माझा जन्म साताऱ्यातील एका खेड्यात झाला. त्यावेळी पिठाच्या गिरण्या खेड्यात अस्तित्वात नव्हत्या. सकाळी उठून जात्यावर दळण दळले जायचे. आमच्या मोठ्या काकांनी धाकट्या काकांना घरबसल्या व्यवसाय म्हणून गिरणी चालू करुन दिली. ती गावातील पहिली गिरणी होती. मारुतीच्या देवळासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये पिठाची गिरणी व तेलाचा घाणा दोन्ही सुरु झाले. डिझेलवर चालणाऱ्या त्या कुपर कंपनीच्या इंजिनवर गिरणी सुरू झाली की, एक टिपिकल पुकऽपुकऽ असा आवाज गावभर घुमायचा. त्यावेळी दळण पायलीने दळले जायचे. त्यासाठी मोठ्या लोखंडी घमेल्यात किंवा शेणाने सारवलेल्या पाटीत धान्य दळायला दिले जात असे.
शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर, पाचवी नंतर पंधरा दिवसांतून एकदा तरी गिरणीत जाऊन दळण आणण्याचे काम माझ्याकडे ठरलेलं असायचं. हातात डबा घेऊन मी जात असे. पावन मारुती चौकातून टिळक रोडकडे वळलं की, बापट यांची पिठाची गिरणी होती. त्या गिरणीतूनच एक मोठं झाड वाढलेलं होतं. त्याचा विस्तार हा गिरणीच्या पत्र्याबाहेर होता. दोन पायऱ्या चढून वरती गेलं की लाकडी फळीवर दळणाचा डबा ठेवायचा. असे डबे बहुतांशी अॅल्युमिनीयमचेच असायचे. क्वचितच एखादा पितळेचा दिसत असे. गिरणीमध्ये काम करणारा कामगार हा पांढरी टोपी, सदरा व पायजमा अशा वेशभूषेत असायचा. सतत गिरणीत उभे राहिल्याने तो नखशिखांत पिठमय झालेला दिसत असे. त्याचे हे पांढरेशुभ्र ध्यान मनात पक्के बसल्यामुळे एरवी तो कधी बाहेर दिसला तरी मला ओळखू येते शक्य नसायचं. माझ्यासमोर जर त्याने दळायला घेतले तर येणारा गरम पीठाचा वास हा वेगळाच भासायचा. त्यावेळी दळणाचा दर किलोला दहा पैसे असे. साधारणपणे दहावी पर्यंत मी हे काम आवडीने केले.
पुढे काॅलेज होईपर्यंत आईच दळण आणायची. त्याकाळी चौका-चौकात गिरण्या दिसायच्या. पिठाशिवाय मिरची, हळद, शिकेकाई दळणाऱी गिरणी पेठेमध्ये एखादीच असायची. टिळक रोडवरील महाराष्ट्र मंडळाच्या अलीकडे पूर्वी किशोर फ्लोअर मिल होती. तिथून पायी जाताना सर्व मसाल्यांचा येणारा मिश्र वास अजूनही आठवतो आहे.
मला एका प्रोफेसर मित्राने एकदा सहजच विचारलं, ‘तुला नाक लाल झालेल्या पुणेरी स्त्रिया पहाण्याची इच्छा आहे का?’ मला काहीच समजलं नाही. मी त्याच्या बरोबर शनिवार पेठेतील प्रसिद्ध राजमाचीकर गिरणीत गेलो. त्याला हळद दळून घ्यायची होती. त्या परिसरात मिरची, हळद, शिकेकाई, वेखंड अशा अनेक वासांचा मिश्र वास येत होता. गिरणीत मसाले दळायला आलेल्या अनेक स्त्रियांची नाकं त्या वासाने लाल झालेली दिसत होती.
आता जमाना बदलला आहे. पिठाच्या गिरण्यांची संख्या कमी झाली आहे. तयार आट्याची दहा किलोची आकर्षक ब्रॅण्डेड पॅकेट्स मिळतात. उच्च मध्यम वर्गीयांकडे पोर्टेबल आटा चक्की असते. ते घरच्याघरी गहू, ज्वारी दळू शकतात.
आताच्या गिरणीत कोणीही डबे घेऊन जात नाही. एकतर दहा किलोची तांदुळाची पिशवी किंवा जाड प्लॅस्टीकची कॅरी बॅग असते. मास्क घातलेला गिरणीवाला आपल्या हातात पर्मनंट मार्कर देतो आणि पिशवीवर नाव लिहायला सांगतो. आताच्या चक्कीतून पूर्वी सारखे पीठ बाहेर उडत नाही. पीठ बाहेर पडण्याच्या तोंडापासून एक पाईप लावलेला असतो, त्यातून उठणारे पीठ लांबवर बाजूला ठेवलेल्या डब्यात जमा होत असते. दिलेले दळण संपत आले की, तो गिरणीवाला एका लोखंडी जाड पट्टीने चक्कीवर दोन चार वेळा ठोकून आवाज काढतो. म्हणजे आपलं दळण दळून झालं असं समजावं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो व तो पिशवीत डबा ओतताना खांदा आणि कानामध्ये मोबाईल पकडून बोलू लागतो…
माझ्या मनात एक शंका डोकावून जाते, कधी तरी याचा मोबाईल बंद पडल्याने दुरुस्तीसाठी उघडल्यावर याच्यासारखाच तो देखील पीठाने अखंड भुरभुरल्यासारखा दिसत असेल….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-८-२०.
Leave a Reply