|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
साधारण जानेवारीचा पहिला आठवडा असावा. आईकडच्या what’s up ग्रुपवर माझ्या मामे बहिणीने (बकुलने) पिठापूर यात्रेचा मेसेज टाकला. त्यांचा एक ग्रुप 19 फेब्रुवारीला पिठापूरला जाणार होता आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी 2 दिवसात बकुलला कळवयाच होतं. माझ्या जीवाची घालमेल झाली. पिठापूरची ओढ तर होतीच पण नेमकी श्रीनीलची (मुलाची) 8वी ची वार्षिक परीक्षा होती, जी 17 फेब्रुवारीला सुरू होवून 4 मार्चला संपणार होती. खूप हळहळ वाटली. बकुलला फोन करून सांगितले, ‘माझी यायची खूप इच्छा आहे ग! पण, नेमक्या परीक्षा आहेत. हेच जर का 4 किंवा 5 मार्च तारीख असली असती तर मी नक्की आले असते!’
श्रद्धेचा, प्रचितीचा अनुभव इथूनच यायला सुरुवात झाली!!
मधे काही दिवस गेले. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा असेल, आमच्या चुलत भावंडांच्या ग्रुपवर माझ्या चुलत बहिणीचा मेसेज आला. ‘कुरवपूर – पिठापूर यात्रा! Journey start date 5th March…’
माझा डोळ्यांवर विश्वास बसेना! हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा… असं झालं. पिठापूर बरोबर कुरवपूर पण आणि ते सुध्धा 5 मार्चला!! मी लगेच होकार कळवून टाकला.
इकडे आई आणि नरेन बकुलबरोबर पिठापूरला जाणार होते. पण ही यात्रा कळल्यावर, आईने माझ्या बरोबर यावं म्हणजे तिचे दोन्ही होईल असे ठरले. नरेन एकटा पिठापूरला गेला. मी आणि आई 5 मार्चची वाट बघत होतो.
‘ जब गॉड की मर्जी होती हैं तब चीजोमे लॉजिक नही मॅजिक होता है!’ प्रमाणे menapause मुळे अनियमित असणाऱ्या त्या ‘चार दिवसांचा ‘ प्रश्न पण निकालात निघाला आणि मी नि: शंक मनाने तयारी करू लागले.
अरुताईला विचारून तिथे काय काय न्यायचे ह्याची यादी बनवली. माझ्या मनात प्रसादाचा शिरा करून न्यावे असे फार होते. शिरा 3-4 दिवस टिकावा ह्यासाठी काय करता येईल यावर विचार करून झाला, अनुभवी लोकांचं सल्ला घेतला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे शेवटी ‘ शिरा नेवू नये, टिकेल का नाही सांगता येत नाही’ अशा निष्कर्षप्रत आम्ही पोहचलो. मन जरा खट्टू झाले. पण तिथे पैसे किंवा शिऱ्याचं सामान देवून बनवून घेता येईल असे कळले. इथून तूप, रवा, साखर घेवून जायचे ठरले.
डोळ्यासमोर शिरा कसा असावा ह्याचे चित्र होते. खरपूस खमंग भाजलेला brownish रवा, भरपूर तूप, खमंग तळलेले भरपूर बदाम. असं चित्र माझ्या डोळ्यासमोर होत. ते मुद्दाम इथे द्यायचे कारण की असा शिरा मी बकुल कडे खाल्ला होता आणि त्याचा appearance एकदम परफेक्ट माझ्या मनात ठसला आहे. आणि ह्याचा संदर्भ पुढे येईलच.
तर असो! 30-40 लोकांना प्रसाद म्हणून पुरेल इतकं साहित्य नेण्याचं ठरलं, तरीही तिथे शिरा असतो पण आपल्यासारखा नसतो असं कळलं. ठीक आहे, जशी गुरूंची मर्जी असे म्हणत मी पुढच्या तयारीला लागले.
यात्रेच्या संयोजिका स्मिता केळकर (पुढील उल्लेख स्मिता काकू असा येईल) ह्यांच्याशी 4-5 वेळा फोनवर बोलणे झाले. 78 वर्षांची आई माझ्याबरोबर आहे. गरज लागलीच तर wheel chair किंवा तत्सम सोय करता येईल ना ह्याची चौकशी झाली. ‘ तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या आईची आपण व्यवस्थित काळजी घेऊ’ ह्या त्यांच्या आश्वासक शब्दांनी धीर आला.
आदल्या दिवशी ट्रीपला लागणारा खाऊ, देवाला वाहायची वस्त्रे, इत्तर, केशर, सुका प्रसाद, medicins अशी सगळी सामुग्री गोळा केली. योगायोगाने दीदी गोखले रोडवर अचानक भेटली. मग दोघींनी मिळून दोघींचं शॉपिंग केलं. खूपच मजा आली. तिथून सूचेतात जाऊन आईची तयारी बघितली. आणि घरी येऊन माझं पॅकिंग सुरू केलं. कुठे जेवण तिखट लागू नये म्हणून आईसाठी साखर एक डबीत भरून घेतली. तिला थोड पण तिखट सहन होत नाही.
आणि इतकेवेळा घोकूनही मी शिरा करताना लागणारे साहित्य घेतलेच नाही. हे मला गाडीत बसल्यावर नंतर लक्षात आले. स्वत:वर जराशी चिडलेच मी!
दुसऱ्या दिवशी सकाळी (५ मार्च ला) 5.30 ला नरेन मला आणि आईला लोकमान्य टिळक टर्मिनसला सोडणार होता.
इकडे बाबा, श्रीनिल आणि दीदी मंगलोरला जाणार होते.
बरोबर 5.30 ला नरेन गाडी घेऊन मित्तलला आला. ‘ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‘ असे म्हणत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली!
— यशश्री शैलेश पाटील
Leave a Reply