फाटक्या खिशाला वाटे
मौज पाकिटाची
खडखडाट जरी त्यात
तरी सुख भरुनी वाहे
सांडूनि जाई पैका
तरी सुख ना गवसे
ज्याच्या खिशात सुख
तोचि मिरवीतसे!!
अर्थ–
पांघरून बघून पाय पसरावेत, अन्यथा पाय उघडे पडतात. जेवढं शक्य असेल तेवढेच करावे, उगाच अतिहाव धरल्यास मिळवायचे ते राहून जाते आणि वेळ उतू गेलेल्या दुधाला स्वच्छ करण्यात निघून जातो. मोठी स्वप्ने बघावीत जरूर पण त्यासाठी काय करावे लागेल हे जाणून मग ती बघावीत, नाहीतर मोठी उडी घेण्याच्या नादात जवळ असलेले सुद्धा पणाला लागते आणि मग नशीब एकदा पणाला लागले की आयुष्य रोलर कॉस्टर च्या राईड सारखे गटांगळ्या खात फिरू लागते.
याउलट जो स्वप्न बघतो पण झेपेल तेवढीच आणि जेवढे शक्य आहे तेवढे सगळे अतिशय मनाने आणि जीव लावून करतो त्याला सुखाचं घबाड नाही पण सुखाचा घडा नक्कीच गवसतो आणि त्याचा परिणाम मानसिक समाधान टिकण्यावर होऊन माणूस खऱ्या अर्थाने सुखी होतो.
केवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे. खरा सुखी तोच जो शर्टाचा खिसा जरी उसवलेला असला तरी चेहऱ्यावरचे स्मित टिकून असते.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply