कृपया सोबतचे गणपतीचे सर्व फोटो जरूर पाहावेत
दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली. मग साहजिकच जास्तीतजास्त गर्दी जमविण्यासाठी भव्य आणि प्रचंड खर्चिक देखावे, फिल्मी अभिनेत्यांची हजेरी, किती सोने / चांदी / पैसे जमले याची वृत्तवाहिन्यांवर सचित्र चर्चा, नवसाला पावण्याच्या बातम्या, राजा – महाराजा – सम्राट -अशा बिरुदावल्या- अशा गोष्टी आता तर वाढत चालल्या आहेत. मूर्तीचे सहज होणारे दर्शन कडेकोट पडदे लाऊन बंद केले जाते आणि त्यामुळे नंतर दर्शनासाठी भक्तांची लागणारी प्रचंड रांग ही त्या गणपतीची लोकप्रियता ठरविते. या सगळ्या व्यापारात आता खुद्द गणपतीबाप्पालाच ओढायला सुरुवात झाल्यामुळे विचित्र परिस्थिती दिसायला लागली आहे.
लोकांच्या प्रबोधनासाठी गणपतीच्या सजावटीमध्ये त्या त्या काळातील प्रचलित विषय येणे योग्य आहे. पण खरेतर अशा सजावटीतून गणेशाची मूर्ती मात्र दूर ठेवायला हवी. खुद्द गणेशाच्या मूर्तीबद्दल काही कडक पथ्ये पाळायला हवीत. प्रसिद्ध व्यक्ती, एखादा नेता – खेळाडू – अभिनेता यांच्या रूपात गणेश मूर्ती तयार करणे, दिवसागणिक सडत जाणाऱ्या भाज्या, फळे , पाने, तडकणारे नारळ यांच्या गणेश मूर्ती बनविणे, कुठल्यातरी वस्तू मांडून अट्टाहासाने गणपतीसारखा आकार निर्माण करणे अशा गोष्टी आता वाढतच चालल्या आहेत. नाविन्यपूर्ण रचना आणि स्टंट या गोष्टीतील सूक्ष्म फरक जपायला हवा. कलात्मकता, नावीन्य, वेगळेपण साधतांना धार्मिक परंपरा जपणे सर्वात महत्वाचे आहे. कलावंतांची सृजनता आणि धार्मिक पावित्र्य याचा समतोल ढळायला लागला आहे असे वाटते . केवळ गर्दी खेचण्यासाठी किती वाहवत जायचे ? मागे एकदा एड्स विरोधी जागृतीसाठी कुटुंबनियोजनाच्या साधनांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला होता. असा विचित्रपणा आता फारसा दुर्मिळ राहिलेला नाही. ज्या गणेशाची कृपादृष्टी आपल्यावर पडावी असे वाटते त्याचीच डोळ्यांना गॉगल लावलेली मूर्ती, वीरप्पन सदृश पेहेरावातील मूर्ती, सेल्फी काढणारे शंकर-पार्वती-गणपती कुटुंब ,पाहून आनंदाऐवजी खिन्नता येते. .. काय हे ? सोबतचे सर्वच फोटो पाहा म्हणजे आपण किती वाहवत जाऊ लागलो आहोत त्याची थोडी कल्पना येईल.एकदा इतपत पाहण्याची सवय झाली की पुढे कदाचित काहीही पाहावे लागेल. आपल्या सणांबाबत आपणच काही किमान बंधने तरी पाळायला हवीत.
वर्गणीवरून वादविवाद, श्रींचे दणक्यात आगमन, १० दिवस डीजेवर भयंकर गोंधळ, मांडवातील ( कथित) गैरप्रकारांची होणारी चर्चा, मूर्तींच्या प्रचंड आकारावरील चर्चा, गर्दीत किती मोबाईल आणि सोनसाखळ्या चोरीला गेल्या त्याची आकडेवारी, गणपतीमुळे हवेच्या – ध्वनीच्या – पाण्याच्या प्रदूषणाच्या रंगविल्या जाणाऱ्या चर्चा, विसर्जनाचा गदारोळ इत्यादी गोष्टी ह्या दरवर्षी चर्चिल्या जातातच. त्यामुळे वातावरणात थोडासा पुरोगामीपणा येतो. कारण अशा टीकात्मक चर्चा फक्त हिंदू सणांच्या बाबतीतच करता येतात हे आपण लक्षात घ्यायला हवे.
पण आपण गणेश मूर्तीला तरी निदान यात न ओढता त्याचे पावित्र्य आणि या सणाचे मांगल्य जपू या !
— मकरंद करंदीकर
अंधेरी ( पूर्व) मुंबई-४०००६९.
Leave a Reply