असेल तरच वर अन्न शिजेल ना. गॅस पेटलेलाच नसेल तर ? चमचाभर पाणी सुद्धा गरम होणार नाही. बरोबर आहे ना ? भूक नसताना जेवले तर अजीर्ण होईल. मग जेवायचेच कशाला ? सकाळ असो वा संध्याकाळ दुपार असो वा रात्र भूक नसताना अजिबात जेवू नये.
आयुर्वेद म्हणतो, वेगान् न धारयेत्
वेगान प्रवृत्तयेत् ।
शरीराकडून निर्माण केलेला वेग अडवू पण नये, किंवा त्याच्या मुद्दाम विरोधात जाऊ नये.
मग आज असे उलटे आणि चुकीचे का सांगितले जाते ?
ते मी कसं सांगू? मी सांगितले तर ते चुकीचे होईल ना.
तो नास्ति मम अधिकारः ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.02.2017
Leave a Reply