पूर्वी रेडिओवरील ‘पुन्हा प्रपंच’ या कार्यक्रमात दैनंदिन घडामोडींवर पंधरा मिनिटांची, धमाल श्रुतिका असायची.. त्यामध्ये ‘टेकाडे भाऊजी’ हे एक मनोरंजक, पात्र असायचं.. नवरा बायकोच्या जुगलबंदीत ‘टेकाडे भाऊजीं’चं विनोदी बोलणं आमच्या पिढीला, जाम आवडायचं…
कालांतराने ‘पुन्हा प्रपंच’ हवेत विरुन गेलं.. रेडिओ गेला आणि सर्वसामान्य माणसांपासून मोठ्या श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात एक तरी ‘फेकाडे भाऊजी’ भेटत राहिला.. त्यानं मारलेल्या ‘फेकां’वर, आपण विश्र्वास ठेवत राहिलो व स्वतःची फजिती झाल्यावर, त्याला टाळू लागलो…
माझा एक मित्र आहे, त्याला ‘फेका’ मारण्याची जन्मजात सवय आहे. एकदा आमच्या गप्पांच्या मैफीलीत त्याने सांगितले की, ‘माझ्या घरात बत्तीस वाद्यं आहेत..’ मी चक्रावून गेलो, हा रहातो तर ‘वन बीएचके’ मध्ये! मग इतकी वाद्यं त्यानं ठेवलीत तरी कुठे? त्याला सर्वांनी खोदून खोदून विचारल्यावर तो बोलला.. ‘माझ्याकडे ‘कॅसिओ’ आहे, त्यावर मी बत्तीस वाद्यांचे आवाज काढू शकतो..’ हाच विदुषी मला पुन्हा एकदा शनवार पेठेतील, पेपरगल्लीत भेटला.. त्याने मी किती श्रीमंत आहे, हे सांगण्यासाठी, स्वतःच्या अकलेचे तारे तोडले.. ‘मी ही संपूर्ण पेपर गल्ली, सहज विकत घेऊ शकतो..’ मी अवाक् झालो.. तो पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे इतकं सोनं आहे की, ते विकून ही पेपर गल्ली माझ्या मालकीची होऊ शकते..’ ही त्याची निव्वळ ‘फेक’ होती.. कारण त्याच्या बोटात, साधी अंगठीही नव्हती…
एक पाटील नावाचा इंदापूरचा दुग्ध व्यावसायिक, माझ्या संपर्कात आला. त्याची कामाच्या निमित्ताने वारंवार भेट होत राहिली.. त्याला चित्रपट काढायचा होता, कारण मोठमोठे फायनान्सर, त्याच्या मर्जीतले होते. आम्ही स्वप्नं पाहू लागलो की, याच्या चित्रपटाचे डिझाईन व पब्लिसिटीचे काम तरी नक्कीच मिळेल. तो झुलवत राहिला व पुढे काहीच घडले नाही.. शेवटी त्याने एक प्रपोजल दिलं. मी माझ्या दुधाचे वितरण तुमच्या पुण्यात करतो, ते तुम्ही फक्त सांभाळा.. रोज चार तास काम, नंतर आराम! मी सकाळी लवकर उठण्याची सवय करु लागलो.. कारण त्याचा फोन सकाळी पाच वाजताच येत असे.. काही दिवसांतच या माझ्या स्वप्नावर, विरजण पडलं आणि हा फेकाडे भाऊजी, कायमचा अज्ञातवासात निघून गेला…
‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ म्हणजेच ‘मला लोंबकळलेली माणसं’.. अशा स्किममध्ये आपल्याला अडकवणारे, नंबर एकचे ‘फेकाडे’ असतात.. माझा इयत्ता पहिलीतला मित्र, माझ्या पन्नाशीत मला भेटला. त्यानं जनरल चौकशीनंतर, विषयाला हात घातला. तो म्हणाला, ‘आतापर्यंत खरं तर तू, तुझ्या कारमधून फिरायला हवा होतास.. अजूनही वेळ गेलेली नाही.. तू माझ्या स्किममध्ये सहभागी हो.. काही महिन्यांतच कारमधून फिरशील..’ मला ओशाळल्यासारखे झाले.. एवढं कळकळीनं सांगतोय, तर प्रयत्न करुन बघू.. म्हणून मी सहभागी झालो.. आठवड्यातून तीन वेळा सेमिनारला जाऊ लागलो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे, लेक्चर देणाऱ्याच्या इशाऱ्यावर टाळ्या वाजवू लागलो.. दरवेळी एखाद्या नवीन मित्राला, ‘बकरा’ करुन घेऊन जाऊ लागलो.. महिन्याभरातच, माझ्याखाली कुणालाही जोडू न शकल्याने स्किममधील पैसे वाया गेले आणि मी नैराश्यात गेलो..
हा माझा मित्रही नंतर कंगाल झाला, कारण त्यानं ‘फेका’ मारुन अनेकांना, बरबाद केलेलं होतं… आता तो समोरुन आला की, मी माझा रस्ताच बदलतो…
मला असेच एक बोलबच्चन प्रोफेसर भेटले.. मी फेसबुकवर लिहिलेले लेख वाचून, त्यांनी माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला.. ‘माझ्या ओळखीचा, पंढरपूरचा एक संपादक आहे.. त्यांचं एक दैनिक आहे. मी त्यांच्यासाठी लेख लिहितो आहे, तू देखील लिही.. लेखाला तुला घसघशीत मानधन मिळेल..’ मी त्यांना त्यांच्याकडे घेऊन जाण्याची विनंती केली.. या सोमवारी, पुढच्या सोमवारी.. असे ‘सोळा सोमवार’ गेले.. मला त्यांनी त्यांचा लेख छापून आल्याचे सांगितले, मी तो अंक दाखवायला सांगितला.. त्यांनी ऐकून न ऐकल्या सारखे केले.. शेवटी मी समजून चुकलो की, हे प्रोफेसर नंबर एकचे ‘फेकाडे’ आहेत..
केसरी वाड्यासमोर, एक देशपांडे नावाचे गृहस्थ पुस्तकांची कामं करतात.. माझ्या एका मित्राच्या शिफारशीनुसार त्यांनी मला बोलावून घेतले. मी गेलो. मला एका डाॅक्टरच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ करायला त्यांनी सांगितले.. मी चार नमुने घेऊन गेलो. त्या महाशयांनी त्या डाॅक्टरला नमुने दाखवले.. डाॅक्टरांनी दुसऱ्या आर्टीस्टला ते दाखवून परस्पर मुखपृष्ठ करुन घेतले. मला देशपांडेंनी माझे नमुने परत केले.. एखादेवेळी असं होऊ शकतं.. मात्र त्यांचा दुसरा अनुभवही तसाच आला.. माझ्या नमुन्यावरुन त्यांनी स्वतः मुखपृष्ठ केले व माझे काम पसंत नाही असे सांगितले.. वरती ‘असे काम मीही करु शकतो’, अशी टिप्पणी केली.. थोडक्यात त्यांनी ‘फेका’ मारुन स्वतःचा फायदा करुन घेतला…
आपल्या अवतीभवती असे ‘फेका’डे भाऊजी बरेच असतात, त्यांना वेळीच ओळखून त्यांच्यापासून दूर रहावे.. म्हणजे पुढे होणाऱ्या, मानसिक व आर्थिक त्रासातून आपली सुटका वेळीच होऊ शकते..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-५-२२.
Leave a Reply