नवीन लेखन...

आदिवासींना पंचतारांकित करणारा छाया+चित्र+कार

१९८४ मधील प्रसंग आहे. शोमन राज कपूर आपल्या नव्या चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन चेहरे पाहिले, पण अपेक्षित अशी एकही मुलगी त्यांना मिळाली नाही. शेवटचा उपाय म्हणून ते एका सुप्रसिद्ध फोटोग्राफरकडे गेले. त्या फोटोग्राफरने त्यांच्या संग्रहातील एका मुलीचा फोटो दाखविल्या बरोबर राजकपूर आनंदीत होऊन ओरडले, ‘हीच माझ्या चित्रपटाची नायिका! तिचं नाव काहीही असो, हिला मी मंदाकिनीच म्हणणार!’ तिचं खरं नाव होतं, यास्मिन जोसेफ. ती एक अॅन्ग्लो इंडियन मुलगी होती. तिला आजही सर्वजण ओळखतात, ‘राम तेरी गंगा मैली’ मधील मंदाकिनी! मंदाकिनी सारख्याच अनेक तरुणींना चित्रपटात संधी मिळवून देणाऱ्या त्या ग्लॅमर फोटोग्राफी करणाऱ्या चित्रकाराचं नाव होतं जे. पी. सिंघल! सत्तर सालापर्यंत कॅलेंडरवरील चित्रे ही देवादिकांची, संतांची, राष्ट्रपुरुषांचीच असायची. त्या परंपरेला वेगळं वळण दिलं ते जे. पी. सिंगल यांनी!जे. पी. सिंघल यांचा जन्म झाला १९३४ साली उत्तर प्रदेशातील मीरत येथे. ते आपल्या अनुभवातूनच चित्रकला शिकले. ज्या गावात चित्रकलेचा कुणालाही गंध नव्हता, त्याच गावात त्यांनी सोळाव्या वर्षी चित्रकलेची शिकवणी सुरु केली. विसाव्या वर्षी त्यांचे पहिले चित्र ‘धर्मयुग’ या हिंदी साप्ताहिकात प्रसिद्ध झाले. पुढे चारच वर्षांनी त्यांची चित्रे असलेले पहिले कॅलेंडर प्रकाशित झाले. हे कॅलेंडर, जे. पी. सिंघलच्या पुढील पस्तीस वर्षांच्या अलौकिक कारकीर्दीची नांदी होती.

मुंबईत आल्यावर त्यांनी केलेली सुरुवातीची कॅलेंडर चित्रे ही ग्रामीण संस्कृतीशी निगडीत होती. त्यामध्ये लमाणी स्त्रियांचा विषय त्यांनी अधिक हाताळला होता. त्यांच्या कपाळ व हनुवटीवरील गोंदण, मनगटापासून कोपरापर्यंतच्या पांढऱ्या बांगड्या, केसांना लावलेल्या पिना, रंगेबेरंगी कापडांना अनेक गोल आरसे लावलेला ढगाळा ब्लाऊज, तसाच रंगीत घागरा ते तपशीलवार रंगवायचे. मागे खेड्यातील हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्र्वभूमीने चित्राला उठाव येत असे.

काही चित्रांमधून जे. पीं. नी राजस्थानमधील लोककलेचे वादक दाखविले. लाल रंगाचे मुंडासे घातलेले सारंगी वादक अप्रतिम चितारले. अशी चित्रे काढताना त्यांनी भारतातील प्रत्येक प्रांताचा अभ्यास केला. भारतात दर शंभर मैलांच्या अंतरावर भाषा, रितीरिवाज बदलतात. यांचे निरीक्षण करण्यासाठी ते त्या त्या ठिकाणी राहिले, तेथील जनजीवनाचे फोटो काढले व त्यावरुन चित्रे तयार केली. गुजरात ते कोलकता व चेन्नई ते हिमाचल प्रदेश येथील संस्कृती, लोकजीवन हे त्यांच्या कॅलेंडरचे विषय झाले. ही चित्रे करीत असताना त्यांना आदिवासी जीवन जवळून पहायला मिळाले. उन्हातान्हात रापलेल्या त्यांच्या अंगाने व लज्जारक्षणासाठीच वापरलेल्या जाणाऱ्या वेशभूषेतील सौंदर्याची त्यांना भुरळ पडली व त्याच विषयावर जे. पीं. नी अनेक चित्रे काढली.

एव्हाना सिंघल यांचा व्याप वाढला होता. स्वतःच संपूर्ण चित्राचे काम वेळेत करणे अशक्य असल्याने त्यांनी सहाय्यक चित्रकार मदतीला घेतले. एकदा चित्राची आखणी केल्यावर रंगभरण व पार्श्र्वभूमी सहाय्यक चित्रकारांकडून करुन घेतली जात असे. शेवटी फिनिशिंग ते स्वतः करीत व चित्र छपाईला जात असे. त्यासाठी त्यांनी वरळीला मोठा स्टुडिओ थाटला. अशा कॅलेंडर्ससाठी केलेल्या त्यांच्या चित्रांची एकूण संख्या २५०० हून अधिक आहे तर प्रिंटींग झालेली कॅलेंडर्सच्या प्रतींची संख्या ७५ कोटींहून अधिक आहे.

कॅलेंडर चित्रे करतानाच ते फोटोग्राफीदेखील करीत होते. एखाद्या स्त्रीचे सौंदर्य विशिष्ट कोनांतून खुलविण्याचे कौशल्य त्यांच्यात मुरलेलं होतं. म्हणूनच सायरा बानू, हेमामालिनी, राखी, डिंपल कपाडिया, झीनत अमान, मंदाकिनी, इ. अनेक अभिनेत्रींनी सिंघल यांच्याकडून वेगवेगळ्या वेशभूषेतील फोटोसेशन करुन घेतले. हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश मिळविण्यासाठी अनेक तरुणीं सिंघल यांच्या स्टुडिओत जाऊन फोटोसेशन करुन घेत असत. त्यांच्या वरळी येथील स्टुडिओबाहेर निर्मात्यांची रांग लागत असे, जेणेकरून त्यांनी काढलेल्या फोटोंमधून चित्रपटासाठी एखादी नवीन हिरोईन मिळेल. त्यांची ही ख्याती ऐकून एके दिवशी सुभाष घई सिंघल यांच्या स्टुडिओत गेले. सिंघल यांची काम करण्याची एक खाजगी खोली होती, तिथे त्यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश नसे. अगदी मोठ्या निर्मात्यालाही तोच नियम लागू होता. सुभाष घई त्या खोलीमध्ये जाऊन बसले व सिंघल यांना ‘ते’ फोटो दाखवा म्हणाले. सिंघल संतापले, एक तर त्यांच्या खाजगी खोलीत घई येऊन बसले व ‘ते’ फोटो कुणालाही दाखवणार नाही असा शब्द दिलेल्या तरूणींचा सिंघल विश्र्वासघात करु इच्छीत नव्हते. त्यांनी संतापून सुभाष घईना हाकलून दिले.

काही काळानंतर कॅलेंडर करुन घेणाऱ्या कंपन्यांची रूची बदलली. त्यांनी सिंघल यांना फोटोग्राफीक कॅलेंडर करण्यास सांगितली. मुंबईतील प्रिमियर आॅटोमोबाईल, आडवाणी आॅर्लिकाॅन व किर्लोस्कर बेअरिंग्ज या कंपन्यांसाठी सिंघल यांनी मोठ्या साईजमधील सहा किंवा बारा सुंदर स्त्रियांचे फोटो असलेली कृष्णधवल कॅलेंडर्स अनेक वर्षे केली. ही कॅलेंडर आॅफिसमध्येच लावण्यासारखी फक्त प्रौंढांसाठीची होती. काळानुसार सिंघल यांनी ग्लॅमर फोटोग्राफीवर भर देण्यास सुरुवात केली. ‘डेबोनेअर’ या प्रौंढासाठीच्या मासिकातून त्यांनी काढलेले फोटो प्रसिद्ध होऊ लागले. ऐंशी साली ‘श्री’नावाच्या साप्ताहिकात सिंघल यांची ग्लॅमर फोटोग्राफी विषयावर फोटोंसह प्रदीर्घ मुलाखत आलेली होती.

राज कपूर यांनी ‘सत्यम शिवम् सुंदरम्’च्या वेळी झीनत अमान हिला नायिका म्हणून नक्की करण्याआधी सिंघल यांच्याकडून तिचे ‘त्या’ वेशभूषेतील फोटोसेशन करुन घेतले होते शिवाय चित्रपटाच्या जाहिरातींची डिझाईन देखील त्यांनीच केली होती. एम. एफ. हुसेन यांच्याशी सिंघल यांची खास मैत्री होती. त्यांच्या ‘गजगामिनी’ चित्रपटाची जाहिरात सिंघल यांनीच केलेली होती. यास्मीन जोसेफने सिंघल कडून फोटोसेशन करुन घेतले आणि ती ‘गंगा’ झाली‌. तिच्याबद्दलचा अजून एक योगायोग असा की, तिचा पती हा देखील अगदी लहानपणचा म्हणजे वर्षांचा असताना ‘मर्फी’ कंपनीचा माॅडेल होता. आज जे वाचक पन्नासहून अधिक वयाचे असतील त्यांना ‘मर्फी रेडिओ’च्या जाहिरातीतील तोंडाशी बोट घेतलेले बाळ आठवत असेलच..तो ‘मर्फी’ उर्फ डाॅ. ठाकूर आज मंदाकिनीचा पती आहे. त्याचे देखील चित्र सिंघल यांनी कॅलेंडरसाठी काढलेले होते… आज जे. पी. सिंगल आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी केलेली सर्वसामान्य आदिवासींची सर्वोत्कृष्ट पेंटींग्ज पंचतारांकित हाॅटेलमध्ये दिमाखात विराजमान झालेली आहेत….

– सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..