नवीन लेखन...

पेशींच्या राज्यात रमणारी – डॉ. आसावरी कोर्डे – काळे

मागील शतकातील दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि नंतर विज्ञान संशोधनात झपाट्याने वाढ होऊ लागली ती प्रामुख्याने लष्करी गरज आणि वर्चस्वासाठी. या संशोधनातून विज्ञानाच्या विविध नवीन शाखांचा जन्म झाला. कालांतराने लष्करी गरज कमी झाली तरी मानवी आरोग्य, स्वास्थ्य आणि वैद्यकिय कारणास्तव हे संशोधन नवीन जोमाने सुरूच राहिले. या नवीन शास्त्रात सूक्ष्मजीवशास्त्र आणि जीव रसायन शास्त्रांचा समावेश होता. हे दोन्ही शास्त्र गळ्यात गळे घालून फिरणाऱ्या जुळ्या बहिणीसारख्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. जीव शास्त्रातील संशोधन तसे मेहनतीचे आणि चिकाटीचे. अनेक संशोधकांनी अथक प्रयत्न करून या विषयात क्रांती घडून आणली आणि हे शास्त्र लोकप्रिय केले.  या मध्ये प्रामुख्याने नुकतेच निधन पावलेले रसायन शास्त्रातील नोबल पारितोषक विजेते डॉ. आयर्विन रोझ यांचा उल्लेख करावा लागेल.

मागील शतकातील सत्तरीच्या दशकात सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास विद्यापीठ पातळीवर सुरु झाला. त्याचवेळी युरोप आणि अमेरिकेमध्ये या शास्त्रांच्या विशेष उपशाखांचा जन्म झाला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर जैविक भौतिकशास्त्र, जैविक तंत्रज्ञान, [बायो टेक्नॉलॉजी], जैविक माहिती तंत्रज्ञान, जीवसंगणकीय शास्त्र, सेल बायोलोजी, मोलेक्यूलर बायोलोजी, जेनेटिक इंजिनिअरींगचे आणि नॅनो टेक्नॉलॉजी, अशा विविध आधुनिक शास्त्रांचा उच्च पातळीवर संशोधन आणि अभ्यास सुरु होऊन काळ लोटला होता. या शतकाच्या सुरवातीपासून सूक्ष्मजीव शास्त्रांचा आपल्याकडे झपाट्याने वाढ होऊ लागली आणि बायो टेक्नॉलॉजी हा विषय अभ्यासक्रमात आला. सहाजिकच वर्ष २००० नंतर परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याच्यात वरील विषय संदर्भात आकर्षण निर्माण झाले होते. ठाणे शहरातील चरई भागातील जुने रहिवासी असणाऱ्या कोर्डे कुटुंबापैकी रजनीकांत आणि अनुराधा कोर्डे यांची मुलगी डॉ आसावरी कोर्डे हिने सहाजिकच आपल्या उच्च शिक्षणासाठी मोलेक्यूलर बायोलोजी हा विषय निवडला होता.

शिवसमर्थ विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या आसावरीने दहावीची शालांत परिक्षा झाल्यावर जिज्ञासाच्या हिमालयन साहस शिबिरात भाग घेतला होता. मुलुंडच्या केळकर – वझे महाविद्यालयातून बायो टेक्नॉलॉजी विषयात २००५ साली पदवी परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर  तिने  २००७ साली मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एमएससी पदवी प्राप्त केली. आसावरीला  एमएससी चा अभ्यास करताना इन्स्टिट्यूट तर्फे कोलकत्ता विद्यापीठाच्या सेंटर ऑफ अॅडव्हान्स स्टडी इन सेल अॅण्ड रिसर्च  या विभागात सूक्ष्म ते आण्विक [मोलेक्यूलर] स्तरीय क्रोमोझमचे विश्लेषण या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्या नंतर तिने वर्सोवा अंधेरी येथील राष्ट्रीय मत्स्य शैक्षणिक आणि संशोधन केंद्रात प्रगत मोलेक्यूलर बायोलोजीच्या सहाय्याने एका विशिष्ट जातीच्या मास्यांवर प्रयोग केले. नियमित व क्रमिक सदिश सूत्रांची निर्मिती करून त्याच प्रजातीपासून ट्रान्सजनिक मास्यांच्या प्रजाती तयार केल्या असता त्या अधिक सक्षम असल्याच्या तिला आढळून आल्या .

२००८ साली आसावरीने अमेरिकेतील लुईझिया विद्यापीठात बायो केमिस्ट्री आणि मोलेक्यूलर बायोलोजी या विषयात डॉक्टरेटसाठी प्रवेश घेतला. यासाठी तिला टाटा इन्स्टिट्यूटची शिष्यवृत्ती मिळाली होती. पुढे लुईझिया विद्यापीठाची शैक्षणिक शिष्यवृत्तीपण मिळाली. हे दोन्ही विषय जीवसंस्थेतील पेशींचा अभ्यास अतिसूक्ष्म मोलेक्यूलर पातळीवर करतात. अतिसूक्ष्म पातळीवर अभ्यास करताना असंख्य माहिती आणि आकडेमोडी गोळा करावी लागते. यामुळे बायो इन्फोटिक्स  आणि जीवसंगणकिय शास्त्रांचा पण अभ्यास करावा लागतो.

आसावरीचा पीएचडीचा विषय जास्त गुंतागुंतीचा होता. सगळ्याच सजीव संस्थेत एकपेशी पासून असंख्य पेशी असू असतात. आपल्या शरीरातील विविध अवयव आणि इंद्रियात कोट्यावधी पेशी असतात. या पेशींमध्ये प्रथिने [प्रोटीन] हा प्रमुख रासायनिक घटक असतो. पेशींच्या नवनिर्माणात आणि नष्ट होण्यात प्रोटीनचा मोठा सहभाग असतो. ह्या प्रोटिन्सना निर्माण करण्यासाठी डीनए आणि त्यापासून तयार होणारे आरएनए या न्यूक्लिक असिड चा उपयोग होतो. डीएनए हा प्रोटीन बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा घटक आहे. परंतु प्रत्यक्ष प्रोटीन बनविण्यासाठी ५% च डीएनएचा उपयोग होतो. परंतु आता संशोधनानंतर असे लक्षात आले आहे कि उरलेले ९५% डीएनएचा भाग सुद्धा प्रोटीन बनविण्याच्या प्रक्रियेत उपयोगी पडतात. डीएनएचा जो भाग आरएनए बनविण्यासाठी वापरला जातो त्याला जनुके [जीन्स] असे म्हणतात. त्याच बरोबर आरएनएचा एक भाग असलेले ट्रान्सफर आरएनए सुद्धा प्रोटीन निर्माण करण्यात मोठा हातभार लावतात. या प्रकारचे आरएनए बनविणारे डीएनए [जीन्स] हा आसावरीच्या पीएचडीचा संशोधनाचा विषय होता.

तिच्या संशोधनातून असे स्पष्ट झाले की ना की फक्त ट्रान्सफर आरएनए पण त्यांचे मूळ असलेल्या जीन्सची केवळ डीएनएवरची जागा बाजूच्या प्रोटीन बनवणाऱ्या जीन्सना नियंत्रित करतात. हे नियंत्रण जर नष्ट झाले तर एकतर ती पेशी मृत पावते किंवा तिची अनावश्यक कार्यक्षमता वाढते. यालाच ट्रान्सफर आरएनए पोसिशन इफेक्ट म्हणतात. असेच काहीसे कॅन्सेरच्या बाबतीत होत असते. पीएचडीचा अभ्यास करीत असताना आसावरीने तिच्या विषयाशी निगडीत असलेली विविध कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात केली. यीस्ट परिवर्तन व तपासणी, प्रथिने जीवरसायन तंत्रज्ञान , प्रथिने उत्पादन तंत्रज्ञान, पेशीय विश्लेषण याचा समावेश आहे. अमेरिकन सोसायटी फॉर सेल बॉयोलोजी आणि  मोलेक्यूलर बायोलोजी सारख्या महत्वाच्या अधिवेशनात आपले संशोधन प्रबंध आसावरीने सादर केले आहेत तसेच व्याख्यानेपण दिली.

मानवाशी थोडीफार जैविकदृष्ट्या जवळीक उंदरांवर अभ्यास करण्यासाठी आसावरीने पीएचडी नंतर न्युयॉर्क एथील कोल्ड स्प्रिंग हारबोर लॅबोरेटरीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले. तिथे तिने उंदरानमधील मोलेक्यूलर सिस्टिम आणि जननशास्त्र [जेनीटिक्स] याचा अभ्यास केला.

आसावरी सध्या येल स्कूल ऑफ मेडिसिन, कनेक्टिकट न्यू हॅवन येथे पोस्ट डॉक्टरेट करीत आहे. तिचा सध्याचा विषय हा फुफुसाच्या कॅन्सरशी निगडीत आहे. म्हणूनच तो अतिशय महत्वाचा आहे. अगोदर म्हटल्याप्रमाणे ९५% जीन्सच्या मधून सूक्ष्म आरएनएचा शोध लागला. निसर्गातच पेशीमध्ये असलेले हे सूक्ष्म आरएनए टयूमरला आळा घालतात असे दिसून आले. आज टयूमर नष्ट करण्यासाठी औषधे किंवा ऑपरेशन करावे लागते. हे काम पुढील काळात पेशीतील सूक्ष्म आरएनएच्या सहाय्याने अधिक कार्यक्षमतेने करता येईल. परंतु त्या अगोदर पेशींमधील या संपूर्ण यंत्रणेचा सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. आसावरीसारखे अनेक तरूण शास्त्रज्ञ  यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

सुरेन्द्र दिघे
surendradighe@gmail.com

सुरेंद्र दिघे
About सुरेंद्र दिघे 11 Articles
श्री सुरेंद्र दिघे हे ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या जिज्ञासा या संस्थेचेही विश्वस्त आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..