नवीन लेखन...

फणस (लघु कथा)

महादू कोकणातला एक गरीब कष्टकरी शेतकरी. गावातील  जमीनदारांकडे बाग शिंपणे, लाकूड तोडणे तसेच इतर कष्टाची कामे करून  आपले घर चालवीत असे. त्याची स्वतःची पण थोडीशी बाग होती. काही नारळ आंबा फणस अशी झाडे होती. थोडासा भाजीपाला पण त्याने लावला होता. महादुकडे दोन दुभत्या म्हशी होत्या. दिवस भर इतर कामे केल्यावर संध्याकाळी तो सायकल वर दुधाच्या बरण्या अडकवून शहरात दुधाचे रतीब घालत असे. महादूच्या घरी त्याची म्हातारी आई, बायको व दोन मुलगे, धाकटा अविवाहित भाऊ भिवा,असा परिवार होता, महादूचे वडील त्याच्या लहानपणीच निवर्तले होते त्यामुळे महादुला लवकर मोठेपण आले होते. महादूचे गाव तळ कोकणातील  डोंगराच्या कुशीत  वसलेले. गावाची वस्ती पण कमी व विरळ.  गावात अजून सगळीकडे वीज आली नव्हती. काही ठराविक घरातून विजेचे दिवे दिसायचे.  शहरातून गावात येणारा रस्ता नागमोडी वळणांचा व चढणीचा, वाहनांची कसोटी पाहणारा. शहरात बाजार राहाट करून खेड्यात परतणारया माणसांची हा रस्ता दमछाक करी, सायकल स्वाराना हातात सायकल घेऊन चालावे लागे. गावात बहुतेकांकडे सायकल हेच मुख्य वाहन असायचे. गाव मुळात घाट रस्त्यात वसलेले असल्याने एका बाजूला डोंगर तर दुसरया बाजूला उतारावर घरांची रचना.  रस्त्या वरून वस्तीकडे  जाण्यासाठी एक दगडानी बांधलेली एक छोटीसी पायवाट उतरावी लागे.कोकणात याला घाटी म्हणतात. या घाटीतून प्रत्येकाच्या घरी नेणाऱ्या छोट्या पायवाटा होत्या. अशीच एक वाट महादूच्या घराकडे जाई.

मे महिन्यातील ती एक संध्याकाळ होती. सूर्यास्त केव्हाच होऊन गेला होता. महादू नेहेमी प्रमाणे दुधाचे रतीब घालायला गावात गेला होता. महादूची बायको पार्वती स्वयपाक घरात जेवणाची तयारी करीत होती एका चुलीवर भाकऱ्या भाजीत होती तर दुसरीकडे रस्सा शिजत होता. महादूची दोन्ही मुले खळ्यात खेळत होती. तर खळ्यात टाकलेल्या बाकावर  बसून महादूचा धाकटा भाऊ भिवा व  महादूची म्हातारी आई  गप्पा मारीत होती. महादूच्या आईचे गप्पामध्ये फारसे लक्ष नव्हते ती महादूच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. महादूच्या खळ्यातून घाटाचा नागमोडी रस्ता दूर पर्यंत दिसे. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाचे, तसेच रस्त्य्वरून माणसांच्या बोलण्याचे आवाज महादूच्या घराच्या पडवीत ऐकू येत असत. महादूच्या येण्याची चाहूल त्याची सायकल घाटीत येताच लागत असे.आज महादूला यायला आज जरा उशीर झाला होता, महादूच्या आईला काळजी वाटत होती.ती महादूच्या वाटेकडे डोळे लाऊन बसली होती.महादूच्या घरात अजून वीज आली नव्हती त्यामुळे कंदील पेटले होते. छोट्या चिमण्या, दिवे लागले होते. आज अमावस्येचा दिवस असल्याने सर्वत्र मिट्ट काळोख होता. त्यातच वारे पण सुटले होते त्यामुळे झाडांच्या फांद्या हलत होत्या व त्याची सळ सळ ऐकू येत होती. गावातून येणारी बस किंवा इतर वाहन  घाटातून जाताना त्याच्या आवाजाने वातावरणातील शांततेचा भंग होई, हेड लाईट चा प्रकाश सर्वत्र पसरे.

“महादुक आज खूप उशीर झालो नाय रे” ? महादूची आई भिवाला म्हणाली.

“अगे  गजाली मारीत बसलो असतलो. पण तू कित्या काळजी  करतस तो काय आता लहान हा “ भिवा म्हणाला.

“तसा नाय रे पण आज अवस असा ना उगाच उशीर कित्याक करुचो” महादूची आई म्हणाली.   अशा प्रकारे त्यांच्या गप्पा चालू असतानाच अचानक रस्त्याच्या दिशेने काहीतरी पडल्याचा  आवाज ऐकू आला व कोणाच्या  तरी ओरडण्याचा, हाका मारण्याचा आवाज ऐकू आला. महादूची आई व भिवा दचकले. खळ्यात खेळणारी मुले पण घाबरली.

“ कोण तरी पडला वाटता मी बघतय”  भिवा म्हणाला आणि कंदील घेऊन तो घाटी चढून रस्त्याच्या दिशेने निघाला. रस्त्यावर जाताच भिवा हादरला. कंदिलाच्या प्रकाशात त्याला दिसले ते दृश्य मोठे भयावह होते. महादू रस्त्यावर पडला होता, त्याच्या अंगावर सायकल पडली होती. दुधाचे रिकामे कॅन व बाजारातून खरेदी केलेल्या सामानाच्या पुड्या रस्त्यावर इतस्थः पसरल्या होत्या. भिवाने पुढे होऊन महादूच्या अंगावरून सायकल उचलली,  बाकीचे समान गोळा केले, महादूचे डोळे भयप्रद व विस्फारलेले दिसत होते. अंग गरम जाणवत होते व थंडीने हुड हुडी भरावी तसा तो कापत होता. तो काही तरी पुट पुटत होता. “ काय झाला महादू असो कसो पडलंस ?  बरा वाटना नाय का तुका ?” महादुला रस्त्याच्या मधून बाजूला घेत भिवाने विचारले पण महादूचे लक्षच नव्हते. त्याची नजर रस्त्याच्या कडेला असणऱ्या वडाच्या झाडाकडे काहीतरी शोध घेत होती.”अरे महादू थय कोण हा? आणि असो पडलस कसो ?”  भिवाने परत महादुला गदा गदा हलवत विचारले. त्यावर अस्पष्ट पणे महादू बोलला   “माका जयराम दिसलो त्या बाजूक गेलो हा” आणि त्याने वडाच्या झाडाच्या दिशेने हात दाखवला आणि त्याची  शुद्ध हरपली. भिवाने त्या दिशेला पाहिले त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक मोठे वडाचे झाड होते त्याच्या पारंब्या वाऱ्या मुळे हलत होत्या. महादू सांगत होता तसा कोणी माणूस मात्र तिथे नव्हता. काय करावे ते भिवाला सुचेना. महादूची  अवस्था पाहून भिवाने मदती साठी हाका मारल्या. भिवाची हाक ऐकून आजू बाजूच्या घरातील लोकं  मदतीला आले.  सर्वांच्या मदतीने महादुला उचलूनच घरी आणले. महादूची बायको पार्वती स्वयंपाक घरातून बाहेर आली. मुले तर आपल्या बापाची अवस्था बघून घाबरून गेली होती. सर्वांनी मिळून महादुला माजघरात नेले. एक चटई अंथरून त्यावर महादुला झोपवले. महादूचे डोळे मिटलेले होते, अंग हुड हुडी भरावी तसे कापत होते, तोंडातून फेस आलेला जाणवत होता. महादूच्या बायकोने त्याला पाणी पाजायचा प्रयत्न केला पण त्याची दातखीळ बसली होती, त्याला पाणी पिता येईना त्याचे डोळे विस्फारलेले होते तो थोडासा कण्हत होता.

“ काय झाला रे भिवा  म्हादूक ?” महादुची आईने काळजीने भिवाला विचारले

“ आये, तो रस्त्यात पडलो होतो, तेच्या अंगार सायकल पडली होती माका म्हणालो की  तेका जयराम दिसलो काय तरी विपरीतच बोला होतो काय समजना नाय” “     भिवा म्हणाला.

“ अरे माझ्या कर्मा, बरोबर अरे आज अवस आसा ह्या खूप विपरीत दिसता माका गुरवांक बोलवक होया ” महादूची आई म्हणाली तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती.मदतीला आलेली शेजारी मंडळी पण जयरामचे नाव ऐकताच दचकले त्याला कारण तसेच होते कारण कारण जयराम जिवंत नव्हता. जयराम महादूचा मित्र होता. महादूच्या घरा पासून ४ मैलावर एक चिरयाची खाण होती. त्या खाणीत जयराम कामाला होता. मागच्याच महिन्यात अमावस्येच्याच दिवशी तो अपघात घडला होता. खाणीत काम चालू असताना एक मोठा दगड जयराम पहारीने हलवत होता पण त्याचा  अंदाज चुकला व तो दगड वेगाने घरंगळत त्याच्या दिशेने आला. खूप प्रयत्न करून पण जयराम स्वतःचा बचाव करू शकला नाही व त्या प्रचंड दगडा खाली त्याचे संपूर्ण शरीर सापडले. खाणीत आवश्यक त्या वैद्यकीय सोयी नव्हत्या. त्यामुळे जयरामवर लवकर उपचार होऊ शकले नाहीत. बैलगाडीतून त्याला शहरातील साकारी हॉस्पिटल  मधे नेताना तो गुरासाखा ओरडत होता.  हॉस्पिटल मध्ये पोचेपर्यंत त्याला मृत्युने गाठले होते. गावातील सर्वांनाच महादूच्या या अपघाती मृत्यूने धक्का बसला होता व बरेच दिवस त्याची चर्चा चालू होती. मात्र ही घटना घडली तेव्हा  महादू गावात नव्हता त्याच्या नात्यातील एका लग्नासाठी  तो जिल्ह्याच्या गावी गेला होता. गावात परतल्यावर त्याला जयरामच्या अपघाती मृत्युची  बातमी समजली होती.आपल्या मित्राचा अकाली व अनपेक्षीत मृत्यूने महादुला खूप वाईट वाटले व धक्का बसला होता. गेल्याच महिन्यात अमावास्येला ही घटना घडली होती आणि आजच महादुला जयराम दिसला होता……….

“माका वाटता महादू लवकर शुद्धीवर येवक होयो त्यासाठी डोंगरे डॉक्टरांका घेवन येतंय” भिवा काळजीने म्हणाला.

“डॉक्टराक बोलाव पण नाम्याक पण निरोप धाड. आज अवसेचो दिस नाम्याक बरोबर सगळा समजातला तेचो उपाय पण करुक होयो जयरामाचा नाव घेतल्यान ना ? ”  महादूची आई म्हणाली.

 

नंतर भिवा स्वतः गावातील डोंगरे डॉक्टराना बोलवायला गेला तसाच त्याने गावातील  नाम्या गुरवाला पण निरोप दिला. महादुला माजघरात एका सतरंजीवर झोपवले. त्याला घोंगडी पांघरली. त्याच्या शेजारी महादूची आई बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली.

**************

थोड्याच वेळात भिवा  डोंगरे डॉक्टराना घेऊन आला.  भिवाने येतानाच त्यांना घडलेला प्रकार थोडक्यात सांगितला होता, डॉक्टरानी महादुला तपासले. डॉक्टरांनी विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाला महादू उत्तर देत नव्हता. तो ग्लानीत असल्या सारखा वाटत होता. थोडासा कण्हत होता.

“डॉक्टर काय झाला म्हादुक “? भिवाने विचारले

“नीट निदान होत नाहीये. हार्ट बिट्स थोडे जलद पडताहेत. त्याला कसला तरी जबरदस्त धक्का बसला असावा असे वाटते व त्यामुळेच तो खूप घाबरलेला वाटतोय. आता तो पूर्ण शुदधित नाहीये.   मी एक इन्जेक्षन देतो व गोळ्या पण देतोय. ज्यास्त काळजीचे कारण नाही  माझ्या औषधाने बरे वाटेल त्याला. घाबरल्या सारखा दिसतोय सकाळ पर्यंत त्याला आराम पडेल असे वाटते. सकाळी त्याचे कसे आहे ते कळवा”” डॉक्टर म्हणाले.

डॉक्टराना सोडायला भिवा घाटी चढून रस्त्यावर गेला.रस्त्यावर डॉक्टरांची स्कूटर उभी होती. डॉक्टरानी भिवाला धीर दिला काही सूचना दिल्या आणि स्कूटरला किक मारली.डॉक्टरांची स्कूटर उतारावरून घाट उतरू लागली. ती दूर जाई पर्यंत भिवा तिथे थोडावेळ उभा होता. दादांशी स्कूटर दिसेनाशी झाल्यावर  भिवा घाटी उतरायला सुरवात करणार  तोच लांबून त्याला हातात कंदील घेऊन येणारी नाम्या गुरवाची आकृती दिसली. मग भिवा घाटीतच थांबला. चढावरून येताना नाम्याची दमछाक होत होती. घाटी जवळ येताच भिवा नाम्याला सामोरा गेला.चढाचा रस्ता चढून आल्यामुळे नाम्याला दम लागला होता. नाम्या गुरव गावातील महादेवाच्या मंदिराचा पारंपारिक पुजारी होता त्याच्या घराण्याकडे हा मान अनेक पिढ्यांपासून होता पांढरे स्वछ धोतर वरती मलमलचा पांढरा सदरा, कपाळाला गंध डोक्यावर पांढरी टोपी असा त्याचा वेश असे.गावातील लग्न कार्य इतर मंगल कार्य निर्विघ्न पणे पार पडण्या साठी देवापुढे गाऱ्हाणे घालीत असे. त्याला थोडी मंत्र विद्या पण अवगत होती.कोकणात भूतबाधा होणे, भुताने पछाडणे,भुताचा,आत्म्याचा  संचार असणे यावर लोकांचा गाढ विश्वास. त्यामुळे कोणाला काही  तशी बाहेरची बाधा झाली तर नाम्या ती ओळखत असे व  त्यातून पण त्या माणसाची सुटका करीत असे.नाम्या महादेवाचा पुजारी व त्यामुळे त्याला शंकराचे वरदान लाभले आहे अशी सर्वांची गाढ श्रद्धा होती, त्यामुळे नाम्या गुरवाचे गावात मोठे स्थान होते.

भिवाचे व त्याचे काही बोलणे झाले. नंतर भिवाने रस्त्यावर जिथे महादू  पडला होता ती जागा पण नाम्याला दाखवली. ज्या दिशेला जयराम दिसल्याचे महादू सांगत होता त्या वडाच्या झाडा कडे भिवा नाम्याला घेऊन गेला. बराच वेळ नाम्या वडाचे झाड व आजू बाजूचा परिसर निरखून बघत होता. अधून मधून तोंडाने काही तरी पुटपुटत होता आणि आकाशच्या दिशेने  बघत होता.भिवा त्याच्या कडे मोठ्या आदराने निरखून बघत होता.  अखेर नाम्याचे निरीक्षण संपल्यावर दोघेही घाटी उतरू लागले.

“ डोंगरे डॉक्टर येवन गेले ना ? माका दिसले वाटेत” नाम्याने भिवाला विचारले

“होय, डॉक्टरान म्हादुक तपासून औषध दिल्यानी.काळजीचा कारण नाय म्हणाले पण तुमका सांगलय ना की म्हादुक जयराम दिसलो, त्या वडाच्या झाडाकडे  आज अवसेचो दिस आयेक लय काळजी वाटता. तिका  वाटता की महादुक जायारामच्या भूतान धरल्यान हा’.  भिवा म्हणाला.

“बरोबर हा, डॉक्टरच्या, माणसाच्या, बुद्धी पलीकडचा काय तरी असता. तेचो अनुभवच येवक लागता.” त्यातून आज अवसेचो दिस. जयरामची काय तरी इच्छा असतली”

बोलता बोलता ते घराशी आले. महादूच्या घरात अजून माणसांची वर्दळ होती.भिवाने कंदिलाची वात बारीक केली व कंदील दांडीला अडकवला. नाम्या आता माजघरात म्हादू जिथे होता तिथे गेला. माजघरात एका सतरंजीवर महादू झोपला होता. त्याने घोंगडी पांघरली होती. महादूची आई  त्याच्या उशाशी बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत होती.महादूची मुले व शेजार पाजारची बायका मुले चिंतातूर पणे बाजूला उभी होती. नाम्या गुरव येताच महादूच्या बाजूला कोंडाळ करून बसलेली लोकं बाजूला सरकले.

“गुरावानु बरा झाला तुमी आलास ते. म्हादुक जयराम दिसलो असा तो सांगता. भिवान सांगल्यान ना सगळा तुमका ? म्हादुची आई म्हणाली. आता पण तिच्या चेहऱ्यावर भीती होतीच.

“चिंता कित्याक ? म्हादुक काय नाय जावचा तो सगळा नीट करतलो” वरच्या दिशेला हात दाखवत नाम्या म्हणाला आणि  म्हादूचे निरीक्षण करू लागला.

“  डॉक्टरांचे औषध घेऊन पण  महादूचे अंग आता सुधा थोडे थर थरत होते. त्याचा चेहरा पण थोडासा भेसूर दिसत होता. तो थोडासा कण्हत होता. डोळे निस्तेज व भकास दिसत नाम्याने त्याला नीट निरखून बघितले त्याच्या डोक्यावर हात ठेवला, व काही तरी मंत्र पुट पुटु लागला, साधारण अर्धा तास त्याचे मंत्र म्हणणे चालू होते  नंतर आपल्या पडशीतले  तांदूळ मंत्र म्हणत त्याने महादूवर टाकले. त्याला अंगारा लावला. त्याबरोबर महादू हातपाय झाडू लागला.त्याने डोळे उघडले त्याच्या तोंडातून अस्पष्ट अशी घर घर सर्र्वानाच ऐकू आली.”पाणी”  क्षीण स्वरात महादू बोलला.बर्याच वेळाने म्हादूचा आवाज ऐकू आला होता, महादूची आईला खुप बरे वाटले. तीने महादूच्या बायकोला पाणी आणायला सांगितले. महादुला उठवून बसवले. त्याला टेकायला उशी दिली.प्यायला पाणी दिले. महादू आता शुद्धीवर आला होता पण त्याचे डोळे विस्फारलेले होते त्यात भीती दिसत होती. अंगाची थर थर थांबली नव्हती. म्हदुच्या बायकोने जमलेल्या सगळ्यांसाठी चहा केला होता. सगळ्यांबरोबर महादूने पण चहा घेतला.

मग नाम्याने महादुला विचारले “महादू तू कोणाक बघालस मघाशी रस्त्यात ? आणि घाबरचा काय कारण ? नाम्याच्या प्रश्नावर महादू परत थर थरू लागला त्याचा चेहरा वेडावाकडा झाला तो दरवाजाकडे हात दाखवू लागला जणू त्याला दारात कोणी तरी दिसत होते. नाम्याने परत महादुच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला “ घाबरा नको महादू माका माहिती हा तू रस्त्यावरच्या वडाच्या झाडाकडे जयरामाक बघालस  ता माका सांग काय म्हणालो जयराम ?

“ रस्त्यावर नाय आपल्या दारात हा तो बघा   तेका फणस होयो  अस्पष्ट पणे  महादू बोलला आणि परत त्याने दाराच्या दिशेने हात दाखवला. महादूच्या या वाक्याने सर्वच घाबरले. दाराकडे बघू लागले. नाम्या मात्र न घाबरता दाराकडे गेला. मंत्र म्हणत त्याने हाताने अंगारा उडवला जणू त्याला पण कोणी तरी दिसत होते. नंतर थोड्या कडक आवाजात तो बोलला “ जयरामा तुका महादू फणस देतलो आता आमची वाट सोड”  आणि आकाशाच्या दिशेला बघत नाम्यापरत मंत्र म्हणू लागला. हे मंत्र पठण जोराने चालले होते. नंतर नाम्याने एक न सोललेला नारळ मागितला व तो मंत्र म्हणत महादूच्या अंगावरून ओवाळला नन्तर भिवाकडे तो नारळ देत म्हणाला “ह्यो नारळ घे आणि  झाडावरचो एक फणस काढ  महादू ज्या दिशेक हात दाखवत होतो त्या वडाच्या झाडाच्या दिशेक ह्यो नारळ व फणस  टाक, व काम झाला की मागे न बघता ये घरी येऊन हात पाय धू. सगळा नीट  जातला. काळजी नको.

 

*******

महादू त्या घटने नंतर दुसऱ्या दिवशी शुध्दी वर आला होता. अजून त्याची भीती पूर्ण गेली नव्हती. मात्र दोन तीन दिवसांनी तो नीट बरा झाला व आपली कामे पण करू लागला होता. आता त्याला सर्व काही नीट आठवत होते. त्यादिवशी महादुला नेमका काय अनुभव आला हे ऐकायला सर्व उत्सुक होते. नाम्या गुरव आला होता,शेजारी पण जमले होते. आणि महादू सांगू लागला…

“त्यादिवशी मी गावात नेहमी प्रमाणे दुधाचे रतीब घातलय,  बाजारात सगळा सामान खरेदी केलंय आणि मगे गावकरच्या हॉटेलात चाय घेवक वायच थांबलंय. थय माका गावातली बाकी माणसा भेटली. भरपूर गजाली झाले, विषय जयारामचोच होतो, सगळेजण खूप आठवणी काढत होते. तसो तो अख्या गावाचोच मित्र होतो. माका पण आठवला की माझ्या घरचो कापो फणस तेच्या खूप आवडीचा होतो. दर वर्षाक माझ्याकडून हक्कान मागुन घेवन जात होतो.  माका तो शेवटचो भेटलो तो मी आमच्या पावण्याच्या लग्नात जावक बसची वाट बघत तिठ्यार उभो होतंय थय, माका म्हणालो पण महादू माझो फणस ठेवलास ना आता तू इल्यावर घेवक येतंय. मी म्हटलंय पण अरें घरून घेवन जा पण तो म्हणालो नको तू इल्यावरच येतंय. आणि ह्या तेचा नेमका असा झाला.  खूप मनाक लागला माझ्या. तेच्या नावाचो फणस राहून गेलो.अशे बरेच गजाली झाले. गाजालींच्या नादात कसो वेळ गेलो ता कळूक नाय. मग मी सायकलवर टांग मारलय, अंधार पडलो होतो. माका उशीर झालो होतो म्हणून मी जोरात सायकल हाणीत निघालय.  घाट सुरु झालो आणि मी सायकलवरून खाली उतरलंय. सायकल हातात पकडान चलाक लागलंय. रस्तो तसो अंधाराचो त्यात वारे पण सुटलेले. वाऱ्यान झाडांच्ये  फांदे खूप हला होते. पानांची सळसळ ऐकाक येत होती. सायकल हातात घेवन घाट चढताना माका दम लागलेलो. माका माझ्या घराची घाटी आता दूर दिसुक लागली होती. तेवढ्यात माका गाडीचो आवाज ईलो.मागसून एक बस घाट चढत येत होती. मी सायकल रस्त्याच्या कडेक घेतलंय, बसचो वेग पण कमीच होतो. हेड लाईट मात्र खूप  पोवेरफुल होते.सर्वत्र प्रकाश टाकत होता. मी सायकल रस्त्याच्या कडेला घेतली. एस टी पुढे निघून गेली त्याच वेळी एस टी च्या हेडलाईट च्या झोतात माका त्या वडाच्या झाडाजवळ कोणी तरी उभो दिसलो, एस टी पुढे गेली तसो अंधार झालो माका दिसला की कोणीतरी माका हात दाखवता नी थांबुक सांगता असा वाटला. एस टी आता बरीच लांब गेली होती पण तिचो आवाज अजुन लांबून ऐकाक  येत होतो. मीया बघितलाय की कोणीतरी माझ्याकडे येताहा, मिया विचार केलंय कोण असात इतक्या रातचो. पण ती व्यक्ती जशी जशी जवळ येत गेली तशी माका ओळख पटली. तो जयराम होतो. मी विसारानच गेलाय की जयराम जितो नाय. मी तेका विचारलंय अरें इतक्या रात्री खय फिरतंस आमच्यात थोडा बोलणा झाला, सगळा काय ता माका आता आठवणा नाय. पण तेच्या शेवटच्या प्रश्नानं मिया हादरलय.तेनी विचारला  ‘ अरे महादू  तुझ्या काप्या फणसाच्या झाडाचो फणस माका देणार होतस ना ? कधी देतलस ?”  त्याच्या या वाक्यान मी भानावर इलय,  माझ्या अंगार काटो इलो.माका आठवला की जयराम तर जितो नाय हा. मी मग कोणाशी बोलतंय, काय बोलावे मला सुचेच ना. त्यातच जयराम हसाक लागलो आणि दिसे नासो झालो, माका जोरात ओरडावासा  वाटला पण आवाजच फुटाना,छाती धड धडाक लागली, मी खूप घाबरलय कारण मी जयरामच्या भुता वांगडा बोला होतंय. माझ्या हातातसून सायकल पण सुटली नी माका चक्कर  इली नंतरचा माका काय आठवणा नाय”. महादूची हकीगत इथे संपली.

महादूच्या या अनुभवावर नाम्याचे म्हणणे असे की  “महादूची फणसाची विच्छा बाकी होती. जिते पणी जी विच्छा पुरी होना नाय तेव्हा त्या पुरे करुक माणसाचा भूत होता. महुदुक जयरामचा भूतच दिसला. तेची विछा पुरी झाली तेव्हाच महादू बरो झालो”  नाम्याच्या या बोलण्याला जवळ जवळ सगळ्यांनीच संमती दाखवली. पण या बाबतीत डोंगरे डॉक्टरांचे मत मात्र वेगळे होते.भूताच अस्तित्व त्यांना मान्य नव्हत. हे माणसाच्या मनाचे खेळ आहेत असे त्यांचे म्हणणे होते की हे जयराम हा महादूचा जवळचा मित्र होता. जेव्हा जयराम गेला तेव्हा महादू गावात नव्हता. त्यामुळे त्याचा अपघाती मृत्यू जेवढा ठसायला पाहिजे तेवढा त्याच्या मनावर ठसला नाही, त्याच प्रमाणे जयरामला फणस देता आला नाही याचा त्याच्या मनावर अनपेक्षित ताण आला व हि गोष्ट त्याच्या अंतर्मनात खोलवर रुजली  होती .त्याला जयराम दिसणे,त्याच्याशी बोलणे हा त्याच्या अंतर्मनाचा एक भास होता,त्याच्या  कल्पनेतील जयारामचे फणस मागणे ही त्याच्या कल्पना विश्वाची साखळी तोडणारी घटना आणि त्यानंतर आपण मृत व्यक्तीशी बोललो या जाणीवेने मात्र तो खरोखरच घाबरला.

डोंगरे डॉक्टरांचे म्हणणे लोकांना किती पटले कोणाक ठाऊक.कारण गाव तसे अंधश्रद्धाळू. भुता खेतांचे अस्तित्व मानणारी बहुतेक माणसे. महादूची ही हकीगत गावात सगळीकडे पसरली,  त्याला तिखट मीठ लाऊन शेजारच्या गावात पण पोचली आणी त्यानंतर जयरामचे भूत नंतर अनेकांना त्या रस्त्यावर वडाच्या झाडा जवळ सगळ्यांना दिसू लागले. संध्याकाळी शक्यतो एकटे जाणे लोकं टाळू लागले. वडाच्या झाडाजवळ जयरामच्या  आवडीच्या वस्तू त्या वडाच्या झाडाखाली दिसू लागल्या………..

************

— विलास गोेरे 

(पात्रे, प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत)

Avatar
About विलास गोरे 22 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..