हौसेने अल्बमचा ढीग घेऊन मुला-नातवंडांसोबत;
हसत खिदळत एकेक करत बघितला जातो तो… फोटो!!
एकांतात आपल्या दिवंगत जोडीदाराच्या स्मृतींना उजाळा देताना; अनाहूतपणे पडणारा अश्रू झटकन पुसत उराशी धरला जातो तो… फोटो!!
निसर्गाच्या सानिध्यात त्याचं देखणं रूप डोळ्यात साठवण्याऐवजी;
घाईघाईने कॅमेरात कैद केला जातो तो…..फोटो!!
लग्न समारंभ शेवटच्या टप्यात आला असताना;
ज्यावरून नातेवाईकांमध्ये रुसवे फुगवे होतात तो…..फोटो!!
सुंदर पाककृती केल्यावर सगळ्यांना ताटकळत ठेवत;
सोशल मीडियावर टाकण्यासाठी काढला जातो तो…..फोटो!!
कठीण अश्या न समजणाऱ्या गोष्टी, अभ्यास;
झटकन सोपा करून उलगडून सांगणारा तो…..फोटो!!
सीमेवर तैनात सैनिक आपल्या लहानग्यांचा पापा घेण्यासाठी;
रोज रात्री झोपताना हळूच पाकिटातून काढतो तो…..फोटो!!
आपल्या वीरमरण प्राप्त मुलाला अभिमानाने सलाम करणाऱ्या;
त्या माऊलीच्या हाती वर्तमानपत्राच्या कात्रणातला तो…..फोटो!!
वाढदिवसाच्या बॅनरवर शुभेच्छा देण्यासाठी;
शुभेच्छुकांची चढाओढ सुरू असते तो…..फोटो!!
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या भरगच्च जाहिरातीत;
श्रेष्ठत्वाच्या मुद्यावरून मानापमान नाट्य रंगतं तो…..फोटो!!
आज कितीही स्मार्ट असलो तरी एकेकाळी बावळट होतो;
हे “सत्य” बिनदिक्कतपणे दाखवून देतो तो…..फोटो!!
आपण खरंच इतके वाईट दिसतो का? हा प्रश्न पडावा;
असा सरकारी कागदपत्रांवरचा तो…..फोटो!!
उपलब्ध असलेल्या “स्थळांचं” रूपांतर;
“कांदेपोहे” कार्यक्रमात होण्यासाठी महत्वाचा ठरतो तो…..फोटो!!
कधी स्वच्छ पाण्यासारखा…. अगदी नितळ;
तर कधी मृगजळासारखा फसवाही असतो तो…..फोटो!!
चुकीच्या पद्धतीने साऱ्या समाजासमोर आणून;
एखाद्या व्यक्तीचं आयुष्यच उध्वस्त होतं तो…..फोटो!!
आपल्याला रोज नव्याने प्रेरणा देणाऱ्या;
आदर्श व्यक्तीचा सतत नजरेसमोर असतो तो…..फोटो!!
वेगवेगळ्या कचेऱ्या-कार्यालयांच्या भिंतीवर;
औपचारिकता म्हणून वर्षानुवर्षे लावूनही दुर्लक्षित असतो तो…..फोटो!!
मोठे निर्णय घेण्याआधी देवघरात जाऊन;
आपसूकच श्रद्धेने नतमस्तक व्हायला होतं तो…..फोटो!!
चहुबाजूंनी असलेल्या स्पर्धेच्या या युगात;
ऊर्जा देऊन जाणारा एखाद्या विजयाचा तो…..फोटो!!
“प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट” असं प्रत्येक वेळेस म्हणत;
पुन्हा पुन्हा काढला जातो तो…..फोटो!!
ट्रेंडच्या नावाखाली चित्रविचित्र तोंडं करून;
अगदी नाटकीपणे काढला जातो तो…..फोटो!!
आपल्या नकळत आपले खरेखुरे हावभाव टिपणारा;
candid चं लेबल लावलेला असतो तो…..फोटो!!
आपल्या आवाक्याबाहेरची पर्यटन स्थळं, सेलेब्रिटी, ग्रह-तारे;
यांना जवळून बघण्याचं आभासी समाधान देतो तो…..फोटो!!
४ x ६ चा कागदी तुकडा नुसता बघून;
डोळ्यासमोर सगळा 70 mm चा चित्रपट सुरू होतो तो…..फोटो!!
एकमेकांची मनं जोडत;
प्रत्येकाला गुंफून ठेवणारा दुवा असतो तो…..फोटो!!
नेहमी आठवणीत रमवता रमवता;
अचानक भानावर आणणाराही असतो तो…..फोटो!!
आपले आवडते-नावडते, आनंदाचे-दुःखाचे सारे “ठिपके” जोडत जोडत;
आपल्या आयुष्याची “रांगोळी” हळुहळु पूर्ण करत नेणारा तो…..फोटो!!
4विविधरंगी आठवणींचा “कोलाज” तयार करत;
आपलं विस्कळीत आयुष्य एकसंध ठेवणारा असतो तो…..फोटो!!
विविधरंगी आठवणींचा “कोलाज” तयार करत;
आपलं विस्कळीत आयुष्य एकसंध ठेवणारा असतो तो…..फोटो!!
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply