नवीन लेखन...

टेक्नॉलॉजीय तस्मै नम: ; अर्थात जी.पी.एस.मुळे हरवलेला संवाद

टेक्नीॅलाॅजीमुळे जग जवळ आलंय. एका क्षणात इकडचा मेसेज साता समुद्रपार पोचतो आणि त्याचं उत्तरही त्याच वेगात येतं. पुर्वीची पत्र, त्यांना पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचं उत्तर येईपर्यंत पाह्याली जाणारी वाट, त्या वाट पाहीण्यातली अधीरता आता इतिहासजमा झालंय. आताच्या पिढीला अधीर ह्या शब्दाचा अर्थच कळणार नाही, कारण टेक्नाॅलाॅजीमुळे धीर हाच शब्द संपलाय, तिथे त्याचा विरूद्धार्थी शब्द कसा जगायचा..!

व्हाट्सॲप, ट्विटर, फेसबूक यामुळे दुरदूरची माणसं जोडली गेली हे खरं असलं तरी जवळच्या माणसांमधला संवाद तुटला. शेजारी असलेल्या माणसांशी सरळ बोलून संवाद साधण्यापेक्षा दूरवर असलेल्या कुठल्यातरी (बऱ्याचदा अनोळखी) माणसाशी टायपील संवाद साधण्याच्या प्रयत्नात आपण सारेच असतो. हल्ली यात तरुण, प्रौढ किंना वय झालेले असा भेद नसतो. घरोघरी हेच दृष्य दिसतं. कुटूंबातील सर्व वयाचे सदस्य आपापल्या मोबाईलमधे डोकं घालून आणि कानात इअरफोनचे बोळे खुपसून तिसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीशी संवाद साधत बसलेले दिसणं आता आम बात है..

संवाद या मराठी शब्दासाठी आपण Communication अश्या इंग्रजी शब्दाच प्रयोजन करतो. Communication वरून Community शब्द आलाय किंवा उलट असाव. संवादामुळे समाज बनतो किंवा एकत्र येतो. आपला आपापसातला थेट संवाद तुटल्यामुळे आपला समाज तुटलाय का, अस वाटण्यासारखी परिस्थिती आलीय असं मला वाटतं. यावर बरंच काही लिहिलंही गेलंय, ते सर्वांना मान्यही आहे, पण त्यात बदल करायची कुणाचीच इच्छा नाहीय..किंवा आता बदलणं शक्य होत नसेल, असाही असू शकेल. किंवा कदाचित दृष्टीआड आहे त्याचं माणसाला जबरदस्त आकर्षण असणं, ह्या माणसाच्या आदीम प्रेरणेमुळे तसं होत असावं, कुणास ठावूक..अर्थात, असं दूरस्थ व्यक्तीचं आकर्षण नंतर अनेक प्रकारच्या नात्यात बदलू शकतं, हा भाग अलाहीदा..!!

टेक्नाॅलाॅजीच्या अशाच एका अविष्कारामुळे आपल्याला संवादाचा निखळ आनंद देणाऱ्या आणि समृद्ध करणाऱ्या अनुभवाला आपण सारे मुकत चाललोय. ही टेक्नाॅलाॅजी आहे जीपीएसचीं. आणि आपण मुकतो आहोत तो आनंद म्हणजे ‘पत्ता विचारण्याचा’..!

हल्ली जीपीएस यंत्रणमुळे आपण न चुकता आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचत आहोत. आजण जाणार असलेल्या ठिकाणचा मुख्य मार्ग, त्यावरील ट्राफिक, प्रवासाला लागणारा मार्ग, त्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असणारे अन्य पर्यायी मार्ग अशी सारी सारी माहिती आपल्याला जीपीएसमुळे आपल्या हातातल्या एवढ्याश्या स्मार्ट कौतुकात क्षणार्धात उपलब्ध होते. हे कमी म्हणून की काय किंवा आपल्या इथल्या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण झालेल्या आपल्या आकलन क्षमतेवर दांडगा विश्वास म्हणून की काय, प्रवासाला निघताना मॅपमधली ती जीपीएसवाली बाई (बुवाही असतो, पण बाईच बरी वाटते. घरच्या सुचना ऐकायची सवय असल्यामुळे चुकायची हिंम्मतही होत नाही.) आपल्याला इकडे वळा, तिकडे वळा, सरळ चला किंवा मागे फिरा आणि मग वळा अशा इंग्रजीत स्पष्ट आवाजात सुचनाही देत असते. येवढं सगळं असताना, आपण मुद्दाम ठरवूनही चुकू शकत नाही(येवढं असुनही चुकणारे महाभाग आहेतच.)..तशी चुक केलीच, तर ती बायकोसारखं न चिडता(इथं जीपीएसवाली बाई उगाचंच आवडू लागते.) पुन्हा रस्ता सांगायला तयार असते. तिला कसंही करून आपल्याला आपल्या इच्छित स्थळी पोचवायचंच असतं..

परंतु काही वर्षांपूर्वी ही यंत्रणा आतासारखी सर्वांना सहज उपलब्ध नव्हती. त्यावेळी आपल्या इच्छित ठिकाणच्या भागात गेल्यावर मग एखाद्या रस्त्यावरची एखादी इमारत शोधणं म्हणजे अवघड असायचं. बरं, पत्ता देणारेही ‘तिकडे कुणालाही विचारा, घरात आणून सोडतील’ असं छाती ठेकून सांगायचे, त्यामुळे आपणही डिटेल पत्ता घेण्याकडे दुर्लक्ष करायचो. तिकडे गेल्यावर मग पंचईत व्हायची. अशावेळी तिथल्याच एखाद्या व्यक्तीला पत्ता विचारण्याशिवाय पर्याय नसायचा. ‘तिकडे कुणालाही विचारा, घरात आणून सोडतील’ असं म्हणणाऱ्याना खरं तर शेजारीही फारसं ओळखत नसतात, ही महानगरांतील कथा किंवा व्यथा आहे..आपल्याला आपलं उगाच वाटत, की आपल्याला सर्वजण ओळखतात म्हणून..

असो. एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपल्याला हवा असलेला पत्ता विचारणं आणि तो त्यानं सांगण, ही मजेची गोष्ट असते. ही मजा घेता आली पाहिजे मात्र. अपरिचित माणसा-माणसामधील थेट संवाद काय काय आनंद देऊ शकेल, याचं हे संवाद म्हणजे उत्तम उदाहरण. पत्ता समजवून सांगणाऱ्यांच्याही अनेक तऱ्हा असतात. काही जण कटकट नको म्हणून सरळ ‘पता नही’ सांगून उडवून लावतात. ह्यांची संख्या खूप कमी. बरेचजण हातातलं काम सोडून आपल्याला पत्ता सांगायचा प्रयत्न करतात. काहीजण खुप वेळ विचार करुन, ‘नाही बुवा सांगता येत’, असं सांगतात. हे प्रामाणिक असे म्हणता येतील. त्यांना विचार करुनही पत्ता लक्षात येत नसतो. काहीजण त्या पत्त्यावर तिकडच्याच दोघा-तिघांमधे आपापसात, आपल्याला हवा असलेला पत्ता नेमका कुठे असेल याची चर्चा करतात. त्यांचं एकमत होत नाही. किंबहूना आपल्याला हव्या असलेल्या पत्त्याबाबत त्यातील सर्वांची विरुद्ध टोकाची मतं असतात. ‘मग तो, तो तर नाही ना?’, अशी आपापसांत नेत्रपल्लवी करून त्या पत्त्यावर राहाणाऱ्या त्या ‘अंदाजे’ माणसांबद्दल बरी-वाईट चर्चा होते. त्यांची चर्चा ऐकून आपणच गोंधळतो व पुन्हा एकदा पत्त्याकडे पाहातो आणि आपणच चुकीच्या जागी आलो तर नाही ना, याची खात्री करुन घेऊ पाहातो. त्यांची चर्चा चालूच राहाते आणि त्यातून आपल्याला नको असलेल्या अनेक गोष्टी आपसूक कळतात आणि मनोरंजनही होते. शेवटी त्यातल्या ज्याचा आवाज मोठा असतो, तो सुत्र हाती घेतो आणि बाकीचे कसे खुळे आहेत ते सांगून आपल्याला जायच्या ठिकाणचं डायरेक्शन देतो.हे बऱ्याचदा चुकीचं निघतं.

मला सर्वात आवडतात ते नंतरच्या प्रकारचे लोक. हे लोक हातानेच हवेत नकाशा काढून कुठे डावीकडे आणि कुठे उजवीकडे वळायचं, ते हवेतच तसे हातवारे करून दाखवतात. ते प्रामाणिकपणेच सांगत असतात, फक्त आपल्या समोर उभं राहून ते सांगत असल्यामुळे होणारा मिरर इफेकट आपण लक्षात घेऊन, ते सांगतात त्याच्या बरोबर उलट करायचं लक्षात ठेवायची, मगच आपल्याला इच्छीत स्थळी पोहोचता येतं. काहीजण तर थेट आपल्याला जायचं त्या ठिकाणी नेऊन सोडतात. काहीजण कुठे वळायचं नाही, हेच जोर देऊन सांगतात आणि नकारार्थीच लक्षात ठेवायच्या आपल्या जन्मजात सवयीमुळे, आपण वळायचं नाही नेमके तिथेच वळतो आणि चुकतो. अर्थात त्यामुळे त्या परिसराची माहिती होते, हे ही काही कमी नाही. अर्थात हे शहरातलं झालं, इथे आपल्याला बोलायची फारशी संधी मिळत नाही, फक्त ऐकण्याचंच काम करायचं असतं, पण ते ऐकणंही आपल्या ज्ञानात भर घालणारं असतं. पत्ते सांगणारांची ढब तर येवढी विविध असते की नुसतं बघत आणि ऐकत राहावं. अर्थात हे माझं मत झालं. ढब काही असो, त्यांची अमोळखी माणसाला मदत करायची इच्छा मात्र त्यातून मला दिसते..

ग्रामिण भागात तर आपण आणखीनच समृद्ध होतो. खरा संवाद इथे होतो. आपलं पोहोचायचं ठिकाण जवळ आलं असावं असा अंदाज घेऊन, गाडी थांबवून निवांत एखाद्या टपरी टाईप हाटेलापाशी थांबावं. तिथे नेहेमी दोन-चार गांववाले निवांत बसलेले असतातच. त्यांना आपल्याला जायचं असलेल्या व्यक्तीचा पत्ता विचारावा. गांवच्या ठिकाणी पत्ता विचारावा तर पंचाईत ही असते, की आपल्याला हव्या असलेल्या नांवाच्या दोन-चार व्यक्ती तरी नक्की सापडतात. उदा. संजय पांडुरंग सावंत. आमच्या गांवाकडे एकाच ठिकाणी चार-पांच संजय आणि दोन-चार पांडुरंग सहज सापडतात. मग पांडुरंगाच्या संजयचा शोध घेताना दोन जन सापडतात. मग तिसरी चाळणी लावली जाते आणि त्या संजयच्या कामधंद्याची चवकशी केली जाते आणि मग आपल्या हवी असलेली व्यक्ती कोण, ते त्यांच्या लक्षात येतं आणि तिकडे कसं जायचं ते सांगीतलं जातं. मग त्या वडाकडे वळा, पुढे एक आंबा दिसेल तिथपासून पुढे जायचं आणि जांभळीणीच्या दारातच त्यांच घर आहे, अशा खुणा सांगीतल्या जातात.

इथे माझ्यासारखा शहरी माणूस बाचकळतो. वडाला पारंब्या असतात या जनरल नाॅलेजमुळे वडाकडे वळायचं कळतं, पण आंबा आणि जांभळीन कशी काय ओळखायची, याचा गोंधळ होतो. बरं ती झाडंही प्रयत्नाने ओळखता येतात, पण मग सारखी तिच झाडं दिसू लागतात असा पूर्वानुभव असतो. आपल्या चेहेऱ्यावरचा गोंधळ गाववाल्यांच्या लक्षात येतो नि मग त्यांच्यातलाच एकजण , ‘चला पावण्यानू सोडतंय तुमका’ म्हणून बरोबर येतो. दरम्यान त्यांनी स्वत:ची ओळख करून दिलेली असते, आपण कोण, आपलं आणि जो कोणी संजय पांडुरंग आहे त्यांचं नातं काय, त्याच्याकडे काम काय याची सर्व चौकशी सहजपणे आणि आपुलकीने केलेली असते, चहा-पाणी, बिडी-काडीची देवाण घेवाण झालेली असते आणि चार नविन ओळखी गाठीशी बांधून आपण तृप्त होऊन आपल्याला हव्या असलेल्या पांडुरंगाच्या संजयकडे निघालेलो असतो..

जीपीएस आलं आणि हा आनंद आपण गमावला. बंद एसी गाडीत जीपीएसवाल्या बाईच्या निर्जीव सुचना ऐकत डावी-उजवी घेत जायचं आणि थेट मुक्कामावर पोहोचायचं, हेच सर्रास होताना दिसतं. पत्ता शोधताना दोन-चारदा तरी चुकायचं आपण आता विसरत चाललोय आणि त्यामुळे शिकायचंही. चुकल्याशिवाय शिकता येत नाही, हे ही आपण विसरत चाललोय.

गोष्ट अगदी परवाचीच. माझ्या मुलीला विहार लेकनजीकच्या सेन्टरवर सोडायला गेलो होतो. रस्ता माझ्या तसा परिचयाचा पण बराच काळ गेलो नसल्याने बराच बदल झालेला लक्षात येत होतो. परीक्षा सकाळी ९ची असल्याने सात-साडेसातलाच घरातून निघालो होतो. जाताना मुलीला वाटेतल्या सर्व खुणा दाखवत जात होतो. दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणीचा त्याच सेन्टरवर पेपर होता. माझी मुलगी आदल्याच दिवशी तिकडे गेली असल्यामुळे, मैत्रिणीने मुलीला कसं जायचं ते विचारण्यासाठी फोन केला. मी कान देऊन ऐकू लागलो, की आता ही काय सांगतेय म्हणून. मुलीने सरळ सांगितलं, की ‘ ओला कर नी जा”. अर्थात हे ह्या पिढीच्या विचारसरणीशी सुसंगतच होतं म्हणा. मला आपलं उगाचच वाटतं होत. की तिला आदल्याच दिवशी सांगितलेल्या खुणा ती तिच्या मैत्रिणीला सांगत, कसं जायचं, ते सांगेल म्हणून..जीपीएसमुळे आजूबाजूच्या परिसराची नोंद घेत जाणं साम्पालाचानी आपलाच परिसर आपल्याला अनोळखी झालाय हे मात्र खरं, त्यामुळे आपल्या परिसरात होणारे बदल लक्षात येईनासे झाले..जग सोपं झाल आणि तेवढच ते समजणं कठीण..

चालायचंच. टेक्नॉलॉजीय तस्मै नम:

— @नितीन साळुंखे
9321811091

१३ मार्च २०१८

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..