नवीन लेखन...

फोटो झिंको

शनिवार होता, दुपारचे चार वाजले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी शनिवारी बँकेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालत असे. सोमवारी सुट्टी होती म्हणून बाहेर गावची मंडळी त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार, काम संपवून किंवा उरलेले काम आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून निघून गेली होती. इतक्यात एक क्लार्क केबिनमध्ये आला, त्याने विचारले की, साहेब तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहात? माझी सहा वाजताची गाडी आहे, तेव्हा लॉकर रेंटच्या सूचना काढून जाइन म्हणतो. बरेच दिवसांपासून पेंडिंग आहेत. तासभर तरी लागेल. मी हो म्हटल्यावर तो निघून गेला.

केबिन मध्ये काम करीत असतांना वाँचमान आला आणि म्हणाला बाहेर आपल्याला भेटायला बाहेर एक जण आले आहेत. त्यांना पाठवू कां? मी म्हणालो, पाठवून दे.

एक चाळीशीचे गृहस्थ, प्रवासाची धावपळ करून आल्याचे जाणवत होते, एका बाजूला विजारीत खोचलेला शर्ट, तर दुसरीकडून निघालेला, आंत आले. त्याच्या चेहऱ्यावरून ओळखू येत होते कि मला भेटण्याकरिता ते बराच आटापिटा करून आले होते. मी त्यांना खुर्चीवर बसण्याची खुण केली तसे ते बसले, आणि त्यांनी निश्वास टाकल्याचे मला जाणवले. ते म्हणाले, मी भोर येथे नौकरी करतो. रजा टाकायला नको म्हणून मी जरा लवकरच निघालो. पण बस वेळेवर मिळाली नाही, रस्त्यावरील गर्दी, यामुळे उशीरच झाला. मनांत विचार करीत होतो, आज तरी भेट होईल कि नाही. तुम्ही भेटला, फार आनंद झाला. मी त्यांना काय काम म्हणून विचारले तर ते म्हणाले, मला येथे एक फ्लॅट घ्यावयाचा आहे, तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन हवे होते. दहा मिनिटे वेळ देणार का साहेब? मी हो म्हटल्यावर, तो म्हणाला, हि माझी फाईल, मला कर्ज किती आणि केव्हा मिळेल? फाईल पाहून मी त्याला मिळणाऱ्या कर्जाचा आंकडा सांगितला. ते खुश झाले, म्हणाले मला तेव्हढेच हवे होते. त्याच्या बडबड्या स्वभावामुळे जरा जास्तीच गप्पागोष्टी झाल्या. दरम्यान कळले कि ते माझ्याच गावाकडील होते. इतक्यात क्लार्क आंत येऊन म्हणाला माझे काम झाले. मी म्हणालो की, चला आपण सर्व चहा घेऊ व नंतर तू पुढे जा.

साधारणपणे चहा, आम्ही लगतच्याच टपरीवर घेतो. बाहेर आलो तर कळले की, क्लार्क आज त्याची कार घेऊन आला होता. तो म्हणाला आपण थोडे पुढे जाऊन हॉटेल मध्ये बसून चहा घेऊ. गाडीत बसल्यावर मी क्लार्क ला विचारले की, आज गाडी कशी आणली, तर तो म्हणाला, साहेब गाडी आपल्या स्टेशन जवळील मुख्य शाखेत ठेवून पुढे रेल्वे स्टेशनवर जाईन, परत येतांना कामी येईल. गाडी असल्यामुळे मंगळवारी ऑफिसमध्ये यायला जास्त उशीर होणार नाही. कारण गाडी सकाळी दहा वाजतां येते. आम्ही चहा घेऊन बाहेर आलो तर ते गृहस्थ म्हणाले, साहेब आपण इथपर्यंत आलोच आहे. येथून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर, मी जो घेणार आहे तो फ्लॅट आहे. आपण जरा बघून घेता कां? मी प्रथम हो म्हणालो, इमारती पर्यंत गेलो आणि माझा विचार बदलला. मी विचारले इथे कोठे? तो म्हणाला दुसऱ्या मजल्यावर आठ नंबरचा. देशमुख साहेबांचा आहे. आम्ही खाली सर्व सभासदांची यादी पहिली. मी म्हणालो फ्लॅट प्रत्यक्ष पाहण्याची गरज नाही. लोकेशन व इमारतीवरून तुम्ही सांगता ती किंमत मला योग्य वाटते. शिवाय क्लार्क ला स्टेशनवर जाऊन गाडी पकडायची होती.

8-10 दिवसांनी सकाळी मी घाईत असतांना भोर हून फोन आला, साहेब माझी फाईल तयार झाली आहे. मी त्यांना सांगितले कि हे काम आमचे फिल्ड ऑफिसर बघतात, त्यांचा फोन नंबर हा आहे, उद्या तुम्ही त्यांच्याशी बोला, आज मी त्यांना तशी कल्पना देतो. दुपारी डब्बा खातांना मी फिल्ड ऑफिसरला सगळी कहाणी सांगितली आणि त्याचा फोन आल्यास त्याला मदत करा म्हणून सांगितले. फिल्ड ऑफिसर म्हणाला, साहेब तो फ्लॅट देशमुखांचा नाही, ते तिथे भाड्याने राहतात. तो फ्लॅट चारी साहेबांचा आहे. मी त्याला विचारले की, तुला कसे काय माहित? तो म्हणाला मला माझ्या आधीच्या फिल्ड ऑफिसरने सांगितले होते. श्री चारी हे एक अतिशय सज्जन गृहस्थ आहेत, त्यांना आपण हा फ्लॅट घेण्यासाठी कर्ज दिले आहे. त्यांचे खाते एकदम नियमित असते. आधीच्या फिल्ड ऑफिसरला तर त्यांनी कर्ज घेऊन अडीच वर्षे झाली असता, आठवणीने रीवायवल लेटर आणून दिले होते. नियमितपणे बँलन्स कन्फर्मेशन आणून देणारे ते एकमेव कर्जदार आहेत. सध्या ते मुंबईला मुलाकडे असतात आणि जाण्यापूर्वी ते आधीच्या फिल्ड ऑफिसर ला सांगून गेले होते कि फ्लॅट देशमुखांना भाड्याने दिला आहे. शिवाय त्यांचा फोन नंबर सुध्दा ते त्यांच्याकडे देऊन गेले, कांही अडचण आली तर असावा म्हणून. मी त्याला म्हणालो, म्हणजे तुम्हाला सर्व माहित आहे, मग त्या माणसाचे बघून घ्या.

नेहमीपणे मी कामाला लागलो. मध्येच विचार आला की, त्या इमारतीत आपण स्वतः देशमुखांचे नांव, त्या फ्लॅट नंबर समोर पाहिले. फिल्ड ऑफिसरला बोलावले व सांगितले की, तुम्ही चारी साहेबांची फाईल घेऊन या. तो आला आणि म्हणाला, साहेब तुम्ही उगीच काळजी करतां, आपले कर्ज सुरक्षित आहे. मुळीच काळजी करू नका. तरी मी त्याला सांगितले कि उद्या सकाळी मला एका कागदावर चारींचे पूर्ण नांव, पत्ता, फोन, कर्ज केव्हा व किती दिले, आजची स्थिती, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची नावे, त्यांचे फोन नंबर लिहून द्या. तो हो म्हणाला आणि निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत आलो तर माहितीचा कागद टेबलावर हजर होता. माहिती वाचली. सोसायटी मध्ये फोन लावला, कोणीच उचलला नाही. नंतर दुसरा नंबर लावला, बेंद्रे साहेबांनी उचलला.त्यांना माझी ओळख संगितली आणि विचारले कि सोसायटीचे सचिव कोण आहेत? त्यांनी श्री. शेलोकारांचे नांव सांगितले व त्यांचा फोन नंबर पण दिला.

शेलोकारांना फोन केला, त्यांना माझी ओळख सांगून, दोन मिनिटे कांही विचारू कां? म्हणून रीतसर परवानगी घेतली. त्यांच्या संमतीनंतर, मी विचारले, आपल्या सोसायटी मध्ये दुसऱ्या मजल्यावरील आठ नंबर चा फ्लॅट कोणाचा आहे? ते म्हणाले, देशमुखांचा. पुढे तेंच सांगू लागले की, ते फ्लॅट विकणार आहेत. त्यांची ना हरकत प्रमाणपत्राची मागणी आली आहे. पुढील आठवड्यांत सोसायटीची सभा होईल, त्यांत निर्णय झाल्यावर प्रमाणपत्र देण्यांत येईल.

मी, धन्यवाद, म्हणालो. पुढे मी विचारले की, ते कधीपासून सोसायटीचे सभासद आहेत? ते म्हणाले, सुमारे साडे चार वर्षापासून. तत्पूर्वी हा फ्लॅट कोणाचा होता. ते म्हणाले, श्री चारी साहेबांचा. तुम्ही केव्हापासून सोसायटीचे सचिव आहात? ते म्हणाले, सहा वर्षे झाली. सध्या चारी साहेब कुठे असतात? ते म्हणाले माहिती नाही.

मी शेलोकारांना सांगितले की, मी तुम्हाला एक गंभीर बाब सांगतो. श्री चारी साहेबांना बँकेने कर्ज दिले आहे. ते त्यांनी न फेडता, फ्लॅट विकला आहे. बँकेने त्यांच्या आणि सोसायटी विरुध्द पोलिसात तक्रार करावयास सांगितले आहे. मी विचार केला कि आधी दोघांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेऊ, नंतर तक्रार करु. तुम्ही बँकेत येऊ शकाल काय? शक्य झाल्यास श्री देशमुखांना त्यांच्या फ्लॅट च्या सर्व कागदपत्रांसह घेऊन या, म्हणजे जास्त सोयीचे होईल. ते म्हणाले आज गुरुवार आहे, देशमुखांना सुट्टीच असते, त्यांना घेऊन आम्ही पांच वाजेपर्यंत बँकेत येतो.

फिल्ड ऑफिसर ला बोलावून झाला प्रकार सांगितला, त्याला मोठा धक्काच बसला. त्याचा विश्वासच बसेना. ते आले की चारींची फाईल घेऊन या, म्हणून त्यांना सांगितले.

संध्याकाळी सर्व मंडळी आलीत. श्री. व सौ. देशमुख दोघेही फार काळजीत होते. त्यांनी त्यांची फाईलसमोर केली आणि दोघेही बोलू लागले, आम्ही मोठा फ्लॅट बुक केला आहे, त्यामुळे हा विकायला काढला, आता हा विकल्या गेला नाही तर आमची फारच पंचाईत होईल. नुकतेच एक जण येऊन गेले, त्यांना आमचा फ्लॅट पसंद पडला आहे. आम्हाला कसही करून मदत करा साहेब. मी त्यांना शांत केले व फाईल बघायला सुरुवात केली. फाईल मध्ये सगळी आवश्यक कागदपत्रे होती, सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्रावर चारींची सही होती. मी शेलोकारांना विचारले, चारी कधी सोसायटीचे सचिव होते कां? ते म्हणाले कधीच नाही. मग एकदम आठवून, ते म्हणाले की, सुमारे पांच वर्षापूर्वी, मी अमेरिकेला मुलाकडे गेलो होतो, तेव्हा दोन महिन्यांपुरता ते कारभार पाहत होते. त्यांना अधिकार कांहीच नव्हते. त्या दरम्यान बहुदा त्यांनी हे उद्योग केले असतील.

त्यावेळी फोटो झिंको हा एक प्रकार होता. मूळ कागदपत्रे लगेच मिळत नसत, पण कर्जदार ती उपलब्ध झाल्यावर बँकेला आणून देत. श्री चारींनी मिळालेली मूळ कागदपत्रे वापरून हा उद्योग केलेला दिसतो. शिवाय देशमुखांनी गावाकडील घर विकून आलेल्या पैशातून हा व्यवहार केला होता. कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नव्हते.

बैठकीत असे ठरले की, पहिले चारींचा पत्ता शोधून त्यांचे कर्जाचे खाते बंद करून घेणे. गेल्या पांच वर्षापासून खाते असुरक्षित आहे, त्यामुळे त्यांच्या कर्जाला क्लीन अँडव्हांस चा व्याजदर लागून रक्कम वाढेल. श्री. चारींचे खाते रीतसर बंद झाल्याशिवाय, श्री देशमुखांना फ्लॅट विकता येणार नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळीच एक फोन आला, साहेबांशी बोलायचे आहे, मी म्हणालो बोला. तिकडून आवाज आला, मी चारी बोलतो आहे. बँकेनी  आणि तुम्ही माझी काय बदनामी चालविली आहे. माझे खाते एकदम नियमित आहे, फ्लॅट फक्त तुमच्याकडेच गहाण ठेवला आहे. दुसऱ्या कोणाकडेही तो गहाण ठेवलेला नाही. माझे खाते पूर्णपणे सुरक्षित आहे, तेव्हा हे उद्योग बंद करा, नाहीतर मला बँकेविरुध्द आणि तुमच्या विरुध्द अब्रूनुकसानीची केस दाखल करावी लागेल. आणि फोन बंद झाला.

काँलर आयडी असल्यामुळे मी त्या नंबरवर लगेच फोन लावला. तो एका पिसिओ मध्ये लागला. मी त्या माणसाला विचारले की, आत्ता जे या फोनवरून बोलत होते ते तिथे आहेत काय? तो म्हणाला, नाही ते निघून गेले. मी त्याला विचारले की, हा पिसिओ कोठे आहे? तो म्हणाला अंधेरीत. आत्ता ज्यांनी फोन केला त्यांना तुम्ही ओळखता कां? तो म्हणाला नाही, पण ते समोरच्या इमारतीत राहतात, कधी कधी कांही कारणाने दुकानांत येत असतात. मी त्याला विचारले, तुमचा अजून काय व्यवसाय आहे? तो म्हणाला माझे जनरल स्टोअर आहे, सोबत झेरॉक्स, लँमीनेशन, स्पायरल बँडिंग ची कामे करतो. मी त्याच्या  दुकानाचा सविस्तर पत्ता विचारून घेतला, समोरच्या इमारतीचे नांव विचारून घेतले. इतरहि शक्य तेवढी माहिती जाणून घेतली आणि त्याला धन्यवाद दिलेत.

अंधेरी शाखेच्या एजीम (-ॠच्) ना फोन केला. त्यांना सविस्तर प्रकरण समजावून सांगितले आणि मदत करण्याची विंनती केली. ते म्हणाले, कांही काळजी करू नका, उद्या सकाळी मी तुम्हाला फोन करतो.

दुपारी सौ. देशमुख केबिन मध्ये आल्या, चारी साहेबांचा फोन येऊन गेला काय म्हणून विचारू लागल्या. मी त्यांच्या प्रश्नाला बगल देऊन सांगितले की, तुम्ही कांही काळजी करू नका. येत्या आठवड्यांत सगळे स्पष्ट होईल. जाण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा चारींच्या फोन विषयी विचारले. मी सुध्दा उत्तर टाळले आणि त्यांची बोळवण केली.

दुसऱ्या दिवशी दुपारी अंधेरी शाखेच्या -ॠच् साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, येत्या आठ दिवसांत कर्ज खाते बंद होईल. दरम्यान कांही विशेष घडले तर मला जरूर कळवा.

दरम्यान श्री देशमुख, शेलोकारांचे फोन येऊन गेलेत. प्रत्येक वेळी मी त्यांना कांही प्रगती झाली काय? म्हणून विचारीत असे. आणि कांही कळल्यास जरूर कळवा म्हणून विनंती करीत असे.

सुमारे वीस दिवसांनी श्री चारी स्वतः बँकेत येऊन खाते रीतसर बंद करून गेलेत. आणि एकाच फ्लॅट वर बँकेच्या एकाच शाखेनी दोनदा कर्ज देण्याचा प्रसंग टळला.

प्रदीप जोशी

(व्यास – पासबुक आनंदाचे – दिवाळी २०२२)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..